Saturday, 22 August 2026

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाच्या के. व्ही. पेंढरकर कला, विज्ञान व वाणिज्य (स्वायत्त) महाविद्यालयाच्या संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र (Centre for Research, Innovation and Entrepreneurship – Start-up & Incubation Cell) यांच्या वतीने ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न झाले. विद्यार्थ्यांमध्ये उद्योजकीय दृष्टिकोन विकसित करणे, संशोधन व नवोपक्रमाला चालना देणे तसेच समाजातील समस्यांवर आधारित नाविन्यपूर्ण स्टार्ट-अप्स उभारण्यासाठी प्रेरित करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश होता.

या शिबिरात इव्हॉनिक्स टेक्नॉलॉजीजचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच क्विककार्टचे सह-संस्थापक व मुख्य तंत्रज्ञान अधिकारी श्री. निलाद्री रॉय यांनी “Innovation Starts With You – Cultivating the Entrepreneurial Mindset” या विषयावर मार्गदर्शन केले. “मोठी कल्पना शोधण्यापेक्षा समस्या शोधा” आणि “समस्येतच उद्योजकतेची संधी दडलेली असते” हा प्रभावी संदेश देत त्यांनी विद्यार्थ्यांना समाजातील वास्तविक समस्यांचे निरीक्षण करून त्यावर नाविन्यपूर्ण उपाय शोधण्याचे आवाहन केले.

यानंतर झायडस वेलनेस लिमिटेडचे उपमहाव्यवस्थापक (DGM) डॉ. रवींदर वर्मा यांनी “Building Your First Startup – Idea to Launch” या विषयावर मार्गदर्शन करताना यशस्वी स्टार्ट-अप उभारण्यासाठी ग्राहकांच्या गरजा समजून घेणे, कल्पनेची पडताळणी करणे, सातत्याने प्रयोग करणे आणि समस्येवर आधारित उपाय विकसित करणे किती महत्त्वाचे आहे, याचे प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले.

यावेळी डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. हर्षल लवंगारे यांनी आपल्या मनोगतात संशोधन, नवोपक्रम व उद्योजकता केंद्र स्थापन करण्यामागील दूरदृष्टी स्पष्ट केली. “महाविद्यालय हे केवळ पदवी देणारे केंद्र नसून समाजातील समस्या घेऊन येणारे आणि त्या समस्यांवर विद्यार्थ्यांनी संशोधन, नवोपक्रम व उद्योजकतेच्या माध्यमातून उपाय शोधणारे केंद्र व्हावे,” हीच या उपक्रमामागील प्रेरणा असल्याचे त्यांनी सांगितले.

डोंबिवली व परिसरातील वाहतूक, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, स्थानिक उद्योग, डिजिटल सेवा, पाणी व्यवस्थापन यांसारख्या विविध क्षेत्रांतील समस्यांवर संशोधन करून त्यातून उद्योजकीय संधी निर्माण करणे, हे या केंद्राचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी नमूद केले. या संकल्पनेला डोंबिवली शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापन समितीने दिलेल्या भक्कम पाठिंब्याबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

आपल्या उद्योजकीय प्रवासाचा उल्लेख करताना श्री. लवंगारे यांनी श्री. निलाद्री रॉय यांच्याशी असलेल्या मैत्रीची आठवण करून दिली. कोविड काळात रोहन जोशी यांच्यासह “कक्षा” या K-12 एडटेक स्टार्ट-अपवर एकत्रितपणे काम करताना मिळालेला अनुभव विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरू शकतो, असे त्यांनी सांगितले. “उद्योजकता म्हणजे केवळ कल्पना नव्हे, तर समस्येचे सातत्याने निराकरण करण्याची वृत्ती,” असे त्यांनी अधोरेखित केले.

यावेळी त्यांनी महाविद्यालयाच्या आगामी उपक्रमांचीही माहिती दिली. भाभा अणु संशोधन केंद्र (BARC) यांच्या सहकार्याने एक दिवसीय विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात येणार असून, डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात सहा दिवसीय ‘इनोव्हेशन अँड करिअर फेस्टिव्हल’ आयोजित करण्याचा मानस व्यक्त केला. या महोत्सवात करिअर फेस्टिव्हल, स्टार्ट-अप फेस्टिव्हल आणि मेगा जॉब फेअर आयोजित करून विद्यार्थ्यांना उद्योग, संशोधन, उद्योजकता आणि रोजगाराच्या विविध संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

तसेच दुसऱ्या दिवशी महाविद्यालयाच्या ‘द बायोस्कोप बग्स’ या इन-हाऊस फिल्म सोसायटीचे उद्घाटन होणार असून, महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी व चित्रपट दिग्दर्शक अक्षय शिंपी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याची माहिती त्यांनी दिली. विद्यार्थ्यांमध्ये सर्जनशीलता, चिकित्सक विचार (Critical Thinking), समस्या निराकरण क्षमता (Problem Solving Skills), संवादकौशल्य आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या व्यापक उद्दिष्टातून संशोधन, उद्योजकता, करिअर विकास, उद्योग सहकार्य आणि फिल्म सोसायटी यांसारखे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमाचे संकल्पनाकार व संयोजक श्री. हर्षल लवंगारे, तर सहसंयोजक म्हणून प्रभारी प्राचार्य डॉ. कैलास जगदेव आणि स्ववित्त विभागाच्या उपप्राचार्या डॉ. रिया रुपाणी यांनी जबाबदारी पार पाडली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संशोधन समितीच्या अध्यक्षा डॉ. सुमन सात्याराम आणि डॉ. अमला पटवर्धन यांनी केलेल्या अथक परिश्रम, उत्कृष्ट नियोजन व प्रभावी समन्वयाबद्दल विशेष कौतुक करण्यात आले.

या शिबिराला विद्यार्थी, प्राध्यापक व संशोधकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. संशोधन, नवोपक्रम आणि उद्योजकतेची संस्कृती महाविद्यालयात अधिक दृढ करण्याच्या दिशेने हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरला असून, भविष्यातील आव्हानांना समर्थपणे सामोरे जाणारे विचारशील, नाविन्यपूर्ण आणि उद्योजकीय नेतृत्व असलेले विद्यार्थी घडविण्याच्या महाविद्यालयाच्या ध्येयाला या कार्यक्रमाने नवी दिशा दिली.

प्रसिद्धी/वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !! डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्...