खेळांचा खेळखंडोबा होऊ नये यासाठी क्रीडा प्रशिक्षकांचा जागरण गोंधळ!
खेळाडूला खेळण्यापासून दूर करणे म्हणजे आपणच आपल्या खेळाडूंच्या जीवावर उठलोय की काय? ही स्थिती सध्या निर्माण झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २९ ऑगस्ट २०१९ रोजी फिट इंडिया हा केवळ खेळाडूच नव्हे तर प्रत्येक भारतीय नागरिकाला सुदृढतेचा मंत्र देणारा उपक्रम हाती घेतला. फिट इंडियाचा वर्धापन दिन सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०२० मध्ये साजरा केला. त्याप्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली व अन्य दिग्गजांच्या मुलाखती पंतप्रधानांनी व्हिडिओ काॅन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतल्या. यावेळी सर्व खेळाडूंनी फिटनेसचे महत्त्व पटवून दिले.
*खेळ हाच खेळाडूंचा खरा ऑक्सिजन*
अनेक जागरूक पालकांनी आपल्या पाल्यांना बालपणापासूनच त्यांच्या योग्यतेनुसार खेळाच्या प्रशिक्षणावर लक्ष केंद्रित केलेले असते. ते मुल लहान असताना आंतरराष्ट्रीय व ऑलिंपिक खेळाडू बनण्याचा ध्यास घेऊन खेळत असते. खेळ मैदानी असो वा बंदिस्त सभागृहातील असो सातत्याने खेळांचा सराव करणाऱ्या खेळाडूंसाठी ते एक मंदिरच आहे. खेळाडूंना या क्रीडा मंदिरापासून दूर ठेवणे म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक क्षमता मारणे होय. खेळ हाच खेळाडूंचा खरा ऑक्सिजन आहे. खेळाडूंना खेळण्यापासून दूर ठेवून त्यांचा ऑक्सिजन हिरावून घेतला जात आहे.
*खेळाडूंच्या तंदुरुस्तीमध्ये प्रशिक्षकाची भूमिका महत्त्वाची*
क्रीडा प्रशिक्षक हे आपापल्या खेळातील कौशल्यांमध्ये पारंगत असतात. प्रशिक्षकांना प्रत्येक खेळाडूंची नस ठावूक असते. खेळाडूंचा सराव, आहार, विश्रांती यांचे तंतोतंत शास्त्र प्रशिक्षकांचे नियोजनबद्ध असते. क्रिकेट, खो-खो, कबड्डी, आट्या पाट्या यांसारखे मैदानी खेळ असो वा तलवारबाजी, तायक्वांडो, स्केटिंग, बाॅक्सिंग यांसारखे बंदिस्त जागेतील खेळ असो प्रशिक्षक आपल्या खेळाडूंच्या नियमित व तंत्रशुद्ध सरावासाठी खूप जागरुक असतो.
*कोव्हिड योद्धा भूमिकेत क्रीडा शिक्षक*
महाराष्ट्रातील सर्वच शाळांमधील क्रीडा शिक्षक हे, आर्. एस्. पी. युनिटच्या माध्यमातून, कोरोना महामारीच्या कालावधीत महाराष्ट्र पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली कोव्हिड योद्धा या भूमिकेत हिरीरीने काम करत आहेत. खाजगी विनाअनुदानित शाळेत स्वतःला पगार मिळण्याची वानवा असताना देखील गरीब भूकेलेल्यांच्या पोटी दोन घास मिळावेत, यासाठी स्वतःच्या कुटुंबाकडे दुर्लक्ष करून मोठ्या धाडसाने हे शिक्षक काम करत आहेत, याची शासनाने नोंद घ्यावी.
*कोरोनाचा खेळ खल्लास करण्यासाठी खेळ*
कोरोना प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आपले मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनहित लक्षात घेऊन लाॅकडाऊन जाहिर केला आहे. परंतु यात शासनमान्य अधिकृत खेळांवर देखील निर्बंध लादणे ही बाब खेळाडू व क्रीडा प्रशिक्षक यांच्यासाठी खूप घातक ठरत आहे. अनेक क्रीडा प्रशिक्षक हे नामवंत आंतरराष्ट्रीय इंग्रजी माध्यमाच्या विनाअनुदानित शाळेत शिक्षक म्हणून सेवेत रुजू आहेत. परंतु शाळा बंद असल्यामुळे जो तुटपुंजा पगार मिळतो तो सुद्धा हाती मिळणे दुरापास्त झाले आहे. तसेच क्रीडांगणे बंद असल्याने आज अनेक क्रीडा प्रशिक्षकांवर उपासमारीची वेळ आली आहे. ही परिस्थिती इतकी भयावह आहे की, अनेक क्रीडा प्रशिक्षक भाजी विक्रेते, फळ विक्रेते तसेच मिळेल ते काम करत आहेत. अनेक शिक्षक तर गरीबांना धान्य वाटप करण्यात येते तिथे रांगेत उभे राहतात. हे ते क्रीडा प्रशिक्षक आहेत जे भारताच्या शिरपेचात क्रीडा क्षेत्रातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तयार करतात.
शेवटी इतकंच मागणे आहे की, शासनाने क्रीडा प्रशिक्षकांची या व्यथा लक्षात घेऊन, नियमाधिन राहून क्रीडांगणे सुरु करावीत, ही कळकळीची विनंती.
- अंकुर भिकाजी आहेर
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार्थी
मुख्याध्यापक
महात्मा गांधी विद्यामंदिर,
डोंबिवली (प.)
8422919612


No comments:
Post a Comment