तालुका कृषी अधिकारी अजय वगरे यांच्या उपस्थितीत माणगाव तालुक्यात यांत्रिक पद्धतीने भात लागवड प्रात्यक्षिक संपन्न !
बोरघर / माणगाव, ( विश्वास गायकवाड ) : माणगाव तालुक्यातील मौजे शिरवली तर्फे गोवेले येथे यांत्रिक पद्धतीने भात लागवडीचे प्रात्यक्षिक श्री. दाऊद हिदायततुला गालसुरकर यांचे क्षेत्रावर घेण्यात आले. यावेळी कुबोटा कंपनीचे प्रतिनिधी रमेश फाटक यांनी तालुका कृषी अधिकारी श्री अजय वगरे यांच्या उपस्थितीत या भात लावणी यंत्र बाबत प्रत्यक्ष भात लागवड करून प्रात्यक्षिक दाखविले . यावेळी त्यांनी या मशनरीची किंमत दोन लाख पन्नास हजार असून एक तासांमध्ये एक एकर भात क्षेत्र लागवडीखाली येते, दोन लिटर पेट्रोल एक एकर साठी आवश्यक आहे. या मशीनचे वजन १२५ किलो असून याला हायड्रोलिक चाके असल्यामुळे ते भात शेतीमध्ये चांगल्या प्रकारे चालते.
श्री.गालसुरकर यांनी सदरील मशीन खरेदी केले असून त्यांनी शिरवली तर्फे गोवेळे या गावामध्ये जवळजवळ ३० ते ३५ एकर क्षेत्र लागवडीखाली आणले असून जया या भात वाणाची लागवड केली आहे. माणगाव तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या भात लावणी यंत्राचा वापर करावा असे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले आहे.
या प्रात्यक्षिका वेळी तालुका कृषी अधिकारी माणगाव श्री अजय वगरे यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कोकणातील भात शेती खालील क्षेत्र कमी होत चालले आहे, याचे मुख्य कारण मजुरांची कमतरता हे आहे. या भात लावणी यंत्रासाठी महाराष्ट्र शासन कृषी विभाग महाडीबीटी कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ४० ते ५० टक्के अनुदान उपलब्ध आहे तरी माणगाव तालुक्यातील प्रगतशील शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपनी, शेतकरी समूह गट यांनी या यंत्राचा लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे. यावेळी मंडळ कृषी अधिकारी गोरेगाव श्री.ससाने, कृषी सहाय्यक सागर मॅडम, प्रियांका सावंत, प्रमोद शिंदे तंत्रज्ञान व्यवस्थापक, सुधाकर खडतर व इतर प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
No comments:
Post a Comment