Friday, 27 June 2025

चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा शाहीर - सचिन धुमक

चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा शाहीर - सचिन धुमक

                 परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोकण भूमीत अनेक रत्ने जन्माला आली आणि त्यांनी त्यांच्या जन्मभूमीच नाव मोठ केलं. असच एक कोकण भूमीत तयार झालेलं रत्न म्हणजे शाहीर सचिन धुमक चिपळूण ढाकमोली गावात सर्व सामान्य कुटुंबात जन्मलेला हिरा. बालपणापासून कलेची आवड जोपासताना वयाच्या पाचव्या वर्षी कोकणची लोककला नमन मध्ये श्री कृष्णाची भूमिका साकारत कला क्षेत्रात  पदार्पण केले.
                शालेय शिक्षण आपल्या मामाच्या गावी म्हणजे वहाळ या ठिकाणी पूर्ण करत असताना कैलासवासी लोकप्रिय शाहीर बाबाजी घडशी यांचा कलेचा वसा जोपासत त्यांचे गुण आत्मसात करत गीत लेखनास सुरुवात केली.. आजवर आपल्या लेखणीतून अनेक समाजप्रबोधनपर गीत रचना करून ती स्वरबद्ध करत समाजप्रबोधनाचे कार्य करत असतानाच नमन साठी ऐतिहासिक वगनाट्य लिहिण्यास सुरुवात केली. इतिहासाला अपरिचित असलेल्या योद्ध्याची कलाकृती रामजी पांगेरा त्यातील एक नाट्यकृती गीतकार, गायक, आणि कलाकार अशा वेळी भूमिका साकारत आपल्या पहाडी आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत महाराष्ट्र गौरव भूषण मधुकर पंदेरे आणि लोकप्रिय शाहीर तुषार पंदेरे, जगन्नाथ रसाळ यांसारख्या गुरूंच्या छत्रछायेखाली बाबू रंगेले घराण्यातील तुरेवाले शाहीर म्हणून शाहिरी करण्यास सुरुवात केली. आणि आपल्या प्रबोधनात्मक शाहिरी लेखणीतून समाज प्रबोधन करत असतानाच स्वतः वस्ताद म्हणून अनेक शिष्य घडवत आहेत, सुशांत, जितेश, सागर, दीपक, किरण, सुरज, भावेश, रुपेश, महेश हे त्यांची शिष्य मंडळी भविष्यात नक्कीच रंगभूमीवर नाव कमावताना दिसून येतील.मुंबईच्या रंगमंचावर आपली शाहिरी कला सादर करत असतानाच दूरचित्रवाणी वरील कलर्स मराठी वाहिनीवर आपली कोकणची लोककला नमन सादर करण्याची संधी मिळाली.
            आपल्या प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच त्यांनी आपल्या पहाडी आवाजाने आपला चाहता वर्ग निर्माण केला आणि त्यातून उदयास आला टीम सचिन चाहते परिवार. आपल्या प्रमाणेच प्रत्येकाकडे काही ना काही अंगीभूत कला दडलेली आहे, हा विचार त्यांचा मनाला स्वस्थ बसू देत नव्हता आणि मग त्यांनी विडा उचलला तो आपल्या चाहते परिवारातील कलाकारांना प्रोत्साहन देण्याचा त्यांच्यातील कलागुणांना हेरून त्यांच्यातील कलाकार घडवण्याचा आणि त्यातूनच त्यांनी आपल्या निवडक चाहत्यांसमोर भारूडची  संकल्पना मांडली. आणि आपल्या चाहत्यांच्या सहकार्याने आज कोकणची लोककला चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
             कोकणातील तळागाळातील कलावंतांना हक्काच व्यासपीठ सचिन धुमक आणि त्यांच्या टीम सचिन चाहते परिवार यांनी उपलब्ध करून दिले. हे सर्व करत असतानाच टीम सचिन चाहते परिवार आणि शाहीर सचिन धुमक कला क्षेत्रासोबत शैक्षणिक सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतात.. मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू व्यक्तीला मदत करण्यात यांचा मोठा हातखंडा आहे.त्यांच्या या कार्याचा सन्मान म्हणून लोकसेवा महाराष्ट्र गौरव भूषण पुरस्कार तसेच सह्याद्री गौरव भूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. पण त्यांचा कुठे गवगवा केला नाही, आपल्या कार्याशी प्रामाणिक राहून कार्य करणारा हा कलावंत कायमच प्रसिद्धीपासून थोडा दूर राहून आपले कार्य करताना दिसून येतो.
             आपल्या शाहिरी प्रबोधनात्मक लेखणीच्या जोरावर रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतानाच. त्यांचा टीम सचिन चाहते परिवार हा कला क्षेत्रसोबतच क्रीडा, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात देखील भरीव कामगिरी करताना दिसून येतो मग ते क्रिकेट सामन्याचे आयोजन असो किंवा एखाद्या गरीब गरजू रुग्णाला मदतीचा हात असो शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार कायमच सर्व क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवताना दिसून येतो. यशाचे शिखर गाठत असताना अचानक ओढवलेलं आजारापणवर जिद्दीने मात करत. उराशी बाळगलेले स्वप्न पूर्ण करण्यासाठी हा अवलिया जोमाने काम करत आहे.हे सर्व करत असताना त्यांना त्याच्या कुटुंबाने आणि टीम सचिन चाहते परिवार यांची साथ लाभली त्यामुळेच आज चाहत्यांचे बहुरंगी भारुड ही संकल्पना साकार झाली.
             कोकणातील हौशी कलाकार यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारे चिपळूण ढाकमोली गावचा अवलिया शाहीर सचिन धुमक आणि त्यांचा टीम सचिन चाहते परिवार तर्फे शनिवार दि. २८ जून २०२५ रोजी दादर पश्चिम येथील प्रसिद्ध अशा श्री छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे रात्री ७:३० वा. शक्तीवाले शाहीर विनोद फटकरे आणि तुरेवाले शाहीर सचिन धुमक यांच्यात होणाऱ्या शक्ती-तुरा सामना कार्यक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा....! कोकणातील ही लोककला शाहीर मंडळी जोपसत आहे. ही कला जिवंत ठेवण्यासाठी रसिक मायबाप आपल्या सहकार्याची गरज आहे.आम्ही तर सज्ज झालो आहोत कार्यक्रम पाहायला. तुम्ही या.. तुमच्या मित्र परिवार यांना सांगा.. सोबत घेऊन या कारण लोप पावत चाललेली ही कला जोपासायची असेल तर मुंबई मध्ये होणाऱ्या प्रत्येक शक्ती-तुरा कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित रहा.

