उल्हासनगरातील वालधुनी नदीची सफाई शून्य; कोणार्क कंपनीवर कारवाईची मागणी !!
*उल्हासनगर, संदीप शेंडगे* : उल्हासनगर शहरातून वाहणाऱ्या वालधुनी नदीला कचऱ्याचा विळखा पडला असून नदीची सफाई अद्याप झालेली नाही. नदी एखाद्या नाल्याप्रमाणे घाण कचरा आणि सांडपाणी घेऊन वाहत आहे. सफाईचे कंत्राट मिळालेल्या कोणार्क कंपनीने काम न केल्याने महापालिकेने कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी समाजसेवक फिरोजखान यांनी केली आहे.
शहरातील वालधुनी नदी घाणीच्या विळख्यात सापडली आहे. आजूबाजूच्या परिसरातील सांडपाणी थेट नदीत सोडले जात आहे. नदीची सफाई करण्याचे काम शहरातील नामांकित कोणार्क कंपनीला देण्यात आले आहे. मात्र कंपनीने नदीत केवळ पोकलेन मशीन उतरवून वरवरचा कचरा इकडे-तिकडे करत सफाईचा देखावा केला आहे.
रेल्वेने नदीत मातीचा भराव करून वाहने जाण्यासाठी तात्पुरता पूल बांधला होता. तो भराव व मातीचा पूल अद्याप काढण्यात आलेला नाही. वडोलगावपासून संजय गांधीनगर, खेती विभाग, हिराघाट, पंचशील नगर, शांतीनगरपर्यंत नदीची कोणतीही सफाई झालेली नाही, असा आरोप फिरोजखान यांनी केला आहे.
महापालिका ठेकेदाराला करोडो रुपये देऊनही नदीची स्थिती ‘जैसे थे’ आहे. कोणार्क कंपनीने सफाई केलेली नसल्याने त्यांना कोणतेही देयक देऊ नये व कंपनीवर दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी समाजसेवक फिरोजखान यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
No comments:
Post a Comment