Thursday, 2 July 2026

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तिघांना अटक !

भिवंडी टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांची मोठी कारवाई; आणखी तिघांना अटक !

जम्मू व बिहारमधून आरोपींना ताब्यात; पेपरफुटी रॅकेटचे अनेक महत्त्वाचे धागेदोरे उलगडण्याची शक्यता

प्रतिनिधी, भिवंडी 
गुरुवार दिनांक 2 जुलै 2026 

 महाराष्ट्रातील बहुचर्चित शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी गुरुवारी मोठी कारवाई करत आणखी तीन आरोपींना अटक केली आहे. या अटकेमुळे या गाजलेल्या प्रकरणाच्या तपासाला नवे वळण मिळाले असून, पेपरफुटीच्या संपूर्ण रॅकेटचा पर्दाफाश होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणातील दीर्घकाळ फरार असलेल्या कपिल दहिया याच्याविरुद्ध यापूर्वीच 'लुकआऊट सर्क्युलर' जारी करण्यात आले होते. तांत्रिक माहिती आणि गुप्त माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांच्या विशेष पथकाने त्याला जम्मू येथून अटक केली. तसेच या प्रकरणाशी संबंधित सोनू सिंह आणि मिथुन सिंह या दोघांना बिहारमधील पटणा येथून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

प्राथमिक तपासात सोनू सिंह आणि मिथुन सिंह हे या प्रकरणातील मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याचे निकटवर्तीय सहकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे. तपास यंत्रणांना मिळालेल्या माहितीनुसार, पटणा येथे बिजेंद्र कुमार गुप्ता यांच्या उपस्थितीत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हे दोघेही सहभागी होते. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्याविरोधात पुरावे गोळा करून त्यांचा शोध सुरू ठेवला होता.

तपासादरम्यान पेपरफुटीचा कट नेमका कोणत्या स्तरावर रचण्यात आला, प्रश्नपत्रिका एका राज्यातून दुसऱ्या राज्यात कोणत्या माध्यमातून पोहोचविण्यात आल्या आणि या संपूर्ण रॅकेटमध्ये आणखी कोणकोण सहभागी होते, याचा सखोल तपास सुरू आहे. आर्थिक व्यवहार, मोबाईल कॉल डिटेल्स, डिजिटल पुरावे आणि बँक खात्यांचीही कसून चौकशी केली जात आहे.

यापूर्वी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिलाही बिहारमधून अटक करण्यात आली होती. तिच्या चौकशीत मिळालेल्या तांत्रिक आणि इलेक्ट्रॉनिक पुराव्यांच्या आधारेच पोलिसांनी पुढील तपासाला गती देत या तिन्ही आरोपींपर्यंत मजल मारली.

तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका उत्तर प्रदेशातील आग्रा येथील मुद्रणालयातून बेकायदेशीररीत्या बाहेर काढण्यात आल्या. त्यानंतर त्या दिल्लीमार्गे महाराष्ट्रात आणून नियोजनबद्ध पद्धतीने पेपरफुटी करण्यात आली. या संपूर्ण रॅकेटमध्ये अनेक राज्यांतील व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून, त्यामुळे तपासाचे जाळे अधिक व्यापक करण्यात आले आहे.

सध्या अटक करण्यात आलेले कपिल दहिया, सोनू सिंह आणि मिथुन सिंह हे भिवंडी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांना भिवंडी न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. आरोपींची समोरासमोर चौकशी करण्यासाठी पोलिस न्यायालयाकडे पोलीस कोठडीची मागणी करणार आहेत.

या ताज्या कारवाईनंतर टीईटी पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित आणखी काही मोठी नावे समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, अद्याप फरार असलेल्या इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्र, बिहार, उत्तर प्रदेशसह विविध राज्यांमध्ये पोलिसांची पथके सातत्याने छापेमारी करत असून, या गाजलेल्या प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यात पोहोचल्याचे मानले जात आहे.

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !!

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचा पदग्रहण सोहळा मुंबईत; मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री पाटील प्रमुख पाहुणे !! *अध्यक्ष रविंद्र मानगावे, व...