पनवेलमध्ये जेडब्लूआर लॉजिस्टिक्सच्या केमिकल गोदामाला भीषण आग; जीवितहानी टळली !!
उरण दि १८, (विठ्ठल ममताबादे) :
पनवेल तालुक्यातील पाडेघर जवळ जे डब्लू आर लॉजिस्टिक्स प्रा. लि. या हॅझर्डस कार्गो कंपनीच्या केमिकल गोदामाला शनिवारी दुपारी भीषण आग लागली. आगीचे लोळ व स्फोटाच्या आवाजाने परिसरात घबराट पसरली व वाहतूक काही काळ विस्कळीत झाली.
जेएनपीटी पासून ११ किमीवर NH-4B महामार्ग लगत ९७ एकरात पसरलेल्या या कंपनीकडे कंटेनर फ्रेट स्टेशन व हॅझर्डस वेअरहाऊस आहे. आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून केमिकल रिऍक्शन , शॉर्ट सर्किट किंवा मानवी चूक याचा तपास सुरू आहे. सर्व कामगार वेळीच बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
पनवेल अग्निशमन दलाच्या ५-६ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. केमिकलमुळे पाणी व फोमचा वापर करून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पनवेल महापालिका, एमआयडीसी व प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पथक घटनास्थळी दाखल असून फायर सेफ्टी व परवान्यांची चौकशी सुरू आहे. सध्या कूलिंग ऑपरेशन सुरू असून सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
No comments:
Post a Comment