जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त कल्याणात 'सुसंगती सदा घडो' जनजागृती कार्यक्रम !!
कल्याण, प्रतिनिधी :
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त गुरुवारी कल्याणच्या आचार्य अत्रे रंगमंदिरात 'सुसंगती सदा घडो' या जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ठाणे पोलिस आयुक्तालय, कल्याण परिमंडळ-3 आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम झाला.
*विद्यार्थी, पालक, शिक्षकांची भूमिका महत्त्वाची*
पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी अंमली पदार्थांच्या वाढत्या धोक्यावर भाष्य केले. दुष्परिणामांसह त्यापासून दूर राहण्याचे उपाय समजावून देणे हा कार्यक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या तिघांची भूमिका युवकांना व्यसनापासून वाचवण्यासाठी महत्त्वाची आहे, असे ते म्हणाले.
*डॉ. दीपा शुक्ल यांचे मार्गदर्शन*
केडीएमसीच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ल यांनी विद्यार्थ्यांना मित्रांच्या दबावाला बळी न पडण्याचे आवाहन केले. "तुमचे शरीर आणि मन हीच तुमची खरी संपत्ती आहे. व्यसनामुळे ती नष्ट होते. मन अस्वस्थ असल्यास शिक्षक, समुपदेशक किंवा हेल्पलाईनची मदत घ्या. व्यसन हा आजार आहे आणि तो बरा होऊ शकतो," असे त्या म्हणाल्या.
*मान्यवरांची उपस्थिती*
कार्यक्रमाला पूर्व प्रादेशिक विभागाचे अपर पोलिस आयुक्त संजय जाधव, पोलिस उपायुक्त अतुल झेंडे, सहाय्यक पोलिस आयुक्त अशोक होनमाने, सुहास हेमाडे, डॉ. दीपा शुक्ल यांच्यासह कल्याण डोंबिवलीतील आठही पोलिस ठाण्यांचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक उपस्थित होते. जिल्ह्याचे शहर पोलिस आयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या नेतृत्वाखाली अंमली पदार्थ विरोधी मोहीम सुरू असल्याचे सांगण्यात आले.
*विद्यार्थ्यांचा प्रतिसाद*
कार्यक्रमाला परिमंडळ 3 मधील ज्युनिअर व सिनियर कॉलेजचे शिक्षकांसह 700 ते 800 विद्यार्थी उपस्थित होते. मित्रांच्या दबावाला "नाही" म्हणण्याची हिंमत मिळाली असून आम्ही इतरांनाही जागरूक करू, अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली.
No comments:
Post a Comment