Wednesday, 3 June 2026

मोहने अटाळी परिसरात तीव्र पाणीटंचाई !!

मोहने अटाळी परिसरात तीव्र पाणीटंचाई !!

कल्याण (संदीप शेंडगे) : मोहने- अटाळी परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. नियमित आणि पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होत नसल्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असून महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे.

स्थानिक नागरिकांनी वारंवार संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनही या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप केला जात आहे. वाढत्या उन्हामुळे पाण्याची गरज अधिक असताना प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.

या पार्श्वभूमीवर काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे मोहने शहराध्यक्ष हरिश्चंद्र पाटील यांनी प्रशासनाला इशारा देत तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. पाणीटंचाईचा प्रश्न त्वरित निकाली न काढल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा पाटील यांनी दिला आहे 

"पाणी हा नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे. प्रशासनाने नागरिकांच्या संयमाची परीक्षा पाहू नये. तात्काळ उपाययोजना करून आयुक्तांनी या गंभीर समस्या कडे विशेष लक्ष देऊन पाणीपुरवठा अधिकाऱ्यांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा याकरिता सूचना कराव्यात तसेच मोहन आटाळी परिसरातील पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करावा अन्यथा लोकशाही मार्गाने मोठे जनआंदोलन उभारले जाईल," असे हरिश्चंद्र पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, पाणीटंचाईमुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी प्रशासनाने त्वरित दखल घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी मागणी केली आहे. मोहने- अटाळी परिसरातील वाढत्या पाणी संकटामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून आता कल्याण डोंबिवली महानगरपालिका प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !!

"बातमीदार माझा"च्या बातमीचा दणका ; केवणी व काल्हेर येथील अवैध रेती साठ्यांवर महसूल विभागाची  धडक कारवाई : 23 कुंड्या जमीनदोस्त !! ...