कल्याण-डोंबिवलीला पावसाने झोडपले !!
पाच दिवस सतत पाऊस पडत असल्याने जनजीवन विस्कळीत
कल्याण, संदीप शेंडगे : गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण-डोंबिवली शहरासह परिसराला अक्षरशः पावसाने झोडपून काढले आहे. शहरातील अनेक सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले असून रस्ते, गल्लीबोळ आणि चौक जलमय झाले आहेत. अनेक ठिकाणी वाहतुकीचा वेग मंदावला असून नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
सततच्या पावसामुळे उल्हास नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून नदीकाठच्या परिसरातील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. प्रशासनाकडून नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत असून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत. एमआयडीसी परिसरातही पाणी साठण्यास सुरुवात झाली असून काही कारखान्यांमध्ये पाणी साठवण्यास सुरुवात झाली आहे.
दरम्यान, बारवी धरणातून पाणी सोडण्यात येणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरत आहेत. मात्र, जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी अशा कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्ट आवाहन नागरिकांना केले आहे. अधिकृत माहिती केवळ प्रशासनाच्या अधिकृत माध्यमांवरूनच स्वीकारावी, असेही सांगण्यात आले आहे.
मुसळधार पावसामुळे बैल बाजार, गांधारी, अटाळी, शहाड वडवली, टिटवाळा तसेच इतर अनेक सखल भागांमध्ये पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. ग्रामीण भागातील रस्त्यांवर पाणी आल्याने गावांचा संपर्क तुटला आहे. काही ठिकाणी घरांच्या परिसरातही पाणी शिरल्याने नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.
कल्याण-डोंबिवली महानगरपालिका, अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर यंत्रणा सतर्क असून पाणी उपसा, झाडे हटविणे, वाहतूक सुरळीत ठेवणे आणि नागरिकांना मदत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. पावसाची तीव्रता कायम असल्याने प्रशासनाने अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे, नदी-नाले व पाण्याने भरलेल्या भागांपासून दूर राहावे तसेच कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत संबंधित नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
हवामान विभागाने पुढील काही तास मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment