निवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दूर करा ; सभापती महेश म्हात्रे यांना संघटनेने घातले साकडं !!
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) :
रायगड जिल्ह्यातील वयोवृद्ध सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ श्रेणी/निवड श्रेणीपासून मिळणाऱ्या आर्थिक लाभाचे प्रश्न प्रलंबित ठेवून अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानी कारभाराला निवृत्त शिक्षक कंटाळले आहेत. ज्या शिक्षकांना आर्थिक लाभ मिळणार आहे. त्यांचं निधन झालं आहे. प्रशासनातील अधिकारी त्यांच्याकडून तक्रार अर्ज मागतात ते देणार कसे ? असा प्रश्न निवृत्त शिक्षक संघाकडे समोर आला आहे. १९८६ च्या प्रा. चट्टोपाध्याय वेतन आयोगानी वरिष्ठ श्रेणी /निवड श्रेणी मंजूर करण्यासाठी २ सप्टेंबर १९८९ रोजी पारीत केलेल्या शासन निर्णयात स्पष्ट मार्गदर्शन दिलेले आहे. त्याचा अभ्यास न केल्यामुळे अनेक निवृत्त शिक्षकांना वरिष्ठ श्रेणी मंजूर केली नाही. परिणामी संबंधीत निवृत्त शिक्षकांना निवड श्रेणी मंजूर करता येत नाही. असे निवृत्त शिक्षक आज या जगात नाहीत. तसेच त्यांचे वारसदार हयात नाहीत. अशा परिस्थितीत त्यांचे तक्रार अर्ज करणार कोण ? तसेच संबंधीत शिक्षकांची सेवा पुस्तके गहाळ झाल्याचे कारण सांगून प्रलंबित प्रश्न सोडविण्यास तीन दशकाहून अधिक काळ टाळाटाळ केली आहे. त्यामुळे हताश झालेल्या सेवानिवृत्त शिक्षक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी उरण पंचायत समितीचे सभापती महेश म्हात्रे यांची त्यांच्या दालनात भेट घेऊन एका निवेदनाद्वारे निवृत्त शिक्षकांच्या समस्या दूर करा असं साकडं घातलं असून जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांना दिनांक ३० जून २०२५ रोजी दिलेल्या निवदेनाची प्रलंबित प्रश्नांसह प्रत दिली आहे, असे संघटनेतर्फे प्रसिद्धीस दिलेल्या पत्रात नमूद केलं आहे
No comments:
Post a Comment