Saturday 23 September 2023

नवी मुंबई पोलीस दलात अफवांचा बाजार !

नवी मुंबई पोलीस दलात अफवांचा बाजार !

          राज्यात सर्वत्र गणेशोत्सवाची धामधूम सुरू असताना देशाच्या आर्थिक राजधानीला लागून असलेल्या नवी मुंबई पोलीस दलात  सध्या अफवांचा बाजार भरला आहे. पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यापासून ते परिमंडळ-१चे उपायुक्तांच्या पर्यंत अफवांचे काहूर माजले आहे. या वावड्याचे जनक खात्यातीलच काही वसुली बहाद्दर असून आपल्या हवे ते 'नॅरेटिव्ह' सेट करण्यासाठीं उलट सुलट बातम्या पसरविल्या जात आहेत. 
आयुक्त भारंबे यांनी साईडला बदली मागितली आहे, ते दिर्घ रजेवर जाणार, 'झोन - वन' चे एक्स्टेनशन निश्चित झाले आहे,ते तेथुन हलणार नाहीत, अशा  पध्दतशीर वावड्या उठविल्या जात आहेत. गेल्या ८,९महिन्यांपासून अवैध धंद्याना बऱ्यापैकी लगाम बसल्याने ज्यांची  दुकाने बंद झाली आहेत.त्यांच्याकडून या कांड्या पिकविल्या जात आहेत.
गेल्या  जानेवारीपर्यंत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय  हे राज्यात वाईट अर्थाने चर्चिले  जाणारे पोलीस घटकाच्या यादीत अग्रस्थानावर  होते. अवैध धंदे ,बेकायदेशीर कामे आणि हप्ता वसुलीने महानगरात बजबजपुरी माजली होती. मात्र  नेतृत्व बदल झाल्यानंतर खात्यातील स्वच्छता मोहीमेने ‘टॉप गियर’ घेतला .अधिकाऱ्यात फारशी अकार्यक्षमता नसलीतरी त्यांचे मुख्य उद्देश कायदा व सुव्यवस्था राखणे, नागरिकांना  सुव्यवस्थित व सुरक्षितेतीची हमी देण्यापेक्षा केवळ वसुलीला प्राधान्य दिले जात होते. आपल्याकडे येणारा तक्रारदार, गैरतक्रारदार हे जणू सावज असल्याचा समज अति वरिष्ठ आणि प्रभारी अधिकाऱ्यानी करून घेतलेला होता. त्यांच्याकडून केवळ ‘अर्थ’कारणावर भर दिला जात असल्याने  एखाद्या हक्काच्या कामासाठी पोलीस मुख्यालयात पाऊल ठेवायचे तर खोके आणि पेट्यांची  तयारी करुनच जावे लागत होते. बेबंदशाही आणि अवैध धंद्यायचा सुळसुळाट सुरू झाल्याने अन्यायग्रस्त नागरिकांची  अवस्था  बिकट झालेली होती. त्यामुळे त्यांच्यातून कोणत्याही क्षणी  मोठा उद्रेक  होईल, अशी परिस्थिती निमार्ण झाली असताना डिसेंबरच्या मध्यावर मिलिंद भारंबे यांची आयुक्तपदावर  नियुक्ती  झाली. त्यांनी चार्ज  घेतलेल्या दिवसापासून आयुक्तालयातील कामाच्या  पद्धतीमध्ये  बदल दिसून येवू  लागला. शहरात अनाधिकृत ,खात्याला कलंक लावणारे काम व बेशिस्त खपवून घेतली जाणार नसल्याचा  सज्जड दम भारंबे यांनी सर्व प्रभारी अधिकाऱ्यांना पहिल्याच बैठकीत भरला होता.त्यामुळे  मध्यरात्री साडेतीन,४ वाजेपर्यत राजरोसपणे सुरु असणारे बीयर बार, परमिटरुमवाल्यांना वेळेचे निर्बंध लक्षात येवू लागले. पोलीस ठाण्यात  तक्रार देण्यासाठी येणाऱ्या अभ्यगंताना  त्यांच्या  आथिर्क सुबलतेवरून  नव्हे तर गुन्ह्याच्या   गांभिर्यांवरुन महत्व देण्यात येवू लागले.कोणतेही काम नियमात व वेळेच्या बंधनात  पूर्ण करण्याच्या  सूचना असल्याने  प्रलंबित तपास कामे व प्रकरणाच्या फाईली वेळेत पुढे सरकू लागल्या. नऊ प्रभारी अधिकाऱ्यांसह २४ पोलीस निरीक्षकांच्या  आयुक्तालयातर्गंत तडकाफडकी बदल्या केल्या.