शब्दांकन -
शिवप्रेमी दीपक कावणकर
संकलन -श्री. शांताराम गुडेकर (+91 98207 93759)

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

श्री अरुण आडिवरेकर यांना राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर !!

श्री अरुण सुनील आडिवरेकर, गेली २३ वर्षे पत्रकारितेत काम करत आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेत असतानाच अवांतर लिखाणाची  त्यांना आवड निर्माण झाली. दैनिक रत्नागिरी टाइम्समधून लिखाण प्रसिद्ध होऊ लागले आणि हळूहळू लिखाणाची  त्यांना सवयच जडली. पुढे ते राजकीय, सामाजिक विषयांवर लिखाण करू लागले. महाविद्यालयीन शिक्षण संपताच सन २००२ मध्ये पत्रकारितेत प्रवेश केला. सुरुवातीला पत्रकार मग उपसंपादक, जिल्हा प्रतिनिधी म्हणून जबाबदारी पार पाडली. रत्नागिरी येथे दै.लोकमतमध्ये गेली १० वर्षे  ते काम करत आहेत. सध्या वरिष्ठ उपसंपादक म्हणून काम करत आहे. महाराष्ट्र शासनाचा सन २०२२चा राज्यस्तरीय कोकण विभागीय शि. म. परांजपे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर झाला आहे. या यशात 'लोकमत' चा सिंहाचा वाटा आहे. त्याचबरोबर कुटुंबाचा भक्कम पाठिंबा यामुळे हे यश मिळाले आहे.

