हा "मुख्यमंत्री" शिवसेनेचा नाही, शहांनी शब्द पाळला असता तर हे सर्व सन्मानाने झालं असतं--उद्धव ठाकरे
भिवंडी, दिं,१, अरुण पाटील (कोपर) :
मुख्यमंत्रि पदाचा राजीनामा दिल्यानंतर उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद झाली. त्यात ठाकरे म्हणाले की, "आतापर्यंत मी गेली दोन-अडीच वर्षे फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून माझ्या जनतेशी बोलत आलो आहे. आज पहिल्यांदा फेस टू फेस बोलत आहोत. नव्या सरकारचं मी पहिल्यांदाच अभिनंदन केलं आहे. दोन-तीन विषय माझ्या मनात आहेत, मी जनतेसमोर मांडू इच्छितो."
अमित शहांनी मला दिलेला अडीच वर्षांचा शब्द पाळला असता तर हे सर्व सन्मानाने झालं असतं.आरेचा निर्णय बदलणे चुकीचे, कांजूरमार्गचेच कारशेड राहु द्या. माझ्या पाठीत सुरा खुपसला, तो मुंबईकरांच्या पाठीत खुपसू नका.लोक प्रतिनिधींना बोलवण्याचा अधिकार असला पाहिजे. लोकशाही मूल्ये जपली गेली पाहिजेत. मतदारांना आपलं मत कुठे फिरतंय हेच कळत नाहीये.
उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्या पद्धतीने हे सरकार स्थापन झालं, त्यांच्या लेखी तथा कथित शिवसेनेचा मुख्यमंत्री केला. मग हेच तर मी अडीच वर्षापूर्वी सांगत होतो की, शिवसेनेचा अडीच-अडीच वर्षांचा मुख्यमंत्री व्हावा. आज अडीच वर्ष झालेले आहेत. सन्मानाने अडीच वर्षे पूर्ण केले असते. शिवसेनेचा आधी किंवा भाजपचा आधी. त्यावेळी नकार देऊन आता होकार का दिला? जे भाजपसोबत गेले त्यांनी सुद्धा स्वतःला प्रश्न विचारा, शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणतात पण हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नाही. शिवसेने शिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री असू शकत नाही.
आरे कारशेडच्या निर्णयावर ते म्हणाले की, हा कुणाचा खासगी प्लॉट नाही. जंगलासाठी जमीन होती. एका रात्रीत झाडाची कत्तल झाली. मुख्यमंत्री होताच त्याला स्टे दिला. तो निर्णय मुंबईच्या विकासाच्या मध्ये अडसर नव्हता. मी पर्यावरणासोबत आहे. तरीही संभ्रम होत असेल तर विषय सोडलेला बरा. माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा विषय रेटू नका. आता काही दिवसांपूर्वी बिबट्या दिसला होता. झाडे गेली तरी वन्यजीव आहेत. आसपासचे वन्यजीव धोक्यात येईल. 800 एकरचे जंगल उखडून टाकले. आरेचा निर्णय रेटून घेऊ नका. जमीन नागरिकांची, महाराष्ट्राची आहे. मुंबईच्या महाराष्ट्राच्या हितासाठी वापरा. कांजूरला गेल्यानंतर बदलापूरलादेखील मेट्रो जाऊ शकते.
ठाकरे पुढे म्हणाले की, लोकशाहीचे चार स्तंभ असतात. चारही स्तंभांनी पुढे यायला हवे. लोकशाही कोसळली. तर स्तंभाला काही अर्थ राहणार नाही. कारण आपल्याकडे गुप्त मतदानाची पद्धत आहे. ज्यांनी मतदान केले त्याला तरी कळायला हवं. त्याचेच गुप्त मतदान राहत असेल तर लोकशाहीसाठी घातक. मतदाराला मत देऊन निवडून दिलेल्या प्रतिनिधीला बोलवून घेण्याचा अधिकार असायला हवा असे शिवसेना प्रमुख सांगायचे.
ठाकरे पुढे म्हणाले की, मतदारालाच कळत नसेल की मत आपले कुठे-कुठे फिरतंय, तर ते लोकशाहीसाठी घातक आहे. आझादीला 75 वर्षे झाली, पण लोकशाहीचे धिंडवडे निघत असतील, लोकशाहीमध्ये सर्वोच्च मतदाराचे मत, त्याचा बाजार असा मांडला जात असेल तर ते लोकशाहीला घातक आहे.

No comments:
Post a Comment