Friday, 3 July 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड

** पाच हजारांहून अधिक गीतांचा अमूल्य वारसा; तरीही उपेक्षित राहिलेल्या लोककवीची कहाणी 

फुले-शाहू-आंबेडकर यांच्या समतावादी विचारांची चळवळ केवळ भाषणांत किंवा पुस्तकांत मर्यादित राहिली नाही. लोककला, भारूड, शाहिरी आणि लोकगीतांच्या माध्यमातून हा विचार सर्वसामान्यांच्या मनापर्यंत पोहोचला. या परिवर्तनवादी प्रवाहात आपल्या लेखणीने महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या गीतकारांमध्ये कवी मानवेल गायकवाड यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते.त्यांच्या लेखणीतून जन्मलेली गीते आजही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात घुमतात. महामानवांच्या जयंती आणि स्मृतिदिनांपासून ते ग्रामीण जत्रा, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विवाहसोहळ्यांपर्यंत त्यांच्या गीतांचा निनाद ऐकू येतो.
काळ बदलला, पिढ्या बदलल्या; मात्र मानवेल गायकवाड यांच्या शब्दांची जादू आजही कायम आहे. 

लेखणीशी जुळलेले आयुष्यभराचे नाते: मानवेल गायकवाड यांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी येथे झाला. त्यांचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मालुंज. १९६४ मध्ये त्यांचे कुटुंब ठाणे जिल्ह्यातील कल्याण येथे आले आणि पुढे वासिंद (ता. शहापूर) येथे स्थायिक झाले. लहानपणापासूनच त्यांना शब्दांचे विलक्षण आकर्षण होते. शाळेच्या वहीत गणितापेक्षा कविता अधिक दिसायच्या. अवघ्या चौदा-पंधरा वर्षांच्या वयात सुरू झालेली लेखनाची ही वाटचाल आज सत्तरीच्या उंबरठ्यावरही तेवढ्याच जोमाने सुरू आहे. ते नेहमी म्हणतात, "गाणे गाणारा कलाकार प्रकाशझोतात येतो; पण त्या गाण्याला जन्म देणाऱ्या कवीची ओळख समाजापर्यंत पोहोचली पाहिजे." ही भावना त्यांच्या संपूर्ण साहित्यकृतीत प्रतिबिंबित होते. त्यांनी लेखणीचा वापर केवळ मनोरंजनासाठी न करता समाजप्रबोधनाचे प्रभावी माध्यम म्हणून केला. 

'जवा नवीन पोपट हा...'ने मिळवून दिली अनोखी ओळख : १९८६ हे वर्ष मानवेल गायकवाड यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे वर्ष ठरले. त्यांनी लिहिलेले "जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला" हे गीत आनंद शिंदे यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाले आणि अल्पावधीतच संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झाले. ग्रामीण संस्कृतीचा अस्सल गंध असलेले हे गीत आजही लग्नसमारंभ, जत्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये तितक्याच उत्साहाने वाजते. या एका गीताने त्यांना 'लोकगीतांचा बादशहा' अशी ओळख मिळवून दिली.

भीमगीतांचा बुलंद आवाज : मानवेल गायकवाड यांची खरी ओळख म्हणजे आंबेडकरी चळवळीचे प्रभावी गीतकार. स्वरसम्राट प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजातील "भीमरायामुळे आम्हा बुद्ध मिळाले", "भीमासारखा बाळ जन्मा यावा", "भीमा तुझ्या जन्मामुळे जीवनी संगीत आले" ही त्यांची गीते आजही लाखो अनुयायांच्या भावना व्यक्त करतात.

याशिवाय "ए फॉर आंबेडकर", "ग्रेट यशवंत आंबेडकर", "तुझ्या हाती झेंडा निळा पाहिजे", "बीएसपी मे आओ", "मंत्रिपदाला अशी हो माझ्या भीमाने लाथ मारली" यांसारखी प्रबोधनपर गीतेही त्यांनी लिहिली. बुद्ध विचारांचा प्रसार करणारी "बुद्ध शरणं गच्छामी", "शुद्ध जो होगा वो ही बुद्ध होगा", "बुद्ध विहारी जाऊ या" "जस चमके मोत्याच दान, अस भीमाचं गाणं"

ही गीतेही त्यांच्या लेखणीतून साकारली. त्यामुळेच त्यांना 'भीमगीतांचा सम्राट' म्हणून ओळखले जाते. तर विविध पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. 

माईसाहेबांवरील पहिले गीत : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सहचारिणी डॉ. सवितामाई (माईसाहेब) आंबेडकर यांच्यावर गीत लिहिणारे ते बौद्ध समाजातील पहिले गीतकार ठरले. तुटलेल्या कानाच्या कपातून बाबासाहेब चहा पित असल्याचे पाहून माईसाहेबांच्या मनात काय भावना उमटल्या असतील आणि त्यावर बाबासाहेबांनी काय उत्तर दिले असेल, या कल्पनेवर आधारित त्यांनी एक हृदयस्पर्शी गीत लिहिले. हे गीत ऐकून ज्येष्ठ कवी वामनदादा कर्डक यांनी त्यांना मिठी मारत, "हा फार मोठा कवी होईल," असे गौरवोद्गार काढले. पुढील काळात ते शब्द अक्षरशः खरे ठरले.

 लोकगीतांचा अफाट खजिना : भीमगीतांबरोबरच ग्रामीण जीवन, नातेसंबंध, विनोद आणि लोकसंस्कृतीवर आधारित हजारो लोकगीते त्यांनी लिहिली. "राती या आंटीची जवा घंटी मी वाजवली", "गेली माझी सख्खी बायको गेली", "हॅलो मी बाबुराव बोलतोय", "गारुडी लागला मागं", "गेला माझा सख्खा सासरा गेला" यांसारखी अनेक गीते आजही रसिकांच्या ओठांवर आहेत. आजपर्यंत त्यांनी पाच हजारांहून अधिक गीते लिहिली असून, आजही त्यांची लेखणी तितक्याच ताकदीने सुरू आहे. 

शेकडो गायकांचा आवाज; पण कवी मात्र उपेक्षित: 
मोहम्मद अजीज, सुरेश वाडकर, उदित नारायण, प्रल्हाद शिंदे, आनंद शिंदे, मिलिंद शिंदे, अनुराधा पौडवाल, उषा मंगेशकर, उत्तरा केळकर, वैशाली सामंत, सुदेश भोसले, आदर्श शिंदे अशा शंभरहून अधिक नामवंत गायकांनी त्यांच्या गीतांना स्वर दिले. अनेक मराठी चित्रपटांनाही त्यांच्या गीतांनी वेगळी उंची मिळवून दिली. परंतु, ज्या गीतांनी अनेक गायक आणि संगीत कंपन्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळवून दिला, त्या गीतांचा निर्माता असलेला हा प्रतिभावान कवी आजही उपेक्षित जीवन जगत आहे.

पक्षाघातावर मात; संघर्ष आजही सुरूच : दोन वर्षांपूर्वी त्यांना पक्षाघाताचा झटका आला. आर्थिक अडचणींमुळे उपचार करणेही कठीण झाले. मात्र, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या "शिका, संघटित व्हा, संघर्ष करा" या संदेशातून प्रेरणा घेत त्यांनी आजाराशी आणि परिस्थितीशी जिद्दीने सामना केला. आजही वासिंद येथील आपल्या साध्याशा घरात राहून ते अखंड लेखन करत आहेत. गरिबीशी झुंज देत असतानाही त्यांनी स्वाभिमान आणि विचारांची साथ कधी सोडली नाही. 

सन्मानाची प्रतीक्षा : मानवेल गायकवाड यांची कहाणी ही केवळ एका गीतकाराची नाही; ती आपल्या समाजाने आणि व्यवस्थेने प्रतिभावान कलावंतांकडे केलेल्या दुर्लक्षाची वेदनादायी कहाणी आहे. पाच हजारांहून अधिक गीतांचा अमूल्य ठेवा महाराष्ट्राला देणाऱ्या या लोककवीला त्यांच्या हयातीतच योग्य सन्मान मिळणे ही समाजाची आणि शासनाची जबाबदारी आहे. गायकाचा आवाज काळाच्या ओघात विरून जातो; पण कवीचे शब्द काळाच्या पलीकडे जिवंत राहतात. अशाच अजरामर शब्दांचा शिल्पकार म्हणजे कवी मानवेल गायकवाड.

लेखक : मिलिंद सुरेश जाधव
पडघा, भिवंडी, मो.8655569436

No comments:

Post a Comment

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा अजरामर आवाज : कवी मानवेल गायकवाड ** पाच हजारांहून अधिक गीतांचा अमूल्य वारसा; तरीही उपेक्षित राहिलेल्या...