Saturday, 22 August 2026

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

डोंबिवली एमआयडीसीत नाल्यात बॅग्स भरून कचरा; उघड्या चेंबर्समुळे रोगराईची भीती !!

** बेजबाबदार लोकांची करामत

*डोंबिवली, दि. 21 ऑगस्ट 2026*

डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात नाले आणि गटारांची अवस्था अतिशय भयानक झाली असून नागरिकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे आणि अर्धवट विकासकामांमुळे रोगराई पसरण्याची भीती निर्माण झाली आहे.

*नवीन बॅग्समध्ये कचरा भरून नाल्यात टाकला*  
कावेरी चौक जवळील एकदंत हेरिटेज आणि कोयना सोसायटीच्या मधून जाणाऱ्या नाल्यात नवीन बॅग्समध्ये भरून कचरा आणि प्लास्टिक फेकल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. तसेच सांडपाणी वाहिन्यांच्या अनेक चेंबर्सवर झाकणे नसल्याने त्या उघड्या चेंबर्समध्येही काही बेजबाबदार नागरिक कचरा टाकत आहेत.

ही बाब येथील ज्येष्ठ जागरूक नागरिक श्रीमती पुष्पा फाटक यांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली आहे.

*अर्धवट नाले, साचलेले पाणी, डासांची उत्पत्ती*  
निवासी भागात नवीन नाले आणि गटारे बांधण्याचे काम अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पावसाचे पाणी आणि सांडपाणी एकत्र येऊन साचून राहत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची मोठ्या प्रमाणात पैदास होत आहे.

यामुळे डेंग्यू, मलेरिया, विषमज्वर आणि कावीळ यासारख्या साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. अनेक रुग्ण आढळून येत असल्याने वैद्यकीय तज्ज्ञांनीही चिंता व्यक्त केली आहे. उघड्या चेंबर्समधून कोणतीही व्यक्ती पडून अपघात होण्याचीही शक्यता आहे.

*दोन यंत्रणांमध्ये कामाची विभागणी*  
सध्या सांडपाणी वाहिन्या आणि चेंबर्सची देखभाल दुरुस्ती तसेच नवीन नाले-गटारांचे बांधकाम एमआयडीसी पाहत आहे. तर स्वच्छता आणि साफसफाईचे काम केडीएमसीकडे आहे.

पुढील काही दिवसांत मोठे सण आणि उत्सव येणार असल्याने प्रशासनाने या विषयात गंभीरतेने लक्ष घालून तातडीने कारवाई करावी आणि बेजबाबदारपणे कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी स्थानिक रहिवाशांनी केली आहे.

वृत्त - राजू नलावडे (डोंबिवली)

No comments:

Post a Comment

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !!

के. व्ही. पेंढरकर महाविद्यालयात ‘उद्योजकता जागरूकता शिबिर – २०२६’ उत्साहात संपन्न !! डोंबिवली, दि. २१ ऑगस्ट २०२६ : डोंबिवली शिक्...