कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राला मिळाले दोन वैद्यकीय अधिकारी ; आरोग्य विभागाने घेतली दखल !!
** रुग्णांची हेळसांड थांबणार.
उरण दि २१, (विठ्ठल ममताबादे) : डॉक्टर आणि अन्य कर्मचाऱ्यांच्या रिक्त पदामुळे उरण तालुक्यातील कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रावर अनेक समस्या निर्माण झाल्या होत्या.यावर विविध राजकीय प्रतिनिधी, सामाजिक संस्था संघटना, विविध वृत्तपत्रांनी आवाज उठविल्या नंतर आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. त्वरित या समस्याची दखल घेऊन तातडीने रुग्णालयात दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे रुग्णांची हेळसांड थांबणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
उरण तालुक्यातील दोन लाख लोकसंख्येसाठी येथील शासकीय इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय व कोप्रोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्र एकमेव आधार आहे. उरणच्या पूर्व भागातील सुमारे एक लाख गोरगरीब नागरिक उपचारासाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्राकडे धाव घेतात. या केंद्रासाठी वैद्यकीय अधिकारी ३, महिला आरोग्य परिचारिका २,आरोग्य सेविका २६,शिपाई २ आदी ३३ पदे मंजूर आहेत. यामध्ये आवश्यकता असलेल्या तीन सुरक्षारक्षकांचा समावेश नाही. यापैकी वैद्यकीय अधिकारी २, महिला आरोग्य परिचारिका १, आरोग्य सेविका २२, शिपाई २ अशी तब्बल २७ पदे रिक्त होती. अवघ्या तीन आरोग्य सेविकांवर गर्भवती, बाळंतीण महिला, नवजात बालकांची तपासणी आणि इतर कामांचा भार आला होता. याबाबत आवाज उठविताच कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रच्या बाबतीत आरोग्य विभागाने लगेच सूत्र हलविले.
आरोग्य विभागाने समस्याची त्वरित दखल घेऊन दोन महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांची नेमणूक केली. रायगड जिल्हा आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी डॉ. कोमल डकेवाड व डॉ. मानसी वावेकर यांची नियुक्ती केली असल्याची माहिती उरण पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी वंदन कुमार यांनी दिली. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांमुळे ग्रामीण भागातील रुग्णांना आता दिलासा मिळाला आहे.तरी इतर रिक्त पदेही त्वरित भरण्यात यावी व जनतेला चांगल्या सेवा सुविधा द्याव्यात अशी मागणी जनतेने केली आहे.
No comments:
Post a Comment