कुर्मी समाज एकत्र आल्यास महाराष्ट्रात नवी सामाजिक ताकद निर्माण होईल – एल. पी. पटेल
अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेच्या “कुर्मी जोडो अभियान”चा शिवराज्याभिषेक दिनी भव्य शुभारंभ
कर्जत (रायगड), दि. ६ जून : कुणबी, मराठा, पटेल, पाटीदार, कनबी, कुळंबी यांसह देशभरातील विविध समाज राष्ट्रीय स्तरावर कुर्मी समाजाच्या व्यापक ओळखीखाली जोडले गेले आहेत. या सर्व समाजघटकांनी एकत्र येऊन संघटितपणे कार्य केल्यास महाराष्ट्रात एक प्रभावी सामाजिक व संघटनात्मक शक्ती निर्माण होऊ शकते, असा विश्वास अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेचे राष्ट्रीय संरक्षक व माजी राष्ट्रीय अध्यक्ष एल. पी. पटेल यांनी व्यक्त केला.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील किरवली येथे शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभेतर्फे आयोजित “कुर्मी जोडो अभियान” शुभारंभ सोहळ्यात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
यावेळी मध्यप्रदेशचे माजी मंत्री रामखिलावन पटेल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण देशासाठी प्रेरणास्थान आणि पूजनीय व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या विचारांचा व आदर्शांचा वारसा पुढे नेत समाजाने संघटितपणे प्रगतीचा मार्ग स्वीकारला पाहिजे.
हरियाणातील धनुष्यधारी वीर मराठा ट्रस्टचे अध्यक्ष सुरेंद्र सिंह भोसले यांनी पानिपतच्या युद्धानंतर हरियाणात स्थायिक झालेल्या समाजाने आजही आपली कुणबी-मराठा संस्कृती आणि परंपरा कशा जतन केल्या आहेत, याची माहिती दिली.
कार्यक्रमादरम्यान कुणबी, मराठा आणि कुर्मी समाजामध्ये एकात्मता निर्माण करण्यासाठी कार्य करणारे दिवंगत समाजसेवक स्व. बाबुलाल सिंह यांच्या स्मरणार्थ मान्यवरांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात किरवली येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आलेल्या भव्य शोभायात्रेने झाली. त्यानंतर शिवरायांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. पुढे साईकृपा शेळके बंधू सभागृहात मुख्य कार्यक्रम पार पडला. शाहिरी पोवाड्याच्या दमदार सादरीकरणाने कार्यक्रमाला उत्साहपूर्ण सुरुवात झाली.
या सोहळ्यास शिवाजी महाराज युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉ. केशरीलाल वर्मा, गुजरातचे निवृत्त जिल्हाधिकारी सी. जे. पटेल, आयएएस अकादमीचे वज्र पटेल, तेलंगणा कापू समाज संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष कोंडा देवय्या, संघानी पटेल, कोठा लक्ष्मण पटेल, रवी चंदे, प्रा. जयपाल पाटील, प्रा. बी. एल. पाटील, महासभेचे प्रदेशाध्यक्ष संजय पाटील, प्रदेश संरक्षक ॲड. गोपाल शेळके, महासचिव जयेश शेलार पाटील, शंकर थोरवे, समीर पाटील, प्रमोद ठोंबे पाटील यांच्यासह ठाणे, पालघर व रायगड जिल्ह्यातील कुणबी व मराठा समाज संघटनांचे अनेक प्रतिनिधी उपस्थित होते.
कार्यक्रमात दिवंगत सामाजिक कार्यकर्ते व्ही. जी. पाटील यांना जाहीर झालेला मरणोत्तर “कुर्मी भूषण” पुरस्कार त्यांच्या पत्नी वंदना पाटील आणि कन्या डॉ. नूतन मोकाशी यांना प्रदान करण्यात आला.
याशिवाय दिव्यांग असूनही अनेक गड-किल्ले सर करणारे जनार्दन पानमंद (पोखरवाडी, कर्जत), उद्योग व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणारे गजानन जाधव (मुंबई), सहकार व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते सदानंद सुरोशे (बदलापूर), बँकिंग क्षेत्रातील योगदानासाठी सीताराम पाटील तसेच कला क्षेत्रातील योगदानासाठी निलेश पाटील (कोळीवली, भिवंडी) यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रदेशाध्यक्ष संजय पाटील यांनी केले, तर जयेश शेलार पाटील यांनी प्रभावी सूत्रसंचालन केले. रामदास घरत यांनी आभार प्रदर्शन केले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभाकर शेळके, रामदास घरत आणि दिलीप ताम्हाणे यांनी विशेष परिश्रम घेतले.
“कुर्मी जोडो अभियान”च्या शुभारंभामुळे समाजात एकात्मता, संघटन आणि सामाजिक समन्वयाचा नवा संदेश देण्यात आला असून, महाराष्ट्रातील विविध समाजघटकांना एकत्र आणण्याच्या दिशेने हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
सौजन्य/प्रसिद्धी - संजय पाटील
संस्थापक/अध्यक्ष - कोकण विभाग पत्रकार संघ
प्रदेशाध्यक्ष - (अखिल भारतीय कुर्मी क्षत्रिय महासभा)
No comments:
Post a Comment