'शिक्षणाच्या शस्त्राने घडवूया नवे स्वराज्य'; अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशनतर्फे ठाण्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार !!
ठाणे, प्रतिनिधी :
"ज्या मातीत उद्याचे नेतृत्व घडते, ती माती धन्य असते. छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवारीच्या जोरावर स्वराज्य स्थापन केले, त्याच परंपरेला साजेसे काम आज आपण शिक्षणाच्या शस्त्राने करत आहोत," असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. अखंड मराठा साम्राज्य फाउंडेशन (मुंबई-ठाणे विभाग) च्या वतीने १४ जून २०२६ रोजी ठाणे येथे आयोजित 'गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा आणि भव्य करिअर मार्गदर्शन मेळावा' मोठ्या उत्साहात पार पडला.
या सोहळ्यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत घवघवित यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या डोळ्यांतील स्वप्नांची चमक आणि पालकांच्या चेहऱ्यावर पसरलेला अभिमान यांमुळे कार्यक्रमाची शोभा अधिकच वाढली होती.
विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांचे मार्गदर्शन
विद्यार्थ्यांच्या पुढील वाटचालीस दिशा मिळावी, या उद्देशाने विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी मार्गदर्शन केले. यामध्ये प्रामुख्याने:
श्री. रुपेश घाग (माजी सैनिक): संरक्षण आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व.
श्री. किरण गांगुर्डे (दिग्दर्शक): कला व माध्यम क्षेत्रातील संधी.
श्री. ज्ञानेश्वर देशमुख (वकील): कायदा क्षेत्रातील करियरच्या वाटा.
श्री. महेश सावंत (ध्रुव अकॅडमी): करियर आणि व्यक्तिमत्व विकास.
डॉ. किरण तामखाने (कर्करोग तज्ज्ञ): वैद्यकीय क्षेत्र व NEET परीक्षेचे नियोजन.
डॉ. सागर मर्गज (मर्गज इन्स्टिट्यूट): व्यवस्थापन व तंत्रज्ञान क्षेत्रातील आधुनिक कल.
'आज एक विद्यार्थी, उद्या समाज'
"यश हे केवळ एका व्यक्तीचे नसून ते संपूर्ण समाजाचे असते. आज एक विद्यार्थी घडला की उद्या संपूर्ण समाज खंबीरपणे उभा राहतो," असा आशावाद फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवीन ऊर्जेचा संचार झाला असून, करिअर निवडीबाबत त्यांचे अनेक प्रश्न सुटण्यास मदत झाली, अशी प्रतिक्रिया पालकांनी व्यक्त केली.
ठाण्यातील या ऐतिहासिक सोहळ्याने विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी एक भक्कम व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे.
संस्थेचे ठाणे जिल्हा ॲडमिन अभिजित ढेरे, भूषण खैरनार, गणेश ठाकरे, तृप्ती वाळुंजपाटील, अक्षय गाढवे, अजय भोसले यांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.
No comments:
Post a Comment