Saturday, 6 December 2025

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यंदाही दादर जुना फुल बाजार व दादर कट फ्लावर्स असोसिएशनतर्फे चैत्यभूमीकडे येणाऱ्या- जाणाऱ्या अनुयायांना अल्पोहार वाटप करण्यात आले. गेली तब्बल १२ वर्षे सुरू असलेल्या या उपक्रमात यंदा सुमारे ५ हजार वडापाव वाटप करण्यात आले. 

यावर्षी प्रथमच केशवसुत उड्डाणपुलाखाली फुल-हार विक्री करणाऱ्या महिलांकडून पाणी वाटपाचीही व्यवस्था करण्यात आली. अनुयायांच्या सोयीसाठी केलेल्या या सेवाकार्यात स्वयंसेवकांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. 

या उपक्रमाचे मुख्य आयोजक सोपान शेठ दुराफे, अभिजित दुर्वे, विनोद केदार, गजानन गावडे, गणेश मोकल, दीपेन सयानी यांच्यासह असोसिएशनचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. महापरिनिर्वाण दिनानिमित्त समाजसेवेचे व मानवी मूल्यांचे दर्शन घडविणारा हा उपक्रम अनुकरणीय ठरला.

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न !!

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त कर्मचा-यांचे पहिले स्नेहसंमेलन संपन्न !!

मुंबई (शांताराम गुडेकर)

केंद्रीय लोक निर्माण विभागातील सेवानिवृत्त अधिकारी - कर्मचा-यांचे पहिला स्नेहमेळावा, ठाणे पश्चिम, येथील क्लब  हाऊस, दोस्ती विहार, फोखरण रोड नं 1 येथे मोठ्या उत्साहात  संपन्न झाला. 

अरविंद आगाशे यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. गोवा, मुंबई, पालघर, पुणे, विरार, आदी विभागातून अनेक सेवानिवृत्त कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. चित्रपट अभिनेत्री सोनाली बेंद्रे यांचे वडील -ए. व्ही बेंद्रे हे वयाच्या ९१ वर्षी उपस्थित होते त्यांचे कौतुक व सन्मान करण्यात आला. तसेच वय वर्षे ८१ पूर्ण केलेल्या - डी. बी वाघमारे, एस. एस  नातू,  नारायण पितांबरम, हेमन खिलनानी, बी. डी. माणगांवकर व आर. डी. उपाध्याय यांचाही सत्कार करण्यात आला. उपस्थित सेवानिवृत्त कर्मचा-यांनी अभंग, चित्रपट गीते, लावणी, नृत्ये सादर करून फारच मनोरंजन करून धमाल केली. 

प्रस्तावना  - सोनाली भांगले, माधुरी सारंगपाणी व दीपक खोत यांनी सूत्रसंचालन व आभार अरविंद आगाशे यांनी मानले.

Thursday, 4 December 2025

'व्हाईस ऑफ मिडिया’चा कोकण मुंबई अध्यक्ष, पत्रकार अरुण ठोंबरे व भुजंगराव सोनकांबळे यांना अटक !!

 'व्हाईस ऑफ मिडिया’चा कोकण मुंबई अध्यक्ष, पत्रकार अरुण ठोंबरे व भुजंगराव सोनकांबळे यांना अटक !!
 
कापूरबावडी पोलिस स्टेशन, ठाणे यांची कारवाई 

ठाणे : कापूरबावडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल झालेल्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यात ‘व्हाईस ऑफ मिडिया’ या पत्रकार संघटनेचे कोकण-मुंबई अध्यक्ष अरुण सदाशिव ठोंबरे तसेच भुजंगराव नागराव सोनकांबळे यांना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई ०४ डिसेंबर २०२५ रोजी करण्यात आली असून, आरोपींच्या नातेवाईक व मित्रांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ मधील कलम ४८ अंतर्गत अधिकृत सूचना बजावण्यात आल्या आहेत.

कापूरबावडी पोलीस ठाण्यात दाखल गुन्हा रजिस्टर क्रमांक ८६४/२०२५ अंतर्गत आरोपींविरोधात बीएनएस २०२३ चे कलम ३०८(५), ११८(१), ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पहिला आरोपी अरुण सदाशिव ठोंबरे (वय ५८, रा. चिखोली, अंबरनाथ पश्चिम) हा ‘व्हाईस ऑफ मिडिया’ संघटनेचा कोकण-मुंबई विभागाचा अध्यक्ष असून, त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या अटकेची माहिती देण्यासाठी त्याचा मित्र सुरेश बजरंग जगताप (वय ५२, व्यवसाय – पत्रकार, रा. उल्हासनगर) यांना अधिकृत सूचना बजावण्यात आली आहे. ठोंबरे यांना पुढील कारवाईसाठी प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी, न्यायालय क्रमांक २, ठाणे येथे हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीच्या वतीने वकील नेमून जामीन प्रक्रियेसाठी कार्यवाही करण्यात यावी, असेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे.

