भिवंडीतील खाडी पट्ट्यातून सक्शन पंपद्वारे अनधिकृत रेती उत्खनन,मंडळ अधिकारी, तलाठ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष !!
"ग्रामस्थांकडून रेती माफ़ीयांनवर कारवाईची मागणी."
भिवंडी, दिं,16, अरुण पाटील (कोपर) :
भिवंडी तालुक्यातील खाडी मधून सक्शन पंपाद्वारे रेती उपसा करण्यास राज्य शासनाने बंदी घातली असताना देखील भिवंडी तालुक्यातील कशेळी खाडी, काल्हेर खाडी, केवणी -दिवे खाडी, खारबाव खाडी, व कोनगाव खाडी या मुख्य खाडीतून ड्रेझर व सक्शन पंपाद्वारे रेती माफिया राज रोजरोसपणे अनधिकृत रेती उत्खनन करीत आहेत. या बाबत गेल्या सहा महिन्यांपासून महसूल विभागाचे मंडळ अधिकारी व तलाठी यांच्या कडे तक्रारी करून सुध्दा दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ऱ्हास होत असून ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व ठाणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश नार्वेकर व भिवंडी पोलिस उपायुक्तानी कोनगाव खाडीतून अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या रेती माफियांवर कारवाई करावी अशी मागणी कोनगावचे नागरिकांनी केली आहे. याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे.
भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथील खाडीत बंदी असतानाही रेती माफियांनी सक्शन पंप व डेझर च्या साहाय्याने रेती उत्खनन केले आहे. त्यामुळे खाडीपात्र नाहीसे होत असून शासनाचा कोट्यवधींचा महसूल देखील बुडत असल्याची बाबा ग्रामस्थ सागर म्हात्रे यांनी आपल्या निवेदनात नमूद केली आहे. रेती उत्खनन होत असल्यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास होत आहे. भिवंडी महसूल विभागाचे तलाठी व सरकारी अधिकाऱ्यांनी ही बाब निदर्शनास आणून दिलेली आहे तसेच लेखी तक्रार व निवेदने देऊन देखील प्रशासन रेती माफियांवर कोणतीही कारवाई करत नसल्याचे म्हात्रे यांनी निवेदनात म्हटले आहे. 2 ऑगस्ट 1987 रोजी कल्याण- भिवंडी-ठाणे खाडीपट्टा तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी बंदीक्षेत्र म्हणून घोषित केला आहे मात्र तरी देखील याठिकाणी मोठ्या प्रमाणात रेती माफियांकडून रेती उत्तखनन केली जात असल्याने खाडीचे पाणी सुपीक जमिनीत घुसल्याने स्थानिक भूमिपुत्रांच्या सुपिक जमिनी क्षारयुक्त व नापिक होत आहेत तर विहिरींचे पाणी देखील खारे होत असून शेतकरी देशोधडीला लागण्याची चिंता निवेदनात नमूद केली आहे .
अनधिकृत रेती उत्तखनन करणाऱ्या रेती माफियांविरोधात शासनाने कारवाई न केल्यास ग्रामस्थांचेवतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते म्हात्रे यांनी दिला आहे .

No comments:
Post a Comment