टिटवाळ्यातील के.एन.टी. शाळा प्रकरणात पालकांच्या एकजुटीचा विजय !!
** प्रशासनाकडून लेखी आश्वासन
कल्याण, संदीप शेंडगे : टिटवाळ्यातील के.एन.टी. शाळेतील कथित सक्तीची गणवेश व शैक्षणिक साहित्य खरेदी, जादा शुल्क आणि अन्य अनियमिततेविरोधात पालकांनी कल्याण-डोंबिवली महापालिका शिक्षण विभागासमोर शांततापूर्ण आंदोलन केले. या आंदोलनानंतर प्रशासनाने पालकांच्या प्रमुख मागण्यांबाबत लेखी आश्वासन देत पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले.
प्रशासनाने गणवेश बदल प्रक्रियेची चौकशी, कथित पीटीए ठरावाची पडताळणी, लेट फी प्रकरणी नोटीस, मुख्याध्यापिकांवरील तक्रारींची चौकशी तसेच विद्यार्थ्यांवर कोणताही भेदभाव होणार नाही, याची ग्वाही दिली. तसेच, पालकांना नको असलेले गणवेश व शैक्षणिक साहित्य परत स्वीकारण्याचे निर्देश शाळेला देण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. विद्यार्थ्यांना बालभारतीची पुस्तके वापरण्याचा अधिकारही प्रशासनाने अधोरेखित केला.
दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी हा लढा प्रत्येक पालकाच्या हक्कासाठी असल्याचे सांगत, टिटवाळा परिसरात महापालिकेची इंग्रजी माध्यमाची शाळा सुरू करण्यासाठी २,००० पालकांच्या हमीपत्र मोहिमेला लवकरच सुरुवात होणार असल्याची माहिती दिली.
No comments:
Post a Comment