कल्याण वालधुनी येथील बुद्धमूर्तीची तोडफोड प्रकरणी संताप !!
ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासाठी महात्मा फुले पोलीस ठाण्यात ठिय्या आंदोलन
कल्याण, संदीप शेंडगे : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडून करण्यात आलेल्या कारवाईदरम्यान भीमा कोरेगाव विजयस्तंभ, भगवान बुद्ध यांच्या मूर्तीची तोडफोड आणि शेकडो वृक्षांची कत्तल झाल्याचा आरोप करत बुद्धभूमी फाउंडेशन बौद्ध धम्मगुरु गौतमरत्न महाथेरो आणि भीम अनुयायांनी एकत्र येत तीव्र संताप व्यक्त केला.
या प्रकरणातील दोषींवर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, या मागणीसाठी महात्मा फुले चौक पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांनी आरोप केला की, पोलिसांच्या उपस्थितीतच ही कारवाई करण्यात आली असून बुद्धमूर्ती आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाचे नुकसान झाले. त्यामुळे हा केवळ तोडफोडीचा विषय नसून बौद्ध समाजाच्या भावना दुखावण्याचा गंभीर प्रकार असल्याचे आंदोलकांनी म्हटले. संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि जबाबदार व्यक्तींवर तात्काळ अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंध कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
या आंदोलनाला भारतीय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ पातकर यांनी जाहीर पाठिंबा देत प्रत्यक्ष सहभाग नोंदविला. त्यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांना समर्थन देत प्रशासनाने या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली. तसेच गुन्हा दाखल न झाल्यास राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.
मोठ्या संख्येने भीम अनुयायी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक आंदोलनात सहभागी झाल्याने पोलिस ठाणे परिसर घोषणांनी दणाणून गेला. "बुद्धमूर्तीची तोडफोड सहन केली जाणार नाही", "दोषींना अटक करा" अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
दरम्यान, या प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा आंदोलकांनी दिला असून, बुद्धमूर्ती आणि भीमा कोरेगाव विजयस्तंभाच्या कथित तोडफोडीबाबत संपूर्ण चौकशी करून जबाबदारांवर ठेकेदार आणि महापालिका अधिकाऱ्यांवर ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई करण्याची मागणी सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक होनमाने महात्मा फुले पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक परदेशी यांच्याकडे केली यावेळी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास नकार देतात सर्व आंदोलकांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली आणि पोलीस प्रशासनाचा निषेध केला.
No comments:
Post a Comment