भिवंडीतील अण्णाभाऊ साठे नगर आठ दिवसांपासून अंधारात; पथदिवे बंद असल्याने नागरिक त्रस्त !!
मीटर जळाल्यामुळे वार्ड क्रमांक २० मधील रस्ते अंधारात; घरफोडी-चोरीची भीती, महिलांसह ज्येष्ठ नागरिकांचे हाल; तातडीने पथदिवे सुरू करण्याची मागणी
प्रतिनिधी भिवंडी
सोमवार दिनांक 13 जुलै 2026
भिवंडी महानगरपालिका हद्दीतील वार्ड क्रमांक २० मधील अण्णाभाऊ साठे नगर परिसरात मागील आठ दिवसांपासून पथदिवे बंद असल्याने संपूर्ण परिसर अंधाराच्या विळख्यात सापडला आहे. मीटर जळाल्यामुळे रस्त्यावरील पथदिवे बंद असून नागरिकांना रात्रीच्या वेळी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.
अण्णाभाऊ साठे नगर हा डोंगरमाथ्यावर व झोपडपट्टी परिसर असल्याने येथे अरुंद गल्लीबोळ आहेत. रात्रीच्या वेळी अंधारामुळे लहान मुले, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच आजारी व्यक्तींना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत आहे. अंधाराचा फायदा घेऊन घरफोडी, चोरी तसेच इतर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नागरिकांनी व्यक्त केली असून परिसरातील सुरक्षेबाबतही चिंता वाढली आहे.
परिसरात सार्वजनिक शौचालय असून तेथेही वीजपुरवठा नसल्याने शौचालय पूर्णपणे अंधारात आहे. विशेषतः महिलांना रात्रीच्या वेळी शौचालयाचा वापर करताना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत असून त्यांची सुरक्षितताही धोक्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिकांनी अनेक वेळा संबंधित विभागाकडे तक्रारी करूनही अद्याप दुरुस्तीचे काम पूर्ण झाले नसल्याचा आरोप केला आहे. महानगरपालिकेने या समस्येची तातडीने दखल घेऊन जळालेला मीटर त्वरित बदलून पथदिवे सुरू करावेत आणि परिसरातील नागरिकांना दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी अण्णाभाऊ साठे नगरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
No comments:
Post a Comment