Friday, 24 March 2023

आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत दापोलीतील आर जी पवार हायस्कूलची चमकदार कामगिरी !

आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेत दापोलीतील आर जी पवार हायस्कूलची चमकदार कामगिरी !

  कोकण (प्रसाद महाडीक/शांताराम गुडेकर) :

           छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियम बालेवाडी पुणे येथे फर्स्ट टेक चॅलेंज आंतरराष्ट्रीय रोबोटिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत आर.जी.पवार माध्यमिक शाळा माटवण तालुका दापोलीच्या विद्यार्थ्यांनी यशस्वी सहभाग घेतला.या स्पर्धेमध्ये भारतातील दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगलोर, गोवा, सुरत, लडाख, आसाम इत्यादी भारतीय संघांसोबतच रोमानिया, कझाकिस्तान, इस्रायल, रशिया इ. देशातील असे एकूण ७१ संघ सहभागी झाले होते. माटवण हायस्कूलच्या एकूण १३ विद्यार्थ्यांच्या चमूने या स्पर्धेत भाग घेतला आणि खूप कमी वेळात गतवर्षीप्रमाणे याही वर्षी चमकदार कामगिरी केली. सहा पैकी तीन सामने जिंकून या स्पर्धेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर आपला ठसा उमटवला. रोमानिया सोबत खेळताना अप्रतिम खेळाचे प्रदर्शन घडवत सामन्यावर रोमहर्षक विजय मिळवला. त्याचप्रमाणे रायझिंग स्टार या मानाच्या पुरस्कारासाठी संघाला नामांकन देखील मिळाले.
            या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणे ही अत्यंत खर्चिक बाब असून थोर स्वातंत्र्यसैनिक स्व.आर.जी.पवार यांचे नातू,, इन्फिनिटी एक्स कंपनीचे एम.डी श्री.अश्विन सावंत सर यांचे याकरिता बहुमोल सहकार्य लाभले.तसेच श्रीराम शिक्षण संस्था माटवण व सहभागी विद्यार्थ्यांच्या पालकांनी देखील आर्थिक मदत केली. शाळेतील इयत्ता दहावीची बॅच १९८९, बॅच १९९२ व शाळेतील शिक्षक श्री.अविनाश महाडिक सर यांनी स्पर्धेकरिता विद्यार्थ्यांना विशेष गणवेश उपलब्ध करून दिले. स्पर्धेपूर्वी शाळेत श्री. जयेश गौतम सर यांच्या मार्गदर्शनाखाली तीन दिवसीय प्रशिक्षण देण्यात आले. प्रत्यक्ष स्पर्धेदरम्यान श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. विजय पवार यांच्या बहुमोल मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित केला.
           अतिशय दिमाखात पार पडलेल्या या स्पर्धेसाठी अमेरिकेहून आलेले फर्स्ट कंपनीचे सीईओ विल्यम्स प्लासमदी यांनी देखील विद्यार्थ्यांची मनापासून प्रशंसा केली. सूर्यदत्ता कंपनीकडून विद्यार्थ्यांना भारताचा तिरंगा, चषक व सुवर्णपदकाने सन्मानित करण्यात आले. स्पर्धेकरिता संघाचे कोच म्हणून ग्रंथपाल श्री. विवेक महाडिक यांनी तर मेंटॉर म्हणून सौ. मानसी विवेक महाडिक व कु. सलोनी महाडिक यांनी काम पाहिले. या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक श्री. कोंडीकीरे सर यांनी विद्यार्थी, कोच व मेंटॉर यांचे विशेष कौतुक केले. या यशाबद्दल माटवण व टांगर पंचक्रोशी आणि संपूर्ण दापोली तालुक्यातून विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे .

No comments:

Post a Comment

*वडोदरा-जेएनपीटी महामार्गावर एरंजाडजवळ भीषण अपघात; दोघांचा जागीच मृत्यू, एक मुलगी गंभीर जखमी* *बदलापूर, दि. २१, प्रतिनिधी* : वडोदरा-जेएनपीटी...