Saturday, 4 July 2026

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

*दिग्गज पॅनलसमोर 'टायगर' एकटा लढला*  

    

*ठाणे, संदीप शेंडगे :

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील राजकारणाची दिशा ठरविणाऱ्या आणि राजकारणात नवी समीकरणे ठरविणाऱ्या ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीने यंदा अनेक नवे राजकीय संदेश दिले आहेत. महायुतीतील शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भाजपने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली असतानाच, शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांनी मात्र अपक्ष उमेदवार म्हणून दिलेल्या दमदार लढतीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या निवडणुकीमुळे ठाणे-पालघरच्या राजकारणात नवी समीकरणे तयार होण्याची चिन्हे स्पष्ट दिसू लागली आहेत. 

या निवडणुकीसाठी माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी आपली संपूर्ण शक्ती पणाला लावून पत्रकार परिषद घेत 'परिवर्तन पॅनल'ची घोषणा केली होती. तसेच बँकेचे माजी अध्यक्ष तथा मंत्री गणेश नाईक यांचे निकटवर्तीय समजले जाणारे बाबाजी पाटील हे देखील या पॅनलमध्ये संपूर्ण ताकदीनिशी सक्रिय होते. गणेश नाईक प्रत्यक्ष संयोजक नसले तरी या पॅनलमधील त्यांचा रस राजकीय वर्तुळात मोठा चर्चेचा विषय ठरला आहे. 

सुरुवातीला भाजपच्या पुढाकारातून आमदार किसन कथोरे यांच्या पाठिंब्याने 'सहकार पॅनल' उभे राहिल्याची चर्चा होती. मात्र, महायुतीतील मतभेदानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या पॅनलला पाठिंबा दिल्याने निवडणुकीत अधिक चुरस वाढली. या संपूर्ण प्रक्रियेत महायुतीतील अंतर्गत राजकारणही उघड झाल्याचे बोलले जात आहे. त्यातच महायुतीत अंतर्गत मतभेद असल्याचे पहावयास मिळाले. 

एवढे असतानाही निलेश सांबरे यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आरोग्य शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा आणि सर्वांच्या मदतीला धावून जाणे हा स्वभाव मतदारांना भावला तसेच जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून केलेली जनतेची सेवा कामी आली आणि त्यांचा विक्रमगड मधून बिनविरोध निवडून येण्याचा मान त्यांनी पटकावला. 

दरम्यान, गेल्या काही वर्षांत शिवसेनेत अनेक मोठे राजकीय नेते दाखल झाले. नीलम गोऱ्हे यांना पुन्हा विधानपरिषदेच्या सभापतीपदाची संधी मिळाली, रवींद्र फाटक यांचीही योग्य दखल घेण्यात आली, तर ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर संधी देण्यात आली. प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांच्यासह अनेक नेत्यांचा पक्षप्रवेश करून त्यांचे राजकीय पुनर्वसन करण्यात आले. नुकत्याच राबविण्यात आलेल्या 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत सहा खासदारांचा पक्षप्रवेशही चर्चेत राहिला. काही आमदारही शिवसेना (शिंदे गटात) प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. असे असतानाही शिवसेनेच्या उपनेतेपदावर असतानाही निलेश सांबरे यांना पक्षाने कोणतीही संधी उपलब्ध करून दिली नाही अनेक नेत्यांचे पुनर्वसन करण्यात आले परंतु निलेश सांबरे यांना मात्र पक्षाने वेळोवेळी डावलण्याचा प्रयत्न केला. 

मात्र, याच काळात ठाणे, पालघर, रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात सामाजिक कार्याच्या माध्यमातून मोठा प्रभाव निर्माण करणारे शिवसेनेचे उपनेते निलेश सांबरे यांना मात्र शिवसेना पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आणि खदखद निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. 

अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या निलेश सांबरे यांनी केवळ विरोधकांवर टीका न करता, निवडून आल्यास बँकेसाठी काय करणार याचा ठोस आणि वास्तववादी आराखडा मतदारांसमोर मांडला. विशेषतः बँक कर्मचाऱ्यांचे प्रश्न त्यांनी निवडणुकीच्या केंद्रस्थानी आणले. त्यांच्या प्रचारामुळे निवडणुकीत वेगळे वातावरण निर्माण झाले. 