याच गुन्ह्यातील दुसरा आरोपी भुजंगराव नागराव सोनकांबळे (वय ३७, रा. वर्तकनगर, ठाणे पश्चिम) यालाही अटक करण्यात आली असून, त्याची बहीण उषा मनोज जाधव (वय ३५, रा. मनोरमा नगर, ठाणे पश्चिम) यांना देखील अधिकृत सूचना देण्यात आली आहे. त्यालाही लवकरच न्यायालयात हजर करण्यात येणार असून, जामीन प्रक्रियेसाठी वकील नेमण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, आरोपी अरुण ठोंबरे यांच्याविरोधात यापूर्वीही म.फु.चौ. पोलीस ठाणे, कल्याण येथे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२४ रोजी गुन्हा क्रमांक ११६१/२०२४ अंतर्गत भा.न्या.सं. कलम ३५६(१), ३५६(२), ३५६(३) तसेच ॲट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात त्यांचा सहकारी मित्र सुरेश जगताप हाही आरोपी आहे.

ही संपूर्ण कारवाई कापूरबावडी पोलीस ठाण्याचे तपास अधिकारी व पोलीस उपनिरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली असून, पुढील तपास सुरू आहे. या अटक कारवाईमुळे ठाणे शहर आणि परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

मानवता आभियान संस्थे मार्फत दिव्यांग दिन साजरा !!

मानवता आभियान संस्थे मार्फत दिव्यांग दिन साजरा !!

दिनांक - ३ डिसेंबर,२०२५ रोजी उल्हासनगर कॅम्प ४ येथे मानवता अभियान संस्थे मार्फत आंतराष्ट्रीय दिव्यांग दिवस साजरा कारण्यात आला. या वेळी संस्थेच्या संचालक निवेदिता जाधव यांनी दिव्यांग दिनाचे महत्व सांगत माहिती दिली व प्रा. विकास जाधव यांनी दिव्यांग व्यक्तींच्या सन्माना बद्दल व अधिकार या जागृती वर मार्गदर्शन केले त्याच बरोबर  सामान्य व्यक्ती ची दिव्यांगा प्रती कर्तव्य या बद्दल ची माहिती दिली. 

यावेळी भारतीय मानवधिकार परिषद उल्हासनगर शहर चे अध्यक्ष अभिजीत भाऊसाहेब चंदनशिव व दिव्यांग संघटनेचे राजेश साळवे व बहुजन समाज पक्षाचे प्रमोद गायकवाड, प्रफुल्लता मोहोड, ब्ल्यू रिव्हॉलुशन चे श्याम चंदनशिव उपास्थित होते. तसेच परिसरातील सर्व दिव्यांग बांधव या कार्यक्रमास उपस्थित होते. सर्व उपस्थिताना संविधान प्रस्तावने ची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. राजेश साळवे यांनी आभार व्यक्त केले.

Wednesday, 3 December 2025

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला !!

कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." शनिवारी दादरला !!

मुंबई (शांताराम गुडेकर) :

