कल्याण नवीन एसटी स्टँडचे काम संथगतीने; प्रवाशांची गैरसोय, आम्ही नगरकर संघटनेचा आंदोलनाचा इशारा !!
*कल्याण, दि. 21 ऑगस्ट 2026*
कल्याण पश्चिम येथील नवीन एसटी स्टँडचे काम मागील सहा ते सात वर्षांपासून अत्यंत संथगतीने सुरू असून प्रवाशांची मोठी गैरसोय होत असल्याने आम्ही नगरकर संघटनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
*परिवहन मंत्री सरनाईक यांना निवेदन*
या संदर्भात आम्ही नगरकर संघटनेने महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन दिले आहे. संघटनेचे पदाधिकारी शांताराम झावरे यांनी हे निवेदन सादर केले.
निवेदनात म्हटले आहे की, कल्याणच्या नवीन एसटी स्टँडचे काम गेली अनेक वर्षे सुरू आहे. कामासाठी आवश्यक असलेली पुरेशी यंत्रणा कार्यरत दिसत नाही. हे काम कधी पूर्ण होईल याची कोणतीही शाश्वती दिसत नाही. संबंधित विभागाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही.
*विठ्ठलवाडीला जाण्याची सक्ती*
सध्या कल्याण येथून सुटणाऱ्या एसटी गाड्या विठ्ठलवाडी येथून सोडल्या जात आहेत. त्यामुळे मुंबई, ठाणे येथून कल्याणला येणाऱ्या आणि कल्याणहून बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांना विठ्ठलवाडीपर्यंत जावे लागत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिक, महिला आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत आहे.
*संघटनेची मागणी*
सदर कामाला गती देऊन ते जलदगतीने पूर्ण करावे. जोपर्यंत नवीन स्टँड पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रवाशांसाठी कल्याणमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून तात्पुरती सुविधा करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.
प्रवाशांची गैरसोय अशीच सुरू राहिल्यास आम्ही नगरकर संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा शांताराम झावरे यांनी दिला आहे.
No comments:
Post a Comment