इतर मागासवर्गीय राखीव मतदारसंघात त्यांनी प्रस्थापित उमेदवाराला कडवी झुंज देत अवघ्या शंभर मतांनी पराभव स्वीकारला, तर विक्रमगड तालुका सेवा संस्था मतदारसंघातून निर्विवाद विजय मिळवत आपली ताकद सिद्ध केली. या निकालाने राजकीय विश्लेषकांचेही लक्ष वेधून घेतले. 

निलेश सांबरे यांचा जनाधार यापूर्वीही स्पष्ट झाला होता आणि २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून त्यांनी तब्बल २ लाख ३१ हजार ४१७ मते मिळवली होती. त्या निवडणुकीत दोन वेळा खासदार राहिलेले कपिल पाटील यांचा ६५ हजार ६५७ मतांनी पराभव झाला होता, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा हे विजयी झाले होते. कपिल पाटील यांच्या पराभवामागे निलेश सांबरे यांच्या मतविभाजनाचा मोठा प्रभाव असल्याचे विश्लेषण त्यावेळी करण्यात आले होते. तर कपिल पाटील यांच्या पराभव केवळ निलेश सांबरे यांच्या मुळेच झाला असे राजकीय वर्तुळात बोलले जात होते. 

जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून निलेश सांबरे यांनी ठाणे-पालघर परिसरात व्यापक सामाजिक कार्य उभे केले आहे. मोफत सीबीएसई शाळा, मोफत रुग्णालये, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रे, पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्रे यांसारख्या उपक्रमांमुळे हजारो कुटुंबांपर्यंत ते पोहोचले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनातून अनेक युवक-युवती प्रशासकीय सेवेत आणि पोलीस दलात दाखल झाले असून, त्यामुळे त्यांच्याभोवती मोठा समर्थक वर्ग तयार झाला आहे. तसेच शिवसेनेच्या (शिंदे गट) अडचणीच्या काळात पक्षप्रवेश करून शिवसेनेला ठाणे पालघर जिल्ह्यात मोठी ताकद मिळवून दिली होती. 

अशा प्रभावी सामाजिक आणि राजकीय कामगिरीनंतरही शिवसेनेच्या उपनेत्यालाच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केले जात होते परिणामी, पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध अपक्ष म्हणून लढण्याची वेळ त्यांच्यावर आली. परंतु स्वतःवर असलेला विश्वास आणि जनतेची केलेली कामे पाहून जनता अधिकृत अनधिकृत पाहणार नाही केवळ विकासाला मध्ये या एकाच विश्वासाने निलेश सांबरे निवडणुकीला सामोरे गेले आणि अधिकृत उमेदवाराचा पराभव करून बिनविरोध निवडून गेले. 

ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या या निवडणुकीत दोन्ही बाजूंना अनुभवी आणि मातब्बर राजकीय नेते असतानाही निलेश सांबरे यांनी दिलेली कडवी लढत ही आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या दृष्टीने महत्त्वाची मानली जात आहे. शिवसेना सातत्याने ऑपरेशन टायगर राबवत आहे परंतु एकटा लढणाऱ्या या ठाणे पालघरच्या टायगर मात्र दुर्लक्षित होत चालला आहे 

या निवडणुकीने ठाणे आणि पालघरच्या राजकारणात नवे राजकीय संकेत दिले असून, पुढील काळात 'निलेश सांबरे फॅक्टर' अधिक प्रभावी ठरणार का, त्यामुळे ऑपरेशन टायगर राबवीत असताना आपला हा टायगर निसटून तर जाणार नाही ना याकडे आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
.

No comments:

Post a Comment

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे !

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत निलेश सांबरे यांचा विजय; बदलली ठाणे-पालघरची राजकीय समीकरणे ! *दिग्गज पॅनलसमोर 'टायगर' एकटा लढला*   ...