           मुंबई ही मायानगरी मानली जाते. येते हवशे- नवशे येतात आणि आपले अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत असतात. तसाच प्रयत्न आपले पंजोबा,आजोबा मग वडील जसे मुंबईत पुर्वी एकत्रीत मिळून खोली घ्यायचे आणि मग त्यात सोबत रहायचे. एकमेकांना सुख-दुःखात आधार असायचा, आता तर महागाई आणि आजारपण येवढे भरमसाठ वाढले आहेत त्याला सिमा उरलीच नाही यात आपला बांधव, सहकारी भरडला जात असेल, त्याला मुंबईत वास्तव्य करण्यासाठी रहाण्याची सोय नसेल त्याला येणाऱ्या अडीअडचणीला अपेक्षित तात्काळ आर्थिक सहाय्य उपलब्ध होत नसेल तर त्याचा उदरनिर्वाह धकाधकीच्या जीवनात चालणार कसा, हाच मुळ गाभा लक्षात घेऊन दिनांक - १२ नोव्हेंबर २०१७ या वर्षी या जनहित आधार हेल्प फंड ची स्थापना करण्यात आली.
         स्वप्न पहावित पण ती पुर्ण होतीलच असे नाहीत परंतु जनहित आधार हेल्प फंड याला अपवाद ठरला. त्यांनी स्वप्न पाहिले आणि ते साकार करण्यासाठी जिद्द धरली होती ती मुंबईत स्वत:च्या मालकी हक्काची एखादी खोली असावी आणि ते स्वप्न सत्यात उतरविले. विक्रोळी सुर्यनगर येथे जनहित आधार हेल्प फंड यांनी स्वतःच्या मालकीची खोली घेऊन पाहिलेले स्वप्न पुर्ण केले.
          आजारपण कोणालाही सांगून येत नाही,जनहित आधार हेल्प फंड हा अनेक रूग्णांसाठी आर्थिक सहकार्यारूपी नवसंजीवनी बनुन काम करत आहे. आज तागायत यांनी १०,०००/-  ते ५०,०००/- एवढी मोठी रक्कम एक हाती रुग्णांना देऊन त्याचा परतावा ही कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त दर न लावता घेतला आहे.
           मराठी शाळा वाचायला हव्यात असे प्रत्येकाला मनापासून वाटतं, परंतु त्या वाचण्यासाठी आपण खारीचा वाटा म्हणून सहभागी किती होतो यावर अवलंबून असते. असाच खारीचा वाटा उचलला तो जनहित आधार हेल्प फंड यांनी शाळेतील मुलांना गर्मी आणि अंधुक प्रकाश ही वारंवार भेडसावणारी समस्या आवश्यक विद्युत उपकरणे देऊन दूर केली. त्यामध्ये एल ई डी ट्युब लाईट आणि पंखे व इतर साहित्य जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा, वाकी. ता. गुहागर, जि. रत्नागिरी. या शाळेतील शिक्षकांना स्वतंत्र दिनानिमित्ताने सुपुर्द केले.तसेच प्रति वर्षी शाळेतील मुलांना १५ ऑगस्ट आणि २६ जानेवारी ला खाऊ वाटप करताना या हेल्प फंडातील सभासद स्वतः शाळेत हजर असतात.
           कोरोना सारख्या महाभयंकर महामारी आधी सुरू असलेल्या अनेक छोट्या मोठ्या संस्था, फंड, बीसी यांसारखे आर्थिक सहकार्य करणारे मार्ग कोरोना काळात लोप जरी पावले असले तरी जनहित आधार हेल्प फंड हि संस्था कोणत्याही परिस्थितीत डगमगली नाही. यातील सर्व सभासदांनी सुरूवातीच्या काळात स्वतःच्या खिशाला कात्री लावली मात्र यश खेचून आणलेच. 

         अशी ही जनहित आधार हेल्प फंड संस्था सामाजिक व शैक्षणिक बाजू सांभाळत असताना आता मात्र सांस्कृतिक सहभाग घेण्यासाठी सज्ज होत आहे.शनिवार दिनांक - ०६ डिसेंबर २०२५ रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज मंदिर नाट्यगृह, दादर येथे सामाजिक आणि शैक्षणिक मदतीकरीता कलारंग प्रॉडक्शन्स प्रस्तुत व कोकणी निखिल निर्मित आणि जनहित आधार हेल्प फंड आयोजित दोन अंकी कॉमेडी नाटक "गाव गोंधळ..." या नाटकाचे आयोजन केले आहे.रसिक हो आपण हे नाटक पहाण्यासाठी आणि सामाजिक व शैक्षणिक मदतीकरीता तिकीट घेऊन नाटकाचा आनंद घ्यावा असे आवाहन जनहित आधार हेल्प फंड तर्फे करण्यात आले आहे.

“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – बहिणाबाईं चौधरींच्या स्मृतिदिनाला मोठी उपस्थिती‌ !!


“बहिणाबाईंच्या कवितांनी आणि घोषणांनी दुमदुमले उद्यान – बहिणाबाईं चौधरींच्या स्मृतिदिनाला मोठी उपस्थिती‌ !!

डोंबिवली, प्रतिनिधी : डोंबिवली पूर्व, सुनील नगर येथील कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या मालकीच्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात आज बुधवार, दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी कवयित्री बहिणाबाई नथुजी चौधरी यांचा ७५ वा स्मृतिदिन कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस पुष्पहार व फुले अर्पण करून उद्यानात व्यायामसाठी नियमित येणाऱ्या ज्येष्ठ नागरिक सरोजिनीताई पाटील यांच्या शुभहस्ते कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यानात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीचे सदस्य श्री कृष्णा मारुती सोमार्डे सर यांनी केले. याप्रसंगी उपस्थितांनी “कवयित्री बहिणाबाई चौधरी अमर रहें!”,

“बहिणाबाईंची लेखणी – महाराष्ट्राची शान!”
“ग्रामीण संस्कृतीची अभिमान, कवयित्री बहिणाबाई महान!” 
या घोषणांनी उद्यानाचा परिसर दुमदूवून टाकला.

कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीच्या वतीने सलग दुसऱ्या वर्षी बहिणाबाईंचा स्मृतिदिन सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.

सदर उद्यानात दररोज सकाळी ते संध्याकाळपर्यंत परिसरातील शेकडो ज्येष्ठ नागरिक, महिला, पुरुष तसेच लहान मुले व्यायाम, चालणे व खेळण्यासाठी येत असतात. नियमित व्यायाम करणाऱ्या नागरिकांनी एकत्र येऊन "कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समिती" हा व्हाट्सअप समूह तयार केला असून समितीच्या वतीने बहिणाबाईंचा जन्मदिन, स्मृतिदिन तसेच काही मोजके सण लोकवर्गणीतून साजरे केले जातात.

या स्मृतिदिनानिमित्त आज सकाळी आयोजित अभिवादन कार्यक्रमासाठी हास्य कवियत्री व डोंबिवलीकर रहिवासी माननीय सौ. लताताई पाटील यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते. त्यांनी बहिणाबाईंच्या जीवनातील काही संस्मरणीय प्रसंग कथन केले तसेच अनेक लोकप्रिय कविता सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले.

सदर कार्यक्रमात कवयित्री बहिणाबाई चौधरी उद्यान व्यायाम समितीमधील महिला वर्गाच्या वतीने लताताई पाटील यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. तर सदरचे उद्याना मधील पडणारा प्लास्टिकचा कचरा नित्य नियमाने उचलणारे श्री केशव करकेरा यांचा समितीचे सदस्य श्री कोटियन (दिव्यांग बांधव) यांच्या शुभहस्ते जागतिक अपंग दिनाचे औचित्य साधून पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उद्यानामधील सर्वात ज्येष्ठ असलेल्या सरोजिनीताई पाटील यांचा देखील बहिणाबाई उद्यान व्यायाम समितीच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

अभिवादन कार्यक्रमाचे सुव्यवस्थित सूत्रसंचालन माजी नगरसेवक व सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कार्यालयाचे श्री. प्रकाश माने यांनी केले.

या कार्यक्रमाला प्रदीप पवार, विक्रम म्हात्रे, शरदचंद्र जोशी, हेमंत बारस्कर, सार्थक चव्हाण, सौ. प्रतिक्षा माने, सौ. यशोदा करकेरा, केशव करकेरा, सुरेश भुवड, श्रीकांत काळे, शशिकला महानूर, आनंदा नेने, टी आर कुंभार, किशोर वाणी, डी बी चिरमडे, अल्फेंसा सिग्युरा, सत्यविजय साईल, हेमंत म्हापणकर, चिंतामण भडसावळे, बाबू वारके, संदीप देवकर, रघुनाथ राणे, फुलचंद माळी, संदीप शेट्टी, संगम भुजबळ, सार्थक चव्हाण, प्रमोद शेट्ये, यशोदा करकेरा,  केशव करकेरा, दीपक पाटील, प्रसाद सावंत, भगवान सातपुते, निवृत्ती पाडवेकर, रेखा गुप्ता, शार्दुल जोशी, गिरीश कुलकर्णी, अक्षय शहा, ममता तिवारी, जितू ठक्कर, अर्चना शिरोडकर, वंदना झाडे, माधुरी कोरडे, श्रीकृष्ण वाणी, शैलेंद्र कमलाकर, सुनीती पुचेरकर, नंदा शाळीग्राम, मेघा ठोंबरे, गीता निवळकर, स्नेहा भोसले, मंदा ठाकूर, अनंत पाटील, परशुराम म्हात्रे, घनश्याम मालवी तसेच व्यायाम समितीचे साधारण १०० पेक्षा अधिक महिला व पुरुष सदस्य उत्साहाने उपस्थित होते.

सौजन्य - प्रकाश शांताराम माने (मा. नगरसेवक)

Tuesday, 2 December 2025

कोकण सुपुत्र सुशांत आगरे यांच्या कडून पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई !!

कोकण सुपुत्र सुशांत आगरे यांच्या कडून पॉवरलिफ्टिंगमध्ये भारतासाठी सुवर्ण पदकाची कमाई !!

प्रतिनिधी - निलेश कोकमकर 

कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुका मधील रावारी गावाचा सुपुत्र आणि भारतीय पॉवरलिफ्टिंग संघाचा कर्णधार कुमार सुशांत सोनू आगरे याने खडतर परिस्थितीवर मात करत अतुलनीय मेहनतीच्या जोरावर जगाला आपली ताकद दाखवली आणि भारतासाठी सुवर्ण पदक मिळवून देण्याचे मोलाचे काम केले आहे.

