भिवंडीत मुसळधार पावसाचा कहर; तीनबत्ती जलमय, शहरातील अनेक भागांत झाडे कोसळून जनजीवन विस्कळीत !!
दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान; नालासफाईच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह, अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन विभागाची दिवसभर धावपळ
प्रतिनिधी, भिवंडी दि. ६ जुलै २०२६
सोमवार सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने भिवंडी शहराला अक्षरशः झोडपून काढले. सलग कोसळणाऱ्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून तीनबत्ती परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली. कंबरभर पाणी साचल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली, तर अनेक दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. याशिवाय शहरातील विविध भागांत झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्याने अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिवसभर बचाव व मदतकार्य करावे लागले.
तीनबत्ती परिसरात साचलेल्या पाण्यामुळे रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले. नागरिकांना कंबरभर पाण्यातून जीव मुठीत धरून मार्ग काढावा लागला. अनेक व्यावसायिक आस्थापनांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. व्यापाऱ्यांनी जलनिस्सारण व्यवस्थेतील त्रुटींमुळे दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली.
स्थानिक नागरिकांनी वेळेत नाल्यांची सफाई न झाल्यामुळे पावसाचे पाणी रस्त्यांवर साचल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे, भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील ५० ते ६० टक्के नाल्यांची सफाई पूर्ण झाल्याचा दावा केला होता. उर्वरित कामही पावसापूर्वी पूर्ण करण्यात येईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, सोमवारी निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी नाल्यांचे पाणी मॅनहोलमधून रस्त्यावर ओसंडून वाहत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान, मुसळधार पावसासोबतच शहरातील विविध भागांत झाडे व फांद्या कोसळण्याच्या अनेक घटना घडल्या. धामणकर नाका रोडवरील कमला हॉटेलजवळ मोठे झाड रस्त्यावर कोसळले. तसेच महावीर चौक-अंजूरफाटा मार्गावरील हरिहर बिल्डिंगसमोरही झाड पडल्याची घटना घडली. चविंद्रा आणि भादवड परिसरातही झाडे व मोठ्या फांद्या कोसळल्यानंतर अग्निशमन दलाने तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन ती हटवून वाहतूक सुरळीत केली.
भवानीनगर-कामतघर येथील साईराज बिल्डिंगजवळील विशाल पिंपळाचे झाड संरक्षक भिंतीवर कोसळून टेकल्याने गंभीर परिस्थिती निर्माण झाली. संबंधित भिंत कोसळल्यास परिसरातील नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने तातडीने बचावात्मक उपाययोजना सुरू केल्या.
सुदैवाने या सर्व घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, हवामान विभागाने पुढील काळातही मुसळधार पावसाची शक्यता वर्तविल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. खराब हवामानाच्या काळात जुन्या झाडांखाली, धोकादायक भिंतींजवळ तसेच जीर्ण इमारतींच्या परिसरात जाणे टाळावे आणि कोणतीही आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास तातडीने महानगरपालिका, आपत्ती व्यवस्थापन विभाग किंवा अग्निशमन दलाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने नागरिकांना केले आहे.
No comments:
Post a Comment