Sunday, 26 June 2022

शाहू महाराज यांच्या विचारातच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा पाया !! - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे * सामाजिक न्याय दिन कार्यक्रम उत्साहात *

शाहू महाराज यांच्या विचारातच समाज कल्याण विभागाच्या योजनांचा पाया !! - पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे

* सामाजिक न्याय दिन कार्यक्रम उत्साहात *


बुलडाणा, बातमीदार, दि.२६ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे दूरदृष्टीचे होते. त्यांनी त्या काळात शिष्यवृत्ती योजना केली. तसेच मोठ्या शहरात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी निवासाची व जेवणाची व्यवस्था व्हावी, याकरिता वसतिगृह बांधले. त्यांच्या याच विचारांवर आधारित सामाजिक न्याय विभाग विविध योजना राबवित आहे. त्यामुळे निश्चितच सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांचा पाया हा राजर्षी शाहू महाराज यांच्या विचारांमध्येच आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे यांनी आज केले. 


  डॉ बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आज शाहू महाराज यांच्या जयंती निमित्ताने सामाजिक न्याय दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना पालकमंत्री बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी एस रामामूर्ती उपस्थित होते. तसेच सहायक आयुक्त डॉ अनिता राठोड, जि ल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत उपस्थित होते. मुख्य कार्यक्रमाच्या सुरवातीला उपस्थित सर्व मान्यवरांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून राजर्षी छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतीबा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. 
   पालकमंत्री पुढे म्हणाले, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार योजना व परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना सामाजिक न्याय विभागामार्फत कार्यान्वित आहे. या योजना सुध्दा राजश्री शाहू महाराज यांच्या विचारांचा परिपाक आहे. अशा महान व्यक्तिमत्त्वाचा वैचारिक वारसा पुढे ठेवण्याची गरज आहे. 
   प्रास्ताविक सहाय्यक आयुक्त डॉ. अनिता राठोड यांनी केले. त्यांनतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते अनुसुचीत जाती मुलां/मुलींच्या शासकीय निवासी शाळेतील या वर्षी इयत्ता १० वी मध्ये प्रथम आलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेतलेले, राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्कार व गुणवत्ता शिष्यवृत्ती पात्र असलेले, राजर्षी शाहू महाराज जंयती निमित्त महाविद्यालयामध्ये आयोजित निबंध, वक्तृत्व स्पर्धा मध्ये प्रथम आलेल्या विदयार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी जिल्हाधिकारी एस रामा मूर्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाला सामाजिक पुरस्कार प्राप्त व्यक्ती पांडूरंग साबळे, माधव हुडेकर,डी. आर. इंगळे, ईश्वर मगर, पंढरीनाथ महाले, मधुकर पाटील, नारायण दाभाडे, भुजंगराव रिंढे, शालीग्राम सोनोने हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन सतिश बाहेकर यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वी होणेसाठी सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी प्रयत्न केले.
                     समता दिंडीचे आयोजन 
 सामाजिक न्याय दिनानिमित्त जिल्हा परिषद येथून सकाळी ८.३० वाजता समता दिंडीचे आयोजन करण्यात आले. दिंडीला जिल्हाधिकारी एस रामामुर्ती यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखविण्यात आली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे, सहायक आयुक्त डॉ. अनिता राठोड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी मनोज मेरत यांची उपस्थिती होती. समता दिंडीमध्ये समाज भुषण पुरस्कार प्राप्त शाहीर डी. आर. इंगळे व त्यांचे कलापथक यांचे मार्फत राजर्षी शाहू महाराज यांचे जिवनावरील पोवाडे गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. समता दिंडीमध्ये बुलडाणा शहरातील नर्सिंग कॉलेज, समाजकार्य महाविदयालय, शासकीय वसतिसगृह व शासकीय निवासी शाळामधील विदयार्थ्यांचा तसेच शासकीय अधिकारी / कर्मचारी यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग होता. सदर समता दिंडी जिल्हा परिषद बुलडाणा या ठिकाणाहून प्रारंभ होवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन बुलडाणा या ठिकाणी समाप्त झाली.


No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...