      श्रीलंका (कोलंबो) येथे २७ ते ३० नोव्हेंबर २०२५ दरम्यान झालेल्या वर्ल्ड पॉवरलिफ्टिंग चॅम्पियनशिपमध्ये १२ देशांच्या स्पर्धकांमध्ये ६९ किलो वजनी गटात तब्बल २२२ किलो वजन उचलून भारताच्या नावावर सुवर्ण पदक पटकावण्याची उत्तम कामगिरी  केली. रावारी गावाचा अभिमान. गावच्या मातीत आणि सामान्य शेतकऱ्याच्या घरी जन्म, लांजा तालुका – रत्नागिरी जिल्हा येथील साधं आयुष्य, गावी शिक्षण पूर्ण करून मुंबईत काकांकडे राहून नोकरीसोबत पॉवरलिफ्टिंग मध्ये सातत्य ठेऊन , मेहनत आणि जिद्दीने सहभाग घेत आणि त्या मेहनतीचं फळ आज जागतिक पातळीवर सुवर्ण यशात रूपांतर. तसेच हे यश मेहनत, शिस्त, जिद्द आणि असामान्य क्षमतेचे प्रतीक आहे. 

        कुणबी पाऊल पडते पुढे आणि तू प्रेरणा आहेस नव्या पिढीची आणि  हा सुवर्ण क्षण संपूर्ण कुणबी समाजासाठी, महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी अभिमानाचा आहे. अशा प्रकारे कु. सुशांत सोनू आगरे यांच्यावर अनेक स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा येत आहे.

Monday, 1 December 2025

देशप्रेमावरील मुशायऱ्याने रंगले सर्व धर्म स्नेह संमेलन !

देशप्रेमावरील मुशायऱ्याने रंगले सर्व धर्म स्नेह संमेलन !

ठाणे, दि. १,

समतेचा, बंधुत्वाचा आणि धर्मनिरपेक्षतेचा अधिकार जनतेला देणाऱ्या संविधानाच्या निर्मितीला ७५ वर्षे पूर्ण झाल्याचे औचित्य साधून व थोर समाज सुधारक महात्मा जोतिबा फुलेंच्या १३५ व्या स्मृतिदिनानिमित्त, समता विचार प्रसारक संस्थेचे १५ वे वार्षिक सर्व धर्म स्नेह संमेलन ठाण्यातील मो. ह. विद्यालयात जल्लोषात पार पडले. राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील ९ मुलींनी शिक्षिका नूरजहाँ मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मजहब नहीं सिखाता आपस मे बैर रखना...’ या थीमवर प्रभावी मुशायरा सादर करत उपस्थितांची मन जिंकली. कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी संस्थेचे उपाध्यक्ष सुनील दिवेकर होते. संस्थेच्या कार्यकर्ता व बुरोंडकर शाळेच्या मुख्याध्यापिका फरहाना शेख यांनी कार्यक्रमाचे खुमासदार सूत्र संचालन केले. 

मुंब्र्यातील अल नदी उल फलाह शाळेचे मुख्याध्यापक व सेवाधाम संस्थेचे कार्यकर्ते झोएब मुनीब शेख यांनी इस्लाम धर्माच्या शिकवणुकीबद्दल मुलांना माहिती दिली. ते म्हणाले, धर्म आपल्याला जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. द्वेषाने नव्हे तर प्रेमाने आणि विवेकाने धर्माची शिकवण आचरणात आणली तर आपलं आयुष्य फुलासारखं फुलून येतं, समाधानी बनतं. संस्थेच्या अध्यक्ष हर्षलता कदम यांनी बौद्ध धर्माबद्दल माहिती सांगताना गौतम बुद्धाच्या आयुष्यातील प्रसंग वर्णन केले. त्या म्हणाल्या, शांतता, समता आणि प्रेमाचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धाने, लढाईने नव्हे तर चर्चेने, सामोपचाराने समस्या सोडविण्याची शिकवण दिली. उपास तापास न करता मनावर ताबा ठेवावा, राग, द्वेष अशा नकारात्मक भावनांना आवर घालावा, ध्यान धारणा करत मन:शांति मिळवावी. खरं ज्ञान हे आत्मचिंतनातूनच मिळतं. हीच बौद्ध धम्माची शिकवण आहे आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी याच साठी बौद्ध धम्माला पुनर्जीवित केले. प्रास्ताविकात संयोजक मनिषा जोशी यांनी सध्यस्थितीत धर्म जातीच्या आधारावर द्वेष पसरवला जात असतांना अशा संमेलनातून संस्था संविधानातील समता, लोकशाही व धर्मनिरपेक्षतेची मूल्ये रुजवण्याचे काम करीत असल्याचे सांगितले. 

सर्व धर्मातील कंत्राटी कामगारांची परवड

ठाण्यातील कंत्राटी कामगार महिलांशी संस्थेच्या विश्वस्त मीनल उत्तुरकर यांनी संवाद साधून त्यांचे अनुभव, त्यांच्या समस्या लोकांसमोर आणल्या. ठाण्याच्या मानसिक रुग्णालयात काम करणाऱ्या अनिता कुंभावत आणि ठाणे महानगर पालिकेच्या शाळेत सफाई काम करणाऱ्या साबेरा बशीर सौदागर यांनी काम करताना येणारे हलाखीचे अनुभव विशद केले. कंत्राटदार पगार देताना पिळवणूक करतात याबद्दल बोलतांना त्यांनी सांगितले की, किमान वेतन मिळत नाही. अनेकदा वेळेवर पगार मिळत नाही. ग्रॅच्युइटी, फंड, आरोग्य सुविधा देत नाहीत. वर समाजही सफाई कामगार म्हणून तुच्छतेने वागवतो. अनिता कुंभावत यांनी मेंटल हॉस्पिटल कामगारांना कराव्या लागलेल्या बेमुदत उपोषणाची हृदयद्रावक कहाणी सादर केली तेंव्हा सर्वजण हेलावून गेले. सफाई व अन्य कंत्राटी कर्मचाऱ्यांची अशी परवड होत असतांनाही नियमित काम करतात म्हणून शहराचे आरोग्य शाबूत रहाते, अशा शब्दात या कामगारांच्या कतृत्वाचा मीनल उत्तुरकरांनी गौरव केला. कळवा येथील भीम नगर वस्तीतील मुलींची ‘कारी कारी...’ या गीतावर छान समूह नृत्य सादर केलं. ‘मीडिया भारत न्यूज़’ या वेब पत्रिकेचे संपादक व कायद्याने वागा लोकचळवळीचे राज असरोंडकर आणि समाधान पवार यांनी हिंदी चित्रपटातील समतेच्या मूल्यांवर आधारित फिल्मी गीते सादर करून मजा आणली. 

स्पर्धांमधील सहभागी व विजेत्यांना बक्षिसे

संस्थेतर्फे घेतलेल्या हिरजी गोहिल क्रीडा जल्लोषातील क्रिकेट, कबड्डी, कॅरम, बुद्धिबळ आणि चित्रकला या खेळातील सहभागी खेळाडूंना व विजेत्यांना पदके आणि प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. कबड्डी विजेता जय भीम नगर, तर उपविजेता किसन नगर ठरले. क्रिकेट विजेते कळवा – मुंब्रा संघ तर उपविजेते कळवा येथील म. फुले नगर होते. उत्कृष्ट गोलंदाज व फलंदाज म्हणून जय कोळी व जल्पेश यादव यांना गौरवण्यात आले. मुलींच्या कबड्डीत अण्णाभाऊ साठे नगर व मानपाडा या संघांना पुरस्कार मिळाला. चित्रकलेत प्रथम पारितोषिक शैझीन शोएब शेखला मिळाले तर दुसरे व तिसरे बक्षीस इशरत शेख व आफिया शेख यांनी पटकावले. कॅरम मध्ये प्रज्ञेश मडके व नानक बेदी तर बुद्धिबळात जोगिंदर बेदी व मेघा कांबळी विजेते व उपविजेते ठरले. राबोडी फ्रेंड्स सर्कलचे विश्वस्त सैद सर, चळवळीतील कार्यकर्ते अविनाश कदम व संस्थेच्या सचीव लतिका सु. मो. आदी मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले. 

कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक डॉ. संजय मंगला गोपाळ, भारत जोडो अभियान चे सुब्रतो भट्टाचार्य, वृषाली कुलकर्णी,अनेक पालक व हितचिंतक मोठ्या संख्येने हजर होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक जगदीश खैरालिया यांचे महत्त्वाचे योगदान होते. एकलव्य कार्यकर्ते अजय भोसले, ऋतुराज परह्यार, किशन बेदी, राबोडी फ्रेंड सर्कल शाळेतील शिक्षिकांनी विशेष मेहनत घेतली.

मीनल उत्तुरकर
विश्वस्त, समता विचार प्रसारक संस्था 
9833113414

उद्योजिका शमा कपिल केसकर (बुटाला) यांना "कोकण रत्न पदवी-२०२५" जाहीर !!

