Saturday, 6 June 2026

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

शिवराज्याभिषेक सोहळा जिल्हा परिषद ठाणे येथे उत्साहात साजरा !!

छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन लोकाभिमुख प्रशासन उभारूया – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

ठाणे, दि. ६ (संदीप शेंडगे) : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनानिमित्त जिल्हा परिषद ठाणे येथे आज, दि. ०६ जून, २०२६ रोजी शिवस्वराज्य दिन मोठ्या उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आयोजित या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रम, दूरदृष्टी आणि लोककल्याणकारी प्रशासनाच्या कार्याचा गौरव करण्यात आला.

६ जून १६७४ रोजी रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. स्वराज्य, स्वाभिमान, लोककल्याण आणि सुशासनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्या या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ राज्यभर शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात येतो. त्याच अनुषंगाने जिल्हा परिषद ठाणे येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आली. यानंतर मानाची स्वराज्य गुढी उभारून तिचे पूजन करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस अभिवादन करून त्यांच्या कार्याला आदरांजली वाहिली.

यावेळी राष्ट्रगीत व राज्यगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. शिक्षक रविंद्र तरे आणि सहशिक्षक यांनी पोवाडा गायन केले तसेच “जय भवानी, जय शिवाजी” आणि “छत्रपती शिवाजी महाराज की जय” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमादरम्यान शिवचरित्रातील विविध पैलूंवर प्रकाश टाकण्यात आला.

यावेळी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांनी लोककल्याण, न्याय, पारदर्शकता आणि सुशासन यांचे जे आदर्श निर्माण केले, ते आजही प्रशासनासाठी प्रेरणादायी आहेत. सर्वसामान्य जनतेच्या हिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी राज्यकारभाराची संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात उतरविली. त्यांच्या विचारांचा आदर्श घेऊन नागरिकाभिमुख, पारदर्शक आणि जबाबदार प्रशासन उभारण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील राहिले पाहिजे. शिवराज्याभिषेक दिन हा केवळ ऐतिहासिक स्मृतीदिन नसून सुशासन, कर्तव्यनिष्ठा आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा देणारा दिवस आहे.”

No comments:

Post a Comment

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !!

विश्वजीत ग्रीनच्या एफ विंगमध्ये पाणीटंचाई; महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे निवेदन !! अंबरनाथ, प्रतिनिधी : अंबरनाथ येथील विश्वजीत ग...