डोंबिवलीतील भारत पेट्रोलियम गॅस सिलेंडरचा कृत्रिम तुटवडा; नागरिक त्रस्त !!
*डोंबिवली, राजू नलावडे
डोंबिवली आणि ग्रामीण परिसरात भारत पेट्रोलियम कंपनीच्या गॅस सिलेंडरचा मोठा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. 15 दिवस आधी बुकिंग करूनही सिलेंडर मिळत नसून, ग्राहकांना न कळवता बुकिंग रद्दही केले जात असल्याचा आरोप आहे.
*घरपोच सेवा बंद, नागरिकांना हाल*
अनेक भागात घरपोच डिलिव्हरी बंद असल्याने नागरिकांना स्वतः एजन्सीच्या गोडाऊनवर जावे लागत आहे. डोंबिवली आजदे, सागर्ली येथील रहिवासी एमआयडीसीतील उस्मा पेट्रोल पंपाजवळील चैतन्य गॅस एजन्सीच्या गोडाऊनवर गर्दी करत आहेत. येथे महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना गॅससाठी 4-4 तास रांगेत उभे राहावे लागत आहे.
पावतीसाठी आधी नेहरू मैदानजवळील ऑफिसमध्ये जावे लागते. त्यासाठी आणि सिलेंडर वाहतुकीसाठी किमान 100 रुपये रिक्षा खर्च येत आहे. अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांवर हा अतिरिक्त भुर्दंड पडत आहे.
*काळाबाजाराचा संशय*
आजदे गावातील योगिता थोटांगे यांचे बुकिंग असूनही गॅस मिळाला नाही. एजन्सीला विचारणा केली असता समाधानकारक उत्तर मिळाले नाही. विद्यार्थी आणि नोकरी करणारे युवकही रजा घेऊन सिलेंडरसाठी रांगेत उभे आहेत. काही नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केली आहे. गॅसचा काळाबाजार होत असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.
*मागणी*
महागाई आणि दरवाढीने त्रस्त नागरिकांना यामुळे अधिक त्रास सहन करावा लागत आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने तातडीने कारवाई करावी आणि आजदे, सागर्ली सारख्या ग्रामीण भागात महानगर गॅस पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
No comments:
Post a Comment