अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात ‘स्त्रियांची शतपत्रे’ अभिवाचन कार्यक्रम !
वसई प्रतिनिधी/ पंकज चव्हाण
वसई येथील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या महिला विकास कक्ष आणि अंतर्गत दर्जा हमी कक्ष (IQAC) यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने रंगवेध नाट्यसंस्था निर्मित ‘स्त्रियांची शतपत्रे’ हा साहित्यिक अभिवाचन कार्यक्रम शनिवार, दिनांक ७ मार्च रोजी महाविद्यालयात उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या उपस्थितीत आदरणीय तारामाई वर्तक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे औचित्य आणि प्रस्तावना महिला विकास कक्षाच्या समन्वयक प्रा. बीना पाटील यांनी मांडली. त्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाचे महत्त्व सांगताना स्त्रियांच्या हक्क, समानता आणि स्वाभिमानाच्या लढ्याची ऐतिहासिक परंपरा अधोरेखित केली. प्राचार्य डॉ अरविंद उबाळे यांनीही महिला दिनानिमित्त महिला सक्षमीकरणासंदर्भात विचारप्रवृत्त होण्याचा संदेश उपस्थितिदांना दिला.
श्री. विलास पागार यांनी दिग्दर्शित केलेल्या या कार्यक्रमात १८५० ते १९५० या कालखंडातील स्त्रियांची मनोगते, आकांक्षा, कैफियती आणि विचार व्यक्त करणाऱ्या निवडक १५ पत्रांचे प्रभावी अभिवाचन सुमित्रा देवधर, दीपाली शहाणे, नमिता तेंडुलकर आणि नेहा किणी- सैंदाणे यांनी सादर केले. स्त्रीच्या अनुभवविश्वाला शब्दरूप देणाऱ्या या अभिवाचनाने उपस्थितांना भावनिक आणि विचारप्रवर्तक अनुभव दिला.
अभिवाचन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर रानडे यांनी केले.
यावेळी महिला विकास कक्षातर्फे आयोजित विविध स्पर्धांतील यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व प्रशस्तिपत्रके प्रदान करण्यात आली. कार्यक्रमाचे आभारप्रदर्शन प्रा. बीना पाटील यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. वैखरी नवेले यांनी करून दिला तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शैलेश औटी यांनी केले.
महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी या कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तसेच वसई आणि परिसरातील कला, साहित्य आणि नाट्यक्षेत्रातील नामवंतांनीही या कार्यक्रमाला आवर्जून हजेरी लावली.
No comments:
Post a Comment