निवृत्त सैनिकांनी विद्यार्थ्यांना दिला देशभक्तीचा प्रेरणादायी संदेश !!
टेंडर किड्झ प्री-स्कूल व पॅराडाईज इंग्लिश स्कूलमध्ये शिस्त, नेतृत्वगुण आणि करिअर मार्गदर्शनावर विशेष व्याख्यान
प्रतिनिधी भिवंडी
दिनांक 17 जुलै 2026
आरियन्स अकॅडमी एज्युकेशनल ट्रस्ट संचलित टेंडर किड्झ प्री-स्कूल व पॅराडाईज इंग्लिश स्कूल येथे विद्यार्थ्यांमध्ये देशभक्ती, शिस्त आणि नेतृत्वगुणांची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने भारतीय सैन्यातून निवृत्त झालेले सैनिक फुलसिंग सोलंकी यांच्या विशेष प्रेरणादायी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात इयत्ता पाचवी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला.
कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित असलेल्या फुलसिंग सोलंकी यांनी भारतीय सैन्यातील आपल्या प्रदीर्घ सेवाकाळातील अनुभव विद्यार्थ्यांसमोर उलगडले. त्यांनी देशाच्या सीमांवर कर्तव्य बजावताना आलेली आव्हाने, सैनिकांचे कठोर जीवन आणि राष्ट्रसेवेचे महत्त्व याविषयी माहिती दिली. तसेच 'ऑपरेशन सिंदूर' मधील सहभागाचे अनुभव सांगत विद्यार्थ्यांना शिस्त, वेळेचे नियोजन, नेतृत्वगुण, आत्मविश्वास, राष्ट्रप्रेम आणि जबाबदार नागरिक बनण्याचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय सैन्यात करिअर करण्यासाठी आवश्यक पात्रता, शारीरिक व मानसिक तयारी, तसेच शिक्षणाचे महत्त्व याविषयीही मार्गदर्शन केले. त्यांच्या प्रेरणादायी अनुभवकथनामुळे विद्यार्थ्यांमध्ये देशसेवेबद्दल अभिमान निर्माण झाला असून अनेक विद्यार्थ्यांनी भविष्यात भारतीय सैन्यात सेवा करण्याची इच्छा व्यक्त केली.
शाळा व्यवस्थापनाने सांगितले की, अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळते. शिस्त, नेतृत्व, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रसेवेप्रती आदराची भावना रुजविण्यास अशा कार्यक्रमांची महत्त्वाची भूमिका असते. तसेच विद्यार्थ्यांना भारतीय सैन्याचे जीवन, त्याग, शौर्य आणि देशसेवेची मूल्ये जवळून जाणून घेण्याची संधी मिळते.
या कार्यक्रमाला शाळेच्या संस्थापिका संगीता नागवंशी, नरेश साहू, विजय गुप्ता, अरविंद जैसवार तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी विद्यार्थ्यांनी निवृत्त सैनिक फुलसिंग सोलंकी यांचे टाळ्यांच्या गजरात स्वागत करत त्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment