Thursday, 16 July 2026

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

*कल्याण : (दिपक मागाडे)* दिनांक ०७ जुलै २०२६ रोजी कल्याण परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे कराडकर चाळ, शिवाजी नगर बेतुरकर पाडा, कल्याण येथील एका कुटुंबाचे राहते घर पूर्णपणे कोसळून मोठे नुकसान झाले आहे. सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी या नैसर्गिक आपत्तीमुळे कुटुंबावर मोठे संकट ओढवलेले आहे.

ही घटना घडून आठ दिवसांहून अधिक काळ लोटला असूनही कल्याण-डोंबिवली महानगरपालिका प्रशासनाकडून नैसर्गिक आपत्तीची दखल घेतली गेली नसल्याची व पिडित कुटुंबाला कोणतीही मदत मिळाली नसल्याचा आरोप पिडित कुटुंबाकडून केला आहे.

'क' प्रभाग क्षेत्रातील सहाय्यक आयुक्त यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली असतानाही महापालिकेकडून घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आलेला नाही. घटनेच्या दुसऱ्या-तिसऱ्या दिवशी काही कर्मचारी फक्त येऊन बघून गेले, परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही, असे पीडित कुटुंबाचे म्हणणे आहे.

यासंदर्भात पीडितांनी १६/०७/२०२६ रोजी कडोमपा आयुक्तांना लेखी अर्ज दिला आहे. अर्जात म्हटले आहे की, "स्थानिक लोकप्रतिनिधींनीही या घटनेकडे दुर्लक्ष केले आहे. कार्यालयातील अधिकाऱ्यांनी 'आमच्याकडे अशी तरतूद उपलब्ध नाही' असे उत्तर दिले. त्यामुळे आम्हाला शासकीय मदतीपासून वंचित राहावे लागत आहे."

पीडित कुटुंबाने महापालिका आयुक्तांना, प्रांत अधिकारी आणि तहसीलदार कल्याण यांना विनंती केली आहे की, संबंधित अधिकाऱ्यांमार्फत तात्काळ पंचनामा करून नुकसानाची नोंद घ्यावी आणि शासनाच्या नियमानुसार योग्य ती आर्थिक मदत व नुकसान भरपाई मंजूर करावी.

अतिवृष्टीच्या काळात प्रशासनाची उदासीनता पुन्हा एकदा समोर आली असून, मदतीच्या प्रतीक्षेत असलेल्या या कुटुंबाला लवकरच न्याय मिळणार का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

No comments:

Post a Comment

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल

कल्याणमध्ये अतिवृष्टीने घर कोसळले, महापालिका नैसर्गिक आपत्तीची दखल घेण्यास उदासीन...पिडित कुटुंब हतबल *कल्याण : (दिपक मागाडे)* द...