जे करायचे ते मन लावून, स्वत:ला झोकून देवून, आणि सकारात्मक दृष्टी ठेवून करायचे ही त्यांची खासियत आहे. पत्रकार क्षेत्रातील एक निगर्वी, अत्यंत उत्साही, हसतमुख असलेले श्री आडिवरेकर हे  शब्दश: एक अष्टपैलू व्यक्तीमत्व लाभलेले पत्रकार आहेत. आपल्या लेखनीच्या माध्यमातून अनेक दुर्लक्षित प्रश्नाकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. आपल्या पेशाला कुठेही गालबोट न लावता, समाजाभिमुख लेखनी लाभलेले ते लक्षवेधी पत्रकार आहेत. स्वत: बरोबरच आपल्या सहका-यांकडून ही अपेक्षित काम करवून घेण्याची विलक्षण हातोटी त्यांच्याकडे आहे. उपेक्षित घटकांच्या व्यथा निपक्षपातीपणे मांडण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. त्यांच्या अथक परिश्रमाचे, उच्य वैचारिक भुमिकेचे व सडेतोड लेखनीचे या पुरस्कारामुळे सार्थक झाले आहे. त्यांना हा गौरवशाली पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्हाभरातून  त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

शब्दांकन - विलासराव कोळेकर (+91 94224 20611)

Thursday, 26 June 2025

महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड !!

महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृह संघटनेच्या कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल यांची एकमताने निवड !!

** संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर, तर सचिवपदी महेश यादव यांची नियुक्ती 

** बालकांच्या वसतिगृह संस्थांचा पुढाकार, राज्यभरातील सामाजिक संस्थांची एकजूट

मुंबई, (समीर खाडिलकर/शांताराम गुडेकर) :

            महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि गरजू मुलांसाठी खाजगी सामाजिक संस्थांच्या माध्यमातून वसतिगृहे चालवली जातात. शिक्षण,संगोपन आणि संस्कार देणाऱ्या या संस्थांनी गेल्या काही वर्षांमध्ये हजारो मुलांचे जीवन बदलले आहे. मात्र, अलीकडील काही अपवादात्मक घटनांमुळे संपूर्ण वसतिगृह क्षेत्रच संशयाच्या छायेत सापडले आहे. परिणामी, प्रामाणिकपणे कार्यरत संस्थांनाही नोटिसा, चौकशी आणि कारवाईचा सामना करावा लागत आहे. या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी राज्यातील सामाजिक संस्थांनी एकत्र येऊन ‘खाजगी वसतिगृह संघटना’ स्थापन केली आहे. या संघटनेच्या अध्यक्षपदी महेश निंबाळकर (पुणे) तर कार्याध्यक्षपदी दयानंद कुबल (मुंबई) यांची एकमताने निवड करण्यात आली आहे.
                 नव्या कार्यकारिणीत पुढील पदाधिकाऱ्यांचा समावेश-उपाध्यक्ष -ॲड. सुजाता अंगडी, जीवन संवर्धन फाउंडेशन, ठाणे, सचिव -महेश यादव, स्पर्श शेल्टर होम, पुणे, सहसचिव- अक्षदा भोसले, अंकुर सामाजिक संस्था-डोंबिवली, कोषाध्यक्ष विश्वास लोंढे, शाश्वत उत्क्रांती प्रतिष्ठान, ठाणे, सदस्य-तेजस कोठावळे (आनंदग्राम गुरुकुल, पुणे), ॲड. राजीव करडे (श्रावण बाळ आश्रम, पुणे), प्रसाद मोहिते (प्रार्थना फाऊंडेशन, सोलापूर), दत्ता इंगळे (जीवनविद्या परिवर्तन ट्रस्ट, पुणे), शरद आढाव (जनजागृती प्रतिष्ठान, अहिल्यानगर), मधुकर सोनवणे (खुशीग्राम फाऊंडेशन, लातूर), सुधीर भोसले (पारधी समाज जनजागृती सेवाभावी संस्था, बीड) यांचा समावेश आहे.

