मिलापनगर तलावाचे पाणी पुन्हा झाले खराब; जलचरांच्या जीवाला धोका !
*डोंबिवली, प्रतिनिधी* : डोंबिवलीतील मिलापनगर येथील तलावाचे पाणी पुन्हा एकदा खराब झाले आहे. कचरा आणि निर्माल्य टाकल्याने तलावाला उकिरड्याचे स्वरूप आले असून यामुळे जलचरांच्या जीवनाला धोका निर्माण झाला आहे.
*जूनमध्येही घडली होती दुर्घटना*
मागील जून महिन्यात 03 ते 05 तारखेदरम्यान याच तलावात मोठ्या प्रमाणात मासे मृतावस्थेत आढळले होते. कडक उष्मा, निर्माल्य, कचरा आणि पाण्यातील ऑक्सिजनची कमतरता यामुळे मासे मृत झाल्याचे समोर आले होते.
त्यानंतर बातम्या प्रसिद्ध झाल्यावर केडीएमसीचे उपायुक्त (घनकचरा व्यवस्थापन) श्री. रामदास कोकरे यांनी पाहणी केली होती. त्यावेळी पर्यावरण अभ्यासक वास्तुविशारद श्री. राजीव तायशेटे, पर्यावरण तज्ज्ञ श्री. विजय घोडेकर आणि स्थानिक रहिवासी राजू नलावडे उपस्थित होते.
राजीव तायशेटे यांच्या सूचनेनुसार मोटर पंपद्वारे तलावातील पाण्याचे एरिएशन करण्यात आले. केडीएमसी कर्मचाऱ्यांनी मृत मासे आणि कचरा काढून तलाव स्वच्छ केला होता. स्थानिक नागरिकांनी "सक्त सूचना व इशारा" असा फलक लावून निर्माल्य व कचरा टाकण्यास मनाई केली होती.
*नियम न पाळल्याने पाणी पुन्हा खराब*
मात्र गेल्या काही दिवसांपासून काही बेशिस्त नागरिकांकडून पुन्हा तलावात निर्माल्य, कचरा, प्लास्टिक टाकले जात आहे. केडीएमसीचे सफाई कर्मचारी ते काढत असले तरी पाणी खराब झाले आहे.
*स्थानिकांच्या मागण्या प्रलंबित*
जलचरांचे संरक्षण व्हावे यासाठी स्थानिक जागरूक नागरिक आणि पर्यावरण प्रेमींनी केडीएमसीला यापूर्वीच 6 सूचना दिल्या होत्या:
1. *कायमस्वरूपी सुरक्षारक्षक/सफाई कर्मचारी* : दिवसासाठी एक कंत्राटी कर्मचारी नेमावा.
2. *सीसीटीव्ही कॅमेरे* : तलाव परिसरात बसवावेत.
3. *इशारा फलक* : निर्माल्य-कचरा टाकू नये यासाठी फलक लावावा.
4. *गाळ उपसा* : स्लज पंपाने तळाशी साचलेला गाळ काढावा.
5. *नियमित स्वच्छता* : तलावाची नियमित साफसफाई करावी.
6. *ताबा देणे* : देखरेखीसाठी तलाव रोटरी क्लब/मिलापनगर रेसिडेंट्स वेलफेअर असोसिएशन यांच्याकडे द्यावा.
परंतु यापैकी एकाही सूचनेची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही.
*केडीएमसीला पुन्हा आवाहन*
यामुळे स्थानिक नागरिकांनी आणि पर्यावरण प्रेमींनी केडीएमसीला तातडीने वरील सूचनांची अंमलबजावणी करण्याचे आवाहन केले आहे. वेळीच उपाय न झाल्यास तलावातील जलचरांचे जीवन धोक्यात येईल आणि भविष्यात हा तलाव नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
वृत्त - राजू नलावडे
No comments:
Post a Comment