उद्योजिका शमा कपिल केसकर (बुटाला) यांना "कोकण रत्न पदवी-२०२५" जाहीर !!


स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच "कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी केली अधिकृत घोषणा

मुंबई (प्रतिनिधी) :

कंकणातील एका मुलीने आज आपल्या स्वकर्तृत्वावर यशाचे शिखर गाठता अमेरिकेत सर्वोच्च मानल्या जाणाऱ्या व सर्वश्रेष्ठ असणाऱ्या 'दी टॉप वूमन लीडर्स ऑफ इअर २०२५' या कितावाला गवसणी घातली आहे. हा सर्वोच्च सन्मान मिळवणारी ती प्रथम महाराष्ट्रीयन आहे. 

रत्नागिरी जिल्हयातील खेड तालुक्यातील चिंचवली या छोट्याशा गावातील शमा बुटाला व लग्नानंतरच्या सौ. शमा कपिल केसकर यांनी हा पराकम करुन दाखविला आहे. शमा केसकर या सध्या अमेरिकेत वास्तव्यास आहेत. मात्र त्यांची नाळ आजही कोकणाशी जोडली गेली आहे. त्यांचे कुटुंब हे ठाणे अंबरनाथ येथे वास्तव्यास असून त्यांनी आपले संपूर्ण शिक्षण हे मुंबई यूनिव्हर्सिटीतून पूर्ण केले. त्यानंतर तिने अमेरिकेत मास्टर्स इन कम्यूनिकेशन ही पदवी संपादन केली. अमेरिकेत तिने विविध टेक कंपनीत वरीष्ठ पदावर काम करुन नावलौकीक मिळवला व स्वतः ला सिद्ध केले. त्या सध्या अमेरिकेत स्टेल्थ एआय स्टार्टअप कंपनीत मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर या पदावर कार्यरत आहेत.

तिच्या कर्तृत्वाची दखल घेऊन सौ. शमा कपिल केसकर यांची स्वतंत्र कोकण राज्य अभियानाचे संस्थापक संजय कोकरे यांनी नुकतीच "कोकण रत्न पदवी पुरस्कार साठी अधिकृत घोषणा केली आहे.वैद्य यांना हा पुरस्कार शनिवार दि. १३ डिसेंबर २०२५ रोजी संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान शेजारी, मुंबई येथे होणारा हा कार्यक्रम संस्थेचे संस्थापक संजय कोकरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक सचिन कळझुनकर सर उपस्थित राहणार आहेत. तसेच या संस्थेचे मुंबई अध्यक्ष धनंजय कुवेसकर, खजिनदार राजेंद्र सुर्वे, नेते सुभाष राणे आणि सल्लागार दिलीप लाड हेसुद्धा या कार्यक्रमाला हजर राहणार आहेत. शिवाय विविध क्षेत्रातील मान्यवरांना देखील या दरम्यान कोकण रत्न पदवी देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

तिच्या कर्तृत्वाची दखल घेत सौ. शमा कपिल केसकर यांना हा मानाचा किताब देवून सन्मानित केले जाणार आहे. तिच्या या यशाबाबत तीच्यावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे

अत्याचार ग्रस्त मुलीला शिवसेना (उबठा) महिला संघटक नंदा नारायण शेलार यांच्याकडून न्यायासाठी प्रयत्न !!

अत्याचार ग्रस्त मुलीला शिवसेना (उबठा) महिला संघटक नंदा नारायण शेलार यांच्याकडून न्यायासाठी प्रयत्न !!

कल्याण, जगदीश खंडाळे : मोहना आंबिवली येथील रहिवासी मुलगी हीचे किराणा दुकान असून सामाजिक जाणीव ठेवत तीने त्या ठिकाणी रहात असलेल्या कासिम इराणी व त्याच्या साथीदारांनी पुणे, नागपूर येथे केलेल्या चोरीबद्दल खडकपाडा पोलिस स्टेशनला माहिती दिली याचा राग मनात धरून त्यांनी तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करत तिला धमकावले. त्यामुळे तिला भीती वाटून तीने रितसर तक्रार दिली नाही. तरी पण यांचा त्रास व धमकी सुरुच असल्याने तीने घरी विचारविनिमय करत तीने तेथील शिवसेना (उबठा) च्या विभागप्रमुख व पोलिसमित्र असलेल्या महिला नंदा नारायण शेलार यांच्या कडे मदत मागितली असता त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी खडकपाडा पोलिस स्टेशन, कल्याण येथे तक्रार देण्यास सांगितले पण संबंधित खडकपाडा पोलिस स्टेशन ला जाऊन त्या मुलीने तिच्या वर होत असलेल्या / झालेल्या अत्याचार, त्रास, धमकी या संदर्भात तक्रार घेताना त्यांनी टाळाटाळ केली. 

