शासकीय योजनांचा प्रचारातून लाभार्थ्यांना मदतीचा हात.. "लोककलावंताची साथ"
बुलडाणा, बातमीदार दि.२५ : लोककलावंतांच्या पारंपारिक लोककलेतून सर्वसामान्य नागरिकांना शासनाच्या लोक कल्याणकारी योजनांची माहिती व्हावी, यासाठी माहिती व जनसंपर्क महासंचालनालय व जिल्हा माहिती कार्यालयांमार्फत विशेष कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात आला. लोक कलावंतांच्या साथीने शासकीय योजनांचा प्रचार – प्रसार करण्यात आला. योजनांच्या माहितीमुळे पात्र लाभार्थ्यांना योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार आहे. त्यामुळे निश्चितच या प्रचारातून शासकीय योजनांची माहिती झाल्यामुळे पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळेल. जिल्ह्यात ६३ गावांमध्ये लोकलावंताच्या माध्यमातून कलापथक कार्यक्रम घेण्यात आले. या कार्यक्रमांना प्रत्येक गावात गावकऱ्यांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
स्थानिक भाषेतून शाहिरी, लोकगीत, पोवाडा, वासुदेव आदी पारंपारिक लोककलांच्या माध्यमातून गावकऱ्यांपर्यंत राज्य शासनामार्फत राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती जिल्हा माहिती कार्यालयामार्फत पोहचविण्यासाठी आली. गावकऱ्यांचे मनोरंजनात्मक पद्धतीने प्रबोधन करुन त्यांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रोत्साहित करण्यात आले. जिल्ह्यात लोककला पथकांच्या माध्यमातून गावोगावी, खेडोपाडी जनजागृतीपर कार्यक्रम घेण्यात आले.
राज्य शासनाने दोन वर्षात विविध लोककल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविल्या आहेत. या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य नागरिकांना व्हावी आणि ते शासनाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी पुढे यावेत, हा या मोहिमेचा उद्देश होता. गत दोन वर्षात महाविकास आघाडी शासनाने घेतलेले निर्णय, त्यांची अंमलबजावणी, विविध योजना, उपक्रम, कोरोना काळात राबविण्यात आलेले विविध उपक्रम, शिवभोजन थाळी, महात्मा ज्योतिराव फुले कर्ज मुक्ती योजना, महिला व बाल विकास योजनेसाठी राखीव निधीची तरतूद, विद्यार्थी, शेतकरी बांधव, आरोग्यसेवा, कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिम आदी योजना व उपक्रमांची माहिती लोककला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यात सर्वत्र पोहोचवण्यात आली.
लोककवी वामन कर्डक बहुउद्देशीय प्रतिष्ठाण, कृषिसमृद्धी मल्टीपर्पज फाऊंडेशन व श्री. संत सेना महाराज ग्रामविकास बहु. संस्था या लोककलापथकामार्फत जिल्ह्यात ६३ प्रबोधनात्मक कार्यक्रम घेण्यात आले. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात कलापथकाच्या माध्यमातून विविधरंगी मनोरंजनात्मक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम राबविण्यात आले.
जिल्हा माहिती कार्यालयाचा लोककलापथकामार्फत शासकीय योजनांच्या प्रसिद्धीसाठी राबविण्यात आलेला उपक्रम स्पृहणी आहे. लोककलेच्या माध्यमातून आमच्यासाठी शासन राबवित असलेल्या योजनांची माहिती आम्हाला सोप्या भाषेत सांगण्यात आली. आता शासनाच्या कोणत्या योजना आहेत, ते समजल्यामुळे आम्ही या योजनांचा अवश्य लाभ घेणार आहे, अशा प्रतिक्रियाही उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.


No comments:
Post a Comment