Tuesday, 1 November 2022

समता परिषद ३० वर्षांची झाली : प्रा. हरी नरके

समता परिषद ३० वर्षांची झाली : प्रा. हरी नरके


व्ही.पी.सिंग यांनी १३/८/१९९० रोजी मंडल आयोगाची अंमलबजावणी केली. तिथून मंडलपर्व सुरू झाले. निर्माणकर्ता समाज म्हणजे १२ बलुतेदार, १८ अलुतेदर, कारूनारू, कष्टकरी यांना प्रथमच राजकीय सत्तेत सहभाग मिळाला. पण त्यामुळे ब्राहमण, क्षत्रिय, बनिया लॉबी ओबीसींवर बिथरली. तिचा जळफळाट सुरू झाला. "तथाकथित पुरोगामी राजकीय विश्लेषक " पळ कांगावा आणि शी कर" व त्यांचे उपकृत कायम ओबीसी द्वेषाचे फुत्कार टाकू लागले. ते आजही चालूच आहे. सगळे उच्चजातीय विश्लेषक ओबीसींचा तिरस्कार करू लागले. (क्वचित अपवाद आहेत.. असतात.) त्याच काळात छगन भुजबळांनी मण्डल आयोगाला पाठिंबा दिला. त्यातून त्यांना शिवसेना सोडावी लागली. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आणि ते राज्याचे महसूलमंत्री बनले. श्री. शरद पवार यांच्या पाठिंब्यावर आणि नेतृत्वाखाली भुजबळांनी राज्यात आणि देशात चौफेर ओबीसी संघटन उभारण्याची कामगिरी केली. सुमारे ५ लाख छोट्या मोठ्या कार्यकर्त्यांना राजकीय सत्तेचे प्रशिक्षण मिळाले. त्यातून ओबीसी जागृतीची लाट आली. (या प्रक्रियेत आंबेडकरी चलवळीचे मोलाचे सहकार्य लाभले.)

१/११/१९९२ रोजी भुजबळांनी ओबीसी समाजाचे संघटन करण्यासाठी बैठक बोलावली. त्या बैठकीत संघटनेला "महात्मा फुले समता परिषद" हे नाव द्यावे असा प्रस्ताव मी स्वत: मांडला. तेव्हापासून गेली ३० वर्षे मी समता परिषदेच्या वाटचालीचा जवळून साक्षीदार आहे. अभ्यासक आहे. आज याबद्दल लिहायला हवे.

महात्मा फुले वाड्याचे राष्ट्रीय स्मारक बनवणे, नायगावला सावित्रीबाईंच्या जन्मस्थळी राष्ट्रीय स्मारक उभारणे, दिल्लीला संसदेच्या प्रांगणात महात्मा फुले यांचा पुतळा उभारणे, पुणे विद्यापीठात महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळे उभारणे, विद्यापीठाचे नामांतर आणि सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणे अशा असंख्य ऐतिहासिक कामांच्या कल्पना आणि अम्मलबजावणी यात मला समता परिषद व भुजबळ यांच्या नेतृत्वात (बॅनर खाली) आणि सोबत काम करता आले. 
देशपातळीवरील ओबीसी आरक्षण आणि ओबीसी जागृती, संघटन, प्रबोधन यात योगदान देता आले. ओबीसी जनगणना, ओबीसी बजेट, ओबीसी अस्मिता यातील ३० वर्षांच्या वाटचालीचा साक्षीदार आणि अभ्यासक म्हणून समता परिषदेच्या असंख्य नोंदी, आठवणी मला लिहिता येतील. राजकीय, सामाजिक परिवर्तन रेखाटता येईल. 

समता परिषदेचे निर्माणकर्ता समाजाच्या संघटन व प्रबोधनासाठीचे योगदान असाधारण आहे.

ओबीसीबद्दल बोलायला कालपर्यंत सर्व राजकारणी घाबरत होते. एकटे भुजबळ आणि समता परिषद बोलत होती. लढत होती. आज अनेकांना कंठ फुटलेत. कारण ओबीसी व्होटबँक तयार झालीय. 

ही प्रचंड मोठी कामगिरी समतेची आणि भुजबळांची आहे. याची शिक्षा म्हणून त्यांना टार्गेट केले गेले.

राजकीय निवडणुका लढवायला पैसा लागतो. प्रत्येकजण तो नाना मार्गांनी उभा करतो. (मी या मार्गाने पैसा उभा करण्याशी सहमत नाही,आणि म्हणूनच मी कोणत्याही राजकीय पक्षाचा सदस्य नाही. ) याला कुणीही राजकारणी वा पक्ष अपवाद नाहीत. पण अण्णा हजारे टोळी (यात सावकाश या, चाचा आणि अगदी क्रांतिकारक बगळे या सर्वांनी) संघ भाजपच्या दलालांच्या फुस लावण्यावरून फक्त ओबसी भुजबळांचा बळीचा बकरा केला. 

न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे. तिथे जो निकाल लागेल तो आम्ही मान्य करू. पण चाचा ते बगळे सगळ्यांनी भुजबळ दोशीच असल्याची बोंब मारली. त्याच्यामागे ओबिसीव्देश होता. ओबिसींसाठी काम करणारे सगळेच यांच्या नजरेत शत्रू असतात.

कारण तो गुलाम राहिला तर यांना फुकटात वेठबिगार, मजूर, अनुयायी मिळणार. 

त्यामागे यांचा धार्मिक व राजकीय व्यापार असतो. बुरखा मात्र भ्रष्टाचार निर्मूलन, निर्भय पत्रकारिता वगैरे असले तरी यांचे बोलवते धनी कोण आहेत ते आम्हाला माहीत आहे.

ओबीसी समाजाला समता परिषद व भुजबळ यांची कामगिरी आज ना उद्या कळेल. ओबीसींचे असे आणि इतके राजकीय व सामाजिक जागृती व संघटन यापूर्वी कधीही, कुणीही केले नव्हते. समता परिषदेची नोंद इतिहासाला घ्यावी लागेल.

शब्दांकन - अखलाख देशमुख 

No comments:

Post a Comment

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !!

चिंचोटी-कामण-खारबाव अंजुरफाटा ते माणकोली रस्त्याच्या कामातील अंदाधुंदी संदर्भात आंदोलनाचा इशारा !! भिवंडी, प्रतिनिधी : ठाणे जिल्...