यावेळी तीने परत शिवसेना उबठाच्या संघटक नंदा नारायण शेलार यांना पोलीस लक्ष देत नाहीत असे सांगितले त्यामुळे स्वतः नंदा नारायण शेलार व सहकारी यांनी त्या पिडित मुलीसोबत जाऊन कल्याण परिमंडळ ३ चे उपायुक्त यांची भेट घेत त्यांना सर्व कल्पना दिली असता त्यांच्या हस्तक्षेपामुळे खडकपाडा पोलिस स्टेशन यांनी जवाब घेत भारतीय न्याय संहिता (बी. एन. एस.) २०२३ - 75, 77, 352, 351(2), 356(2), 3(5) नुसार तक्रार दाखल केली.

तक्रारदार मुलीने या आतापर्यंतच्या कारवाईवर समाधानी नाही असे सांगितले तर शिवसेना उबठा संघटक नंदा नारायण शेलार यांनी पोलिसांनी योग्य ती कारवाई लगेच करावी व आरोपींना अटक करून पिडीत मुलीला न्याय द्यावा अन्यथा आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथील विद्यार्थ्यांची मिरवणूक !!

दि मॉडेल इंग्लिश स्कूल सैतवडे येथील विद्यार्थ्यांची मिरवणूक !!

रत्नागिरी जिल्ह्यातील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित दि मॉडेल इंग्लिश स्कूल, सैतवडे येथील क्रीडा क्षेत्रात मिळवलेल्या दैदिप्यमान यशाबद्दल विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित करण्यासाठी सोमवार दिनांक ०१ डिसेंबर २०२५ रोजी एक भव्य मिरवणूक काढण्यात आली. शाळेच्या क्रीडापटूंनी राष्ट्रीय आणि विभागीय स्तरावर मिळवलेल्या नेत्रदीपक विजयामुळे संपूर्ण सैतवडे आणि जांभारी परिसरात मिरवणूक काढण्यात आली.दि मॉडेल इंग्लिश स्कूलच्या तीन  विद्यार्थ्यांनी थेट राष्ट्रीय डॉजबॉल संघात आपले स्थान निश्चित केले आहे, ही शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब ठरली आहे. याच विद्यार्थ्यांच्या कौशल्यामुळे महाराष्ट्र डॉजबॉल संघाने राष्ट्रीय स्तरावर विजेतेपद पटकावले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावर केलेली ही दमदार  व प्रेरणादायी  कामगिरी आहे.

विभागीय स्पर्धेत वर्चस्व राष्ट्रीय यशासोबतच, मॉडेल इंग्लिश स्कूलने विभागीय डॉजबॉल स्पर्धेतही आपले वर्चस्व सिद्ध केले. शाळेच्या मुलींचा संघ विभागीय डॉजबॉल स्पर्धा विजेता ठरला, तर मुलांच्या संघाने उपविजेतेपद पटकावून आपल्या शाळेचा क्रीडा क्षेत्रातील दबदबा कायम ठेवला. या सर्व खेळाडूंचे समर्पण आणि कठोर प्रशिक्षण या यशामागे उभे आहे.

वाजत गाजत निघाली भव्य मिरवणूक.या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या मार्गदर्शक शिक्षकांचा गौरव करण्यासाठी शाळेकडून सैतवडे ते जांभारी पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.यावेळी पालक, शाळेचे माजी विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने मिरवणुकीत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते.

रस्त्याच्या दुतर्फा उभे राहून नागरिक टाळ्यांच्या गजरात आणि पुष्पवृष्टी करून या तरुण खेळाडूंचे अभिनंदन करत होते. 'दि मॉडेल इंग्लिश स्कूलचा जयजयकार' आणि 'आमच्या खेळाडूंचा मान, महाराष्ट्राची शान' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. ही मिरवणूक केवळ खेळाडूंचा सत्कार नव्हता तर ग्रामीण भागातील शिक्षणासोबतच क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याच्या मुस्लिम एज्युकेशन सोसायटीच्या धोरणाचे ते प्रतीक होते.

वृत्त सौजन्य - विलासराव कोळेकर सर 

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !!

दादर फुलबाजार व दादर कट फ्लॉवर्स असोसिएशनतर्फे महापरिनिर्वाण दिनानिमित्त अल्पोहार वाटप !! मुंबई (शांताराम गुडेकर) : डॉ. बाबासाहे...