        *ठोस नियमावलीची मागणी*
                    महाराष्ट्रातील खाजगी वसतिगृहांसाठी स्पष्ट, ठोस आणि बंधनकारक नियमावलीची मागणी ही संघटना करत आहे. २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने राज्य शासनाला अशी नियमावली तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार २ नोव्हेंबर २०१५ रोजी शासन निर्णय जारी झाला, परंतु अनेक बाबी अद्याप अस्पष्ट आहेत. परिणामी, पालकांच्या संमतीने मुलांना प्रवेश देणाऱ्या वसतिगृहांवरही कारवाई होत आहे.ही संघटना शासकीय निकषांचे पालन करणाऱ्या संस्थांना संरक्षण देण्यासाठी, पारदर्शक कार्यपद्धती राबवण्यासाठी आणि बालकांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी कार्यरत राहणार आहे.

---------------------------------
चौकट: 

खाजगी संस्था वसतिगृह संघटना सरकारदरबारी एक संयुक्त, जबाबदार आणि कायदेशीर आवाज बनून उभे राहणार आहे. पारदर्शक कार्यपद्धती, बालकांच्या हक्कांचे रक्षण, आणि प्रामाणिक संस्था टिकवण्यासाठी सामूहिक पाठपुरावा हे संघटनेचे प्राथमिक उद्दिष्ट राहील.

महेश निंबाळकर- अध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
---------------------
खऱ्या अर्थाने बालकांच्या संरक्षणासाठी आणि प्रामाणिक संस्थांच्या हक्कांसाठी ही संघटना लढा देणार आहे. वसतिगृह क्षेत्रात पारदर्शकता, सुसूत्रता आणि विश्वास निर्माण करण्यासाठी राज्यस्तरावर ही संघटना महत्त्वाची भूमिका बजावेल. 

दयानंद कुबल, कार्याध्यक्ष- खाजगी संस्था वसतिगृह संघटना
--------------------------------------------
महाराष्ट्रातील शकेडो खाजगी वसतिगृहे चालवणाऱ्या संस्थांच्या सामूहिक प्रयत्नातून या संघटनेची निर्मिती झाली असून काल झालेल्या बैठकीत राज्यस्तरीय पदाधिकारांच्या नावांची घोषणा पुणे येथे करण्यात आली.

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती केली‌ !!

संयुक्त राष्ट्र अमेरिका येथील टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हलने भारतीय चित्रपट दिग्दर्शक अमोल भगत यांची ज्यूरी सदस्य म्हणून नियुक्ती केली‌ !!

दृष्टी, संस्कृती आणि आशेच्या माध्यमातून जागतिक कथा सशक्त बनवणे

ह्यूस्टन, टेक्सास — टेक्सास गोल्ड फिल्म अँड स्पोर्ट फेस्टिव्हल (TGFSF) ला हे जाहीर करताना अभिमान वाटतो की भारतातील  चित्रपट दिग्दर्शक आणि तरुण सांस्कृतिक व्यक्तिमत्त्व अमोल भगत यांची 2025 च्या आगामी आवृत्तीसाठी ज्यूरी सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. भारतातील एका साध्या शेतकरी कुटुंबातून आलेल्या भगत यांनी जागतिक चित्रपट क्षेत्रासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या प्रेरणादायी प्रