भिवंडीत पावसाचा बळी; खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या १७ वर्षीय तरुणाचा नदीत बुडून बेपत्ता !!
चविंद्रा येथील काळा दगड नदीत दुर्घटना; आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू, नागरिकांना नदीकाठापासून दूर राहण्याचे प्रशासनाचे आवाहन
प्रतिनिधी,भिवंडी
दि. ६ जुलै २०२६
भिवंडीतील गैबी नगर परिसरातील १७ वर्षीय मोहम्मद गौस हा तरुण चविंद्रा गावाजवळील काळा दगड नदीत बुडून बेपत्ता झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. मुसळधार पावसामुळे नदीच्या पाण्याची पातळी वाढलेली असताना खेकडे पकडण्यासाठी गेलेल्या या तरुणाला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडल्याचे समोर आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोहम्मद गौस हा आपल्या तीन ते चार मित्रांसह चविंद्रा परिसरातील काळा दगड नदीच्या काठावर खेकडे पकडण्यासाठी गेला होता. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला मोठा पूर आला असून पाण्याची पातळी आणि प्रवाह दोन्ही धोकादायक झाले आहेत. अशा परिस्थितीत नदीत उतरलेल्या मोहम्मद गौस याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो अचानक खोल पाण्यात गेला आणि प्रवाहात बुडाला.
घटनेची माहिती मिळताच भिवंडी महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागासह अग्निशमन दलाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. बेपत्ता तरुणाचा शोध घेण्यासाठी युद्धपातळीवर बचाव आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. मात्र, वृत्त लिहिपर्यंत मोहम्मद गौस याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नव्हता.
सतत सुरू असलेल्या पावसामुळे नदीचा वेग वाढला असून पाण्याचा प्रवाह अतिशय धोकादायक बनला आहे. त्यामुळे बचाव कार्यातही अनेक अडचणी येत असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
दरम्यान, पावसाळ्यात नदी, नाले, ओढे तसेच पाणी साचलेल्या धोकादायक ठिकाणी जाणे टाळावे, कोणत्याही परिस्थितीत पाण्यात उतरू नये आणि स्वतःच्या तसेच इतरांच्या जीवाशी खेळू नये, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
No comments:
Post a Comment