सणासुदीच्या काळात भेसळयुक्त मिठाई विक्रेत्यांवर कठोर कारवाई करावी - 'सुराज्य अभियान'ची प्रशासनाकडे मागणी !!
**प्रशासनाकडून कारवाईची हमी
उरण दि १७, (विठ्ठल ममताबादे) :
दीपावलीच्या पार्श्वभूमीवर मिठाई आणि गोड पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढते. या मागणीचा गैरफायदा घेत खवा, मावा यांमध्ये भेसळ केली जाते, ज्यामुळे नागरिकांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण होतो. याच पार्श्वभूमीवर 'सुराज्य अभियान'च्या वतीने रायगड येथील जिल्हाधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. जिल्हाधिकारी यांच्या वतीने तहसीलदार शितल रसाळ यांनी निवेदन स्वीकारले. या निवेदनाची प्रत पेण येथील सहाय्यक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन (FDA) यांनाही देण्यात आली.यावेळी सदर कार्यालयाकड़ून गेल्या १ महिन्यात भेसळयुक्त पदार्थाविरोधात केलेल्या कारवाईविषयी त्यांनी स्पष्ट केले.
'सुराज्य अभियान' दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, फूड सेफ्टी ऍण्ड स्टॅंडर्ड्स ऍक्ट, २००६ (FSS Act) नुसार शासनाने नागरिकांना निरभेसळ आहार देण्याची हमी दिलेली आहे. त्यामुळे प्रशासनाने सणासुदीच्या काळात मिठाई व खवा उत्पादन केंद्रांवर अचानक तपासणी मोहीम राबवावी, खवा व गोड पदार्थांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवून अहवाल सार्वजनिक करावा, भेसळ आढळल्यास संबंधितांचे परवाने रद्द करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी. यासोबतच नागरिकांमध्ये जनजागृतीसाठी पत्रके, प्रसारमाध्यमे यांचा उपयोग करावा तसेच बाजारपेठेत टेस्टिंग बूथ्स उभारावेत, अशा मागण्या करण्यात आल्या. सदर निवेदन देताना सुराज्य अभियानचे जिल्हा समन्वयक अधिवक्ता उमेश आठवले, नितीन गावंड, सचिन शिपाई, सनी शिपाई आणि कु. दिक्षा म्हात्रे आदी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते. शासनाकडे भेसळ करणाऱ्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली असल्याची माहिती राजेंद्र पावसकर सुराज्य अभियान, रायगड जिल्हा समन्वयक हिंदू जनजागृती समिती यांनी दिली आहे.
No comments:
Post a Comment