पत्रकारांच्या एकजुटीचा निर्धार; ठाण्यात व्हॉईस ऑफ मीडियाच्या सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !!
*अंबरनाथ, दि. 23 ऑगस्ट 2026*
पत्रकारांच्या हक्क, अधिकार आणि विविध प्रश्नांवर संघटितपणे आवाज उठविण्यासाठी तसेच ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेची भक्कम बांधणी करण्यासाठी आयोजित केलेली महत्त्वपूर्ण बैठक अंबरनाथ येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.
रविवार दि. 23 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत ही बैठक चालली. ठाणे जिल्ह्यातील विविध भागांतून मोठ्या संख्येने पत्रकार बांधव आणि भगिनी उपस्थित राहिल्याने बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
*सदस्य नोंदणीवर भर*
या बैठकीत संघटनात्मक बांधणीसह सदस्य नोंदणी अभियानावर विशेष भर देण्यात आला. उपस्थित पत्रकारांनी सदस्य नोंदणीचे फॉर्म भरून संघटनेच्या कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र कोअर कमिटी सदस्य व ठाणे जिल्हा सुप्रीमो गौतम वाघ होते. महाराष्ट्र सहसंघटक सुरेश जगताप यांनी प्रस्तावना मांडताना ठाणे जिल्ह्यातील पत्रकारांच्या विविध समस्या, पत्रकारांचे हक्क व अधिकार, संघटनेची गरज तसेच आगामी संघटनात्मक वाटचालीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
*एकजुटीने संघर्षाचा निर्धार*
बैठकीत पत्रकारांना दैनंदिन कामकाजात भेडसावणाऱ्या अडचणी, हिताचे प्रश्न आणि विविध समस्या यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. या समस्या सोडविण्यासाठी संघटितपणे पुढे येण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
पत्रकार एकत्र आले तरच त्यांच्या प्रश्नांना ताकद मिळेल. संघटन मजबूत झाले तरच हक्क आणि अधिकारांसाठीचा संघर्ष अधिक प्रभावी होईल या भूमिकेतून ठाणे जिल्ह्यात व्हॉईस ऑफ मीडियाची मजबूत संघटनात्मक उभारणी करण्याचा संकल्प करण्यात आला.
*आगामी उपक्रमांचे नियोजन*
आगामी काळात ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक पत्रकाराला एका मजबूत व्यासपीठावर आणण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे नियोजन बैठकीत करण्यात आले. उपस्थित पत्रकारांनी संघटनेच्या आगामी उपक्रमांना पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गौतम गवई, संजय साळवे, प्रशांत ढोणे, रजनीकांत गायकवाड, जगन्नाथ जावळे, सतीश अहिरे, सलीम मन्सूरी, राजदीप जगताप, संतोष क्षेत्रे, राजू दोंदे, देवानंद पाढेन यांच्यासह ठाणे जिल्ह्यातील विविध विभागांतील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment