ठाण्यात हुक्का पार्लरवर धाड: 9 हजारांचा मुद्देमाल जप्त, चालकासह 14 जणांवर गुन्हा !!
*ठाणे, दि. 15 जून 2026*
ठाण्यातील राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत उथळसर प्रभाग समितीजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील 'लाऊड 9 लाऊंज' या आस्थापनावर पोलिसांनी मध्यरात्री धाड टाकून बेकायदेशीर हुक्का पार्लरचा पर्दाफाश केला. या कारवाईत हुक्का पॉट व विविध फ्लेव्हरसह सुमारे 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. हॉटेल चालकासह एकूण 14 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
*गोपनीय माहितीवर कारवाई*
पोलीस उपायुक्त, परिमंडळ 1, ठाणे बाळासाहेब पाटील यांना 14 जून रोजी रात्री 11.30 च्या सुमारास उथळसर परिसरातील 'लाऊड 9 लाऊंज' येथे ग्राहकांना हुक्का सेवा पुरवली जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांच्या निर्देशानुसार मुंब्रा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पथकाने नियोजनबद्ध छापा टाकला.
15 जून रोजी पहाटे 12.35 वाजता पोलिसांचे पथक लाऊंजमध्ये दाखल झाले. अचानक झालेल्या छापेमारीमुळे आस्थापनात खळबळ उडाली. तपासणीत ग्राहकांना हुक्का पिण्यासाठी आवश्यक साहित्य व विविध फ्लेवर उपलब्ध करून दिले जात असल्याचे आढळले.
*14 जणांवर गुन्हा, मुद्देमाल जप्त*
पोलिसांनी हॉटेल चालकासह तेथे उपस्थित असलेल्या 13 जणांना ताब्यात घेतले. घटनास्थळावरून हुक्का पॉट, विविध फ्लेवर व संबंधित साहित्य असा एकूण 9 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 134/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, वाणिज्य, उत्पादन, पुरवठा व वितरण विनियमन अधिनियम 2003 मधील कलम 4(अ) व 21(अ) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हुक्का पार्लर चालवण्यामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का याचा तपास सुरू आहे.
*बेकायदेशीर हुक्का व्यवसायावर कठोर कारवाई*
अलिकडच्या काळात हुक्का पार्लरच्या माध्यमातून तरुणांना आकर्षित करून तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन वाढत असल्याबत चिंता व्यक्त होत आहे. अशा बेकायदेशीर व्यवसायांवर अंकुश ठेवण्यासाठी ठाणे पोलिसांनी कारवाईची मोहीम तीव्र केली आहे. नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित बाबतीत कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माने व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली. शहरात परवानगीशिवाय सुरू असलेल्या हुक्का पार्लर व तंबाखूजन्य पदार्थांच्या बेकायदेशीर विक्रीविरोधात नागरिकांनी माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
सौजन्य - (सा. सत्य निर्णय)
No comments:
Post a Comment