गेल्या ९ महिन्यात आयुक्तालयातील बेकायदेशीर धंदे, नियमबाह्य बार, परमिटरुमला बऱ्यापैकी लगाम बसलेली आहे. तरीही 'गांधी'बाबाचा मोह कोणालाही सहजासहजी आवरता येत नाही. त्यामुळे  दोन नंबरवाल्यांनी आयुक्त वगळता अन्य  अधिकाऱ्यांवर  त्याची 'कृपा' कायम ठेवली असल्याने  अवैध धंदे काही प्रमाणात कायम आहेत. त्यांना ते पूर्वीप्रमाणे जोमाने सुरू करावयाचे असल्याने त्यामध्ये मुख्य अडसर असलेल्या भारंबे यांच्याबद्दलच उलटसुलट वावड्या उठविल्या जात आहेत. कौटुंबिक कारणास्तव आयुक्तांनी बदलीसाठी अर्ज केला आहे गणेशोत्सव नंतर ते दीर्घ रजेच्या सुट्टीवर जाणार आहेत त्यांचा पदभार  'एसीबी'तील एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पदभार सोपविला जाईल, त्यानंतर सर्व व्यवहार पुर्वीप्रमाणेच  सुरू होईल, अशा  अनेक अफवांचे पेव फुटले आहे. त्याचबरोबर पुढील महिन्यात होणाऱ्या 'मपोसे' उपायुक्त,अप्पर अधीक्षक दर्जाच्या  अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये झोन -१च्या उपायुक्ताचा समावेश नाही.  ठाण्यातील राज्यकर्ते 'पिता-पुत्रां' वरदहस्त असल्याने त्यांना मुदतवाढ मिळणार आहे ,अशी चर्चा आहे चालवली जात आहे जेणेकरून त्यांच्या हद्दीत होत असलेले  वसुलीचे 'रेट कार्ड' वाढविले जाईल. वास्तविक आयुक्त भारंबे हे अत्यंत कर्तव्यदक्ष असल्याने ते आपल्यावर सोपविलेली जबाबदारी मोठ्या विश्वासाने  योग्य पद्धतीने पार पाडतात. त्यामुळे सद्या त्रिशंकू सरकार , सेनेच्या आमदारांच्या अपात्रतेबाबत सूरू असलेल्या सुनावणीमुळे काहीशी राजकीय अस्थिरता निर्माण झाली असताना ते नवी मुंबईतील  कार्यकाळ पूर्ण झाल्याशिवाय येथून हलणार नाहीत, तसेच या परिस्थितीत  त्यांना बदलण्याचा धोका  गृहखात्याचा कारभार सांभाळत असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणत्याही परिस्थितीत घेणार नाहीत . त्याचबरोबर "ठाणेकरां'चा कितीही दबाव असलातरी या आधिकाऱ्याना मुदतवाढ दिली जाणार नाही, असे गृह विभागातील  अतिवरिष्ठ अधिकाऱ्यांकडून स्पट करण्यात आले.
------------------------
      आयुक्तांच्या गैरहजेरीत त्यांच्या नावे मोठी वसुली

 पोलीस आयुक्त मिलिंद भारबे हे  हैदराबादला प्रशिक्षणासाठी गेले होते. तेंव्हा साहेबांकडून नवी मुंबईत ऑनलाईन  लॉटरी सुरू करून देतो ,असे आश्वासन देऊन एका उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्याने  एक कोटी घेतले,मात्र अद्यापही त्यासाठी हिरवा कंदील न मिळाल्याने दिलेली रक्कम परत घेण्यासाठी संबंधित व्यक्ती अधिकाऱ्याच्या कार्यालयात येरझाऱ्या घालत  आसताना  त्याला टाळले जात आहे  आयुक्तांनी याबाबत सखोल चौकशी करून संबंधितावर कारवाई करावी ,अशी मागणी होत आहे. 
-जमीर काझी ,
बेलापूर, नवी मुंबई,  
दि.२२ सप्टेंबर २०२३

No comments:

Post a Comment

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !!

महाविकास आघाडी चे उमेदवार यांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष /आयटक.. चा पाठिंबा !! चोपडा, प्रतिनिधी.. गेल्या दहा वर्षापासून सत्तेत असल...