Sunday, 23 August 2026

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

          अंमली पदार्थांची पुरवठा साखळी उद्ध्वस्त करण्यासोबतच अंमली पदार्थांची मागणीच निर्माण होऊ नये यासाठी व्यापक जनजागृती करणारी 'कॅम्पस कनेक्ट' ही नवी मुंबई पोलिसांनी हाती घेतलेली विशेष मोहीम अत्यंत महत्त्वाची व युवाशक्तीला दिशा देणारी असल्याचे मत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.श्री.देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
          व्यसनांच्या दलदलीत युवा पिढीने फसू नये यासाठी सजगतेने काम करण्यासोबतच व्यसनांच्या गर्दीत अडकलेल्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार न समजता त्यांना व्यसनमुक्ती केंद्राद्वारे मदतीचा हात देण्याची नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहयोगाने पोलिसांनी हाती घेतलेली भूमिकाही तितकीच महत्त्वाची असल्याचे ते म्हणाले.

          नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने 'नशामुक्त नवी मुंबई अभियान' अंतर्गत 'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहिमेच्या शुभारंभप्रसंगी नवी मुंबई महानगरपालिकेच्या सहकार्याने नवी मुंबई पोलीसांनी सुरू केलेल्या 'व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्रा'चा शुभारंभ मुख्यमंत्री ना.श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते डी वाय पाटील युनिव्हर्सिटी ऑफ एक्सलन्स, नेरूळ येथून दूरदृश्य प्रणालीद्वारे तरुणाईच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत संपन्न झाला.
          याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना. श्री. गणेश नाईक, रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना.श्री. भरत गोगावले, बेलापूर विधानसभा सदस्य आ. श्रीम. मंदाताई म्हात्रे, विधान परिषद सदस्य आ.श्री.रवींद्र फाटक, विधानपरिषद सदस्य आ.श्री. विक्रांत पाटील, विधानसभा सदस्य आ.श्री. महेश बालदी, सिडकोचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक श्री.अश्विन मुद्गल, कोकण विभागीय आयुक्त श्रीम. रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ, नवी मुंबई पोलीस आयुक्त श्री. मिलिंद भारंबे, नवी मुंबई महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे, पनवेल महापालिका आयुक्त श्री. मंगेश चितळे, डी वाय पाटील विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ.विजय पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.
          'कॅम्पस कनेक्ट' या विशेष मोहीमेच्या माध्यमातून नवी मुंबईतील प्रत्येक शैक्षणिक कॅम्पस हा नशा विरोधातील लढ्याचे केंद्र बनेल आणि प्रत्येक विद्यार्थी हा या मोहिमेचा सैनिक होईल असा विश्वास मुख्यमंत्री महोदयांनी यावेळी व्यक्त केला. शिवाय दुर्दैवाने व्यसनांच्या गर्तेत अडकलेल्या युवकांना त्यामधून बाहेर काढण्यासाठी उपचार करणे आणि मानसिक आधार देण्याचे कामही केले जाणार आहे याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. या अभियानाद्वारे व्यसनमुक्ती विरोधी लढ्याला नवे बळ मिळेल असे ते म्हणाले.
          आज समाजात वाढते व्यसन आणि मानसिक ताणतणाव यांमुळे व्यसनमुक्ती केंद्राची गरज खूप वाढली आहे. विशेषत्वाने तरुणाई दारू, ड्रग्स आणि इतर घातक व्यसनांच्या आहारी जाताना दिसत आहेत. व्यसनांमुळे शरीराचे नुकसान होतेच याशिवाय नैराश्य, भीती यामुळे मनाचे आणि भविष्याचेही मोठे नुकसान होते.
          त्यावर योग्य उपचारासाठी व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राची गरज लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या सहयोगाने सीबीडी बेलापूर सेक्टर 8 येथील मदर तेरेसा इमारतीमध्ये ‘व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र’ सुरू करण्यात आले आहे.
          बांधिलकी फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने या केंद्राचे परिचलन केले जाणार आहे. येथे पुनर्वसन कार्यक्रम, जीवन-कौशल्य उपक्रम, कौशल्य विकास कार्यक्रम, व्यावसायिक प्रशिक्षणाशी संबंधित उपक्रम, मनोरंजनात्मक उपक्रम तसेच इतर रुग्ण-सहाय्यक कार्यक्रमांचे नियोजन व समन्वय केला जाणार आहे.
          पहिल्या टप्प्यात 11 रूग्णखाटा क्षमतेच्या या केंद्राद्वारे व्यसनातून सुटका करण्यासाठी आपुलकीचा आधार दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे समाजात पुन्हा सन्मानाने जगण्यासाठी पुनर्वसनासाठी मदत केली जाणार आहे.
          याकरिता रुग्णाच्या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे समुपदेशन केले जाणार आहे. तसेच विविध जनजागृती कार्यक्रम राबवून रुग्णाच्या पुनर्वसनासाठी आणि समाजात त्यांच्या पुनर्समावेशासाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
          नवी मुंबई पोलीस विभागामार्फत सूचित केल्यानुसार नवी मुंबई महानगरपालिके मार्फत चालविल्या जाणाऱ्या या केंद्रात रुग्णाचा प्रवेश झाल्यानंतर, दैनंदिन रुग्ण समन्वय, त्यांच्या कुटुंबियांशी समन्वय, त्यांचे समुपदेशन, पुनर्वसन सहाय्य व फॉलो-अप उपक्रमांव्दारे कार्यवाही केली जाणार आहे.
          केंद्रात दाखल होणा-या रूग्णाच्या मानसिकतेचा विचार करून त्याच्या कलाने योग्य उपचार करण्याकरिता याठिकाणी कार्यरत कर्मचारी हे आवश्यक अर्हताधारक आणि प्रशिक्षित व अनुभवी असतील. त्या कर्मचा-यांनाही वेळोवेळी आवश्यक प्रशिक्षण दिले जाईल व पर्यवेक्षण यंत्रणा कार्यान्वित ठेवण्यात येईल.
          याठिकाणी अनुभवी मानसोपचारतज्ज्ञ (Psychiatrist), अनुभवसंपन्न मानसशास्त्रज्ञ / समुपदेशक ( Psychologist / Counselor ) तसेच नर्सेस, वॉर्डबॉय आणि सुरक्षारक्षक असे कर्मचारी कार्यरत असतील. येथील व्यवस्थापनासाठी अनुभवी व्यवस्थापक कार्यरत राहील. 
          या केंद्रामध्ये अनुभवी डॉक्टरांच्या देखरेखीखाली औषधोपचार केले जातील तसेच मानसोपचार तज्ज्ञ (Psychiatrist) रुग्णाशी बोलून त्याच्या मनातील भीती, नैराश्य आणि ताणतणाव दूर करतील. येथे कॅरम, बुध्दीबळ अशा खेळांच्या सुविधांसोबतच मानसिक शांती, सकारात्मक विचार आणि शारीरिक तंदुरुस्तीसाठी योग, ध्यान आणि व्यायामाची सोय असणार आहे.
          या व्यसनमुक्ती सुविधा केंद्राच्या माध्यमातून व्यसनमुक्त नवी मुंबई साकारण्यासाठी नवी मुंबई महानगरपालिका पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या सहयोगाने सामाजिक बांधिलकी जपत आहे.


No comments:

Post a Comment

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभहस्ते शुभारंभ !!

नवी मुंबई महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्राचा मुख्यमंत्री महोदयांच्या शुभह...