शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण प्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल !!
*डोंबिवली, विनोद गीरी* : कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या कोपरा परिसरातील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांना मारहाण केल्याप्रकरणी विष्णूनगर पोलीस ठाण्यात चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शिंदे गटाच्या शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे व त्यांच्या साथीदारांनी रुग्णालयात जाऊन दोन डॉक्टर व दोन परिचारिकांना मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. नवजात बाळाला उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवण्यास सांगितल्याच्या कारणावरून हा वाद झाल्याचे समोर आले आहे.
या घटनेनंतर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. दीपा शुक्ला, जखमी डॉक्टर व कर्मचारी यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हा नोंदवला असून पुढील तपास सुरू केला आहे.
माध्यमांशी बोलताना पोलिसांनी आरोपींची नावे उघड करण्यास नकार दिला. मात्र या प्रकरणातील सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
दरम्यान, या मारहाणीच्या निषेधार्थ डॉक्टर संघटनांनी कामबंद आंदोलन पुकारले आहे. पोलिसांच्या पुढील तपासाकडे डॉक्टर संघटनांचे बारीक लक्ष आहे.
No comments:
Post a Comment