Saturday, 6 June 2026

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा वाद चिघळला !!

कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पूर्व-पश्चिम जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाच्या कामामुळे बाधित होत असलेल्या बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेच्या प्रश्नावरून सुरू असलेला वाद आता अधिकच चिघळला आहे. या वादावर तोडगा काढण्यासाठी आणि परिस्थितीची पाहणी करण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांनी बुद्धभूमी फाउंडेशनला भेट दिली. मात्र, या भेटीदरम्यान उपस्थित भीमसैनिक आणि रिपब्लिकन सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये तीव्र शाब्दिक वाद निर्माण झाला. त्यानंतर आनंदराज आंबेडकर यांनी तेथून निघून जाण्याचा निर्णय घेतला.

मिळालेल्या माहितीनुसार, उड्डाणपुलाच्या कामासाठी बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेचा काही भाग बाधित होत आहे. संबंधित जागेबाबत अद्यापही महापालिकेकडून नुकसानभरपाई किंवा टीडीआर देण्यात आलेला नसल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनचे मुख्य बौद्ध  भिख्खू गौतमरत्न महाथेरो आणि पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून गेल्या आठ ते दहा दिवसांपासून महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी आनंदराज आंबेडकर यांनी घटनास्थळी भेट देऊन संबंधितांशी चर्चा करण्याचा प्रयत्न केला. गौतमरत्न महाथेरो आणि आनंदराज आंबेडकर यांच्यामध्ये चर्चा झाली मात्र, काही भीमसैनिकांनी आपल्या भावना तीव्रपणे व्यक्त करत प्रशासनाविरोधातील तीव्र नाराजी व्यक्त करत घोषणाबाजी केली सोबतच या प्रकरणातील खासदार आणि पालिका प्रशासनाची बाजू घेत असल्याचा आरोप करत विविध घडामोडींवर आक्षेप नोंदवले. त्यामुळे वातावरण काही काळ तणावपूर्ण बनले.

या गोंधळात रिपब्लिकन सेनेच्या नगरसेविका माया कांबळे यांनाही कार्यकर्त्यांच्या संतापाचा सामना करावा लागला असून त्यांना तेथून निघून जावे लागल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

बुद्धभूमी फाउंडेशन ही केवळ एक संस्था नसून सामाजिक, शैक्षणिक आणि आंबेडकरी चळवळीशी निगडित असलेल्या अनेक कार्यकर्त्यांच्या भावना या ठिकाणाशी जोडलेल्या आहेत. त्यामुळे जागेचा प्रश्न अधिक संवेदनशील बनला असून, कोणतीही कारवाई करण्यापूर्वी संबंधितांना न्याय देण्यात यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून केली जात आहे.

सध्या या प्रकरणाकडे आंबेडकरी समाजासह कल्याणकरांचे लक्ष लागले असून, महापालिका प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि बुद्धभूमी फाउंडेशन यांच्यातील चर्चेतून मार्ग निघतो की संघर्ष आणखी तीव्र होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. उड्डाणपुलाच्या विकासकामांसोबतच बाधित संस्थांना योग्य नुकसानभरपाई व न्याय मिळावा, अशी भूमिका विविध सामाजिक संघटनांनी व्यक्त केली आहे.

No comments:

Post a Comment

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !!

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन !! सातारा, प्रतिनिधी :  शहरी व ग्रामीण क्षेत्रातील सुशिक्षित बे...