शिवाई बालक मंदिर -डोंबिवली आयोजित विज्ञान व कलागुणांचे प्रदर्शन मोठ्या उत्साहात संपन्न !
ठाणे- उदय दणदणे
शालेय विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासला जावा व विज्ञान विषयात आवड निर्माण व्हावी आणि विद्यार्थ्यांमधील सृजनशीलता जोपासण्यासाठी शिवाई बालक मंदिर, डोंबिवली (पूर्व) शाळेत विज्ञान आणि मुलांच्या विविध कलागुणांचे प्रदर्शन मंगळवार दिनांक २९ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजित करण्यात आले होते.
सदर प्रदर्शन पूर्व प्राथमिक (छोटा शिशु ते बालवर्ग), प्राथमिक विभाग- इयत्ता १ ली ते ४ थी व ५ वी ते ७ वी, आणि माध्यमिक विभाग - इयत्ता ८ वी ते १० वी अशा ४ गटांमध्ये संपन्न झाले.
सदर प्रदर्शनामध्ये विज्ञान प्रदर्शन, भाज्यांची सजावट, फुलांची सजावट कृत्रिम फुलांची सजावट, रांगोळी प्रदर्शन, किल्ले बांधणी स्पर्धा अशा विविध स्पर्धांचा समावेश होता.
विज्ञान प्रयोगाचे परीक्षण रेखा पुणतांबेकर मॅडम (टिळक नगर) शाळेच्या माजी- प्राचार्या ) , कुमार हर्ष गांधी, मेघना फोंडके व सविता बावकर (अध्ययन संस्थेच्या -सदस्या) आदी परीक्षकांनी केले. त्याचप्रमाणे रांगोळी प्रदर्शन ,भाज्यांची सजावट, फुलांची सजावट, या स्पर्धांचे परीक्षण स्मिता वीरकर व कु.श्रद्धा भोसले यांनी केले. किल्ले बांधणी स्पर्धेचे परीक्षण महेश पाटील व रवी पाबळे आणि त्यांचे सहकारी यांनी केले.
पुणतांबेकर मॅडम यांनी महत्वपूर्ण माहिती देत सदर विज्ञान प्रदर्शन हे आधुनिकतेवर आधारित होते. अगदी लहानपणापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण व्हावी याकरिता शिशु बालवर्गापासूनच विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे उत्तम सादरीकरण केले होते. ज्या विद्यार्थ्यांनी प्रयोगाचे सादरीकरण केले, त्या विद्यार्थ्यांना त्या विषयाचे सखोल ज्ञान होते आणि त्या विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची चांगल्या प्रकारे उत्तरे दिली. प्रदर्शनाचे आयोजन उत्तम होते.
बालवर्गाच्या विद्यार्थ्यांनी *"ळ व ळी'* या अक्षरापासून अनेक शब्दखेळाचे उत्कृष्ट सादरीकरण केले, असे त्यांनी सांगितले व विज्ञान प्रदर्शनाचा निकाल जाहीर केला .
स्मिता वीरकर मॅडम या बालक मंदिर विद्यालय कल्याण येथे कला शिक्षक म्हणून त्या कार्यरत असून त्यांनी भाज्यांची आणि फुलांची सजावट अप्रतिम होती असा अभिप्राय देऊन निकाल जाहीर केला. स्पर्धेमध्ये माता पालकांनी आई आणि गृहिणी ही जबाबदारी सांभाळतानाच आपल्या कलागुणांना वाव मिळण्याकरिता वेळ काढून स्पर्धेमध्ये उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला त्याबद्दल त्यांचे कौतुक केले.
महेश पाटील - इतिहास अभ्यासक आणि माजी संचालक- अभिनव सहकारी बँक लिमिटेड डोंबिवली तसेच रवी पाबळे (जाणता राजा युवा प्रतिष्ठानचे- अध्यक्ष) आणि त्यांचे सहकारी यांनी किल्ल्यांचे वेगवेगळे प्रकार सांगून विद्यार्थ्यांना किल्ले बांधणी कशी करावी, याबद्दल मोलाचे मार्गदर्शन केले व विद्यार्थ्यांना कलाकृती करण्यास दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल शाळेचे आभार मानले.
प्रत्येक स्पर्धेचे प्रथम तीन क्रमांक आणि उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले. पूर्व प्राथमिक, प्राथमिक विभाग आणि माध्यमिक विभागातील सर्व विद्यार्थी आणि पालकांचा उत्स्फूर्तपणे सहभाग या प्रदर्शनामध्ये होता. अशा उत्साही वातावरणात सदर विज्ञान प्रदर्शन यशस्वी रीत्या संपन्न झाला.
No comments:
Post a Comment