कल्याणमध्ये वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनचा वाद चिघळला !!
*पालिका मुख्यालयासमोर दोन गट आमने-सामने; तणावपूर्ण वातावरण*
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण पूर्वेतील वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेवरून सुरू असलेला वाद आता चांगलाच पेटला आहे. बौद्ध भूमीच्या बचावासाठी बौद्ध भिक्खू संघ आक्रमक झाला असून, दुसरीकडे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे नेते अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कार्यकर्त्यांनी पालिका मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन छेडले. दोन्ही गट आमने-सामने आल्यामुळे परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून तणाव वाढला आहे.
*३० मे च्या कारवाईनंतर असंतोष*
३० मे रोजी कल्याण-डोंबिवली महापालिकेने उड्डाणपुलाच्या कामासाठी परिसरातील काही बांधकामे आणि धार्मिक प्रतीके हटवली होती. या कारवाईमुळे बौद्ध समाजात तीव्र असंतोष पसरला. राज्य शासनाने या जागेवर बिहारमधील बोधगयाच्या धर्तीवर भव्य ‘महाबोधी संकुल’ विकसित करण्याचा निर्णय घेतला असला, तरी स्थानिक भंते आणि आंदोलक मूळ मागण्यांवर ठाम आहेत.
*बौद्ध भिक्खू संघाच्या प्रमुख मागण्या*
बौद्ध भूमीच्या संरक्षणासाठी भिक्खू संघाने प्रशासनाविरोधात एल्गार पुकारला आहे. त्यांच्या प्रमुख मागण्या अशा :
- *दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई*: पूर्वसूचना न देता धार्मिक वास्तू आणि झाडांची तोड करणाऱ्या जबाबदार पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्वरित निलंबित करावे.
- *उड्डाणपुलाचा मार्ग बदलावा*: प्रस्तावित उड्डाणपुलामुळे बुद्धभूमीला धक्का लागू नये. तो वालधुनी नदीलगत घेण्यात यावा.
- *जागेचे प्रलंबित प्रश्न सोडवावेत*: जागेची मालकी आणि सीमांकन यांसारखे प्रलंबित प्रश्न आधी निकाली काढावेत.
*आरपीआय आठवले गटाचे आंदोलन*
दुसरीकडे आरपीआयचे नेते अण्णासाहेब रोकडे यांच्या नेतृत्वाखाली बौद्ध बांधवांनी आणि कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या भूमीचा विकास जागतिक स्तरावर व्हावा आणि बोधगयाच्या धर्तीवर येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटन व ध्यान केंद्र उभारले जावे, यासाठी हे आंदोलन सुरू आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या गेटसमोर दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. घोषणाबाजी आणि गोंधळामुळे महापालिका परिसरातील वातावरण तणावपूर्ण बनले होते.
*प्रशासनाची भूमिका*
परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. प्रशासनाकडून दोन्ही गटांशी चर्चा करून शांतता राखण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment