असे आहे राजकीय नाट्य, देवेंद्र फडणवीसांचा 'नकार' अन् 'होकार'.पण फडणवीसच असणार केंद्रस्थानी.
भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
भाजपने गुरूवारी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्याची घोषणा केली. सर्वजण देवेंद्रच महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री होतील असा दावा करत होते. पण, घडले ते वेगळेच. सर्वजण भाजपच्या या राजकीय खेळीने चकीत झाले.
कारण, भाजपने अडीच वर्षांपूर्वी याच फडणवीसांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेने सोबतचे आपले 30 वर्षे जुने नाते तोडले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार स्थापन करण्याचा अपयशी प्रयत्नही केला होता. पण आता नेमके असे काय घडले की, 105 आमदार असणाऱ्या भाजपला अवघे 50 आमदारांचे पाठबळ असणाऱ्या एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करावे लागले?
शिंदे मुख्यमंत्री होतील व आमचा त्यांना बाहेरुन पाठिंबा असेल असे स्वतः फडणवीसांनी सांगितले होते. त्यानंतर भाजप अध्यक्षांना स्वतः माध्यमांत येऊन उप मुख्यमंत्रीपदाचा निर्णय आम्ही स्वतः घेतल्याचे स्पष्ट करावे लागले. माध्यमांसाठी ही एकदम नवी गोष्ट होती.
देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवाराच्या मदतीने नोव्हेंबर 2019 मध्ये भाजपचे सरकार स्थापन करण्याचा निर्णय घेतला. पण, ते अपयशी ठरले. अवघ्या 80 तासांतच त्यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. यामुळे भाजपची संपूर्ण देशात नाचक्की झाली. त्यामुळे यावेळी भाजपने महाराष्ट्रातील संपूर्ण मोहिमेची सूत्रे दिल्ली पातळीवरुन हलवली. यावेळी दिल्लीला कोणतीही रिस्क घ्यावयाची नव्हती. कारण, 2020 मध्ये भाजपचे राजस्थान ऑपरेशन अपयशी ठरले होते. त्यामुळे महाराष्ट्रातील भाजप नेत्यांना या ऑपरेशन पासून लांबच ठेवण्यात आले.
केव्हा कुणाला मुंबईहून सूरत, सूरतहून गुवाहाटीला जायचे आहे. हे सर्व दिल्ली पातळीवर निश्चित करण्यात आले होते. प्रत्येक गोष्टीची माहिती दिल्लीला होती. त्यामुळे महाराष्ट्राला याची खबरबातही लागली नाही. दिल्लीने शिंदेंना मुख्यमंत्री करण्याचे आश्वासन दिले होते. ते त्यांनी पूर्ण केले.
पण, देवेंद्र फडणवीस यासाठी तयार नव्हते. एरवी फडणवीसांच्या चेहऱ्यावर नेहमीच हास्य असते. पण गुरूवारी सायंकाळी 4 वा. झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्य मंत्रीपदासाठी शिंदेंच्या नावाची घोषणा करत असताना त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट नाराजी दिसून येत होती. ते म्हणाले -माझ्या पक्षाचा शिंदेंना पाठिंबा असेल. पण मी सरकारमध्ये सहभागी होणार नाही. पण सायंकाळी 7 च्या सुमारास अचानक समीकरण बदलले आणि फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली.
महाराष्ट्रात खरी लढत हिंदुत्वाची आहे. या युद्धात भाजपने शिवसेनेला मात दिली आहे. भाजपने शिवसेनेशी बंडखोरी करणाऱ्या एकनाथ शिंदे व अन्य आमदारांकडून वारंवार शिवसेनेने हिंदुत्व सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीची कास धरल्याचे वदवून घेतले. यातून भाजप हाच हिंदुत्वाचा नारा देणारा एकमेव पक्ष असल्याचा संदेश देण्यात आला.
महाराष्ट्रात शिवसेना आतापर्यंत हा दावा करत होती.भाजपने आता या दाव्यावरच घाव घातला आहे. त्यामुळे ठाकरेंनी आपल्या मंत्रिमंडळाच्या शेवटच्या बैठकीत नाईलाजाने औरंगाबादचे नाव बदलून संभाजीनगर व उस्मानाबादचे नाव बदलून धाराशिव करावे लागले.
यातून शिवसेनेने आपण हिंदुत्व सोडले नसल्याचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. एकप्रकारे या संपूर्ण प्रकरणात भाजपचा राजकीयदृष्ट्या विजय झाला. यासाठी भाजपला दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या फडणवीसांना उपमुख्यमंत्री करावे लागले. पण यातून शिंदेंचे सरकार आम्ही केव्हाही पाडू शकतो असा संदेश जाणार नाही याची पुरेपूर काळजीही भाजपने घेतली.
भाजपने फडणवीस यांची डेप्युटी सीमपदी निवड करुन एका बाणाने अनेक निशाणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम त्यांचा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पूर्णतः संपवण्याचा प्रयत्न आहे. शिंदे यांना मुख्यमंत्री केल्यानेच हे शक्य होते. तळागाळात शिंदेंची पकड मजबूत व्हावी. ग्रामपंचायतीपासून महापालिकेपर्यंत सर्वत्र शिंदे गटाचे शिवसैनिक निवडून यावे असा त्यांचा प्रयत्न आहे. भाजप सरकारमध्ये सहभागी झाल्यामुळे हे आता सहजशक्य होईल.
महाराष्ट्रातील भाजपच्या कॅप्टनला नव्या सरकारमध्ये उपकर्णधार करण्यामागे भाजपचा हेतू मराठा समुदायाची व्होट बँक फोडण्याचा प्रयत्न आहे. भाजपने फडणवीसांना मुख्यमंत्री केले असते तर मराठा व्होट बँक शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीकडे गेली असती.
पण आता शिंदेंना मुख्यमंत्री केल्याने राष्ट्रवादी कमकूवत होईल. याचा आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट फायदा होईल. शिंदेंना मुख्यमंत्री व देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री केल्याने भाजपचा 2024 चा मार्ग सुलभ होईल. शिंदे एक मोठे मराठा नेते आहेत. त्यांना मुख्यमंत्री केल्याने भाजपला आगामी स्थानिक व लोकसभा निवडणुकीत मराठा व्होट बँकेतील आपला टक्का वाढवता येईल.
भाजपच्या या मास्टरस्ट्रोकमागे 'ठाकरे' व 'पवार' कुटुंब संपवण्याचाही डाव आहे. स्वतः मुख्य मंत्रीपदाची खुर्ची सोडताना फडणवीसांनीही आपल्याला उद्धव ठाकरे किंवा शरद पवारांसारखा सत्तेचा मोह नसल्याचे स्पष्ट केले आहे.
एवढेच नाही तर भाजपनेही उद्धव यांची आता शिवसेनेवर कोणतीही पकड नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच पवारांच्या ‘चाणक्य‘ या खास टॅगलाही धक्का दिला आहे. अजित पवार व फडणवीसांची मैत्री जगजाहीर आहे. त्यामुळे आता भाजपचा पुढील प्रयत्न राष्ट्रवादीत फूट पाडण्याचा असेल असे मानले जात आहे.
एकनाथ शिंदे यांची मुख्यमंत्रीपदी निवड करुन भाजपने उद्धव यांच्याकडे शिल्लक असणाऱ्या शिवसेनेला सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला आहे.
उद्धव यांचे 'व्हिक्टिम कार्ड' फेल करण्याचाही हेतू आहे.
शिवसेना फोडून सत्ता बळकावल्याचा आरोप भाजप नेतृत्वाला नको होता. तसेच शिवसेनेने व्हिक्टिम कार्ड खेळावे असेही त्यांना मान्य नव्हते. त्यामुळे हिंदुत्वाच्या मुद्द्याला एवढी हवा देण्यात आली. उद्धव यांनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्रीपद सोडले त्यामुळे त्यांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची सहानुभूती मिळून त्यांची पक्षसंघटना मजबूत होईल अशी भीती त्यांना वाटत होती. असे झाले तर आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला अनंत अडचणीना सामोरे जावे लागणार होते.
फडणवीसांना शेवटच्या क्षणी उप मुख्यमंत्री बनवण्यामागे भाजपचा एक हेतू असा होता की, शिंदे प्रथमच मुख्यमंत्री होत आहेत आणि त्यांना दोन्ही पक्ष एकत्र घेऊन पुढे जाण्याचा अनुभव नाही. त्यामुळे भाजप व शिंदे गटाच्या आमदारांमध्ये संघर्ष होऊ नये, यासाठी केंद्राने फडणवीस यांच्या अनुभवाचा येथे वापर केला आहे. आपण असेही म्हणू शकतो की शिंदे मुख्यमंत्रीपदी राहतील, पण सत्तेच्या केंद्रस्थानी देवेंद्र फडणवीसच राहून पडद्याआडून सरकार चालवणार आहेत.
भाजपनेही एक नरेटिव्हही सेट करण्याचा प्रयत्न केला आहे. एक म्हणजे भाजप ज्याच्याशी कमिटमेंट करते. ते पूर्ण करते. बिहारमध्ये भाजप हा मोठा पक्ष आहे. पण तिथे मुख्यमंत्री नितीशकुमार आहेत. याच प्रकारे महाराष्ट्रातही भाजप मोठा पक्ष आहे. पण त्यानंतरही त्यांनी शिंदेना दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
शिवसेनेचा सर्वात मजबूत गड मुंबई व त्यालगतच्या म्हणजे मुंबई मेट्रोपोलिटन रीजन (एमएमआर) मानले जाते. एमएमआरमध्ये 7 मोठ्या महानगरपालिका, 60 विधानसभा जागा व लोकसभेच्या 10 जागा येतात. या जागांवर शिंदेंचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे शिंदेंच्या माध्यमातून भाजपला या भागात मोठा फायदा होऊन पक्षाचे मिशन 2024 चे स्वप्न साकार होऊ शकते.



No comments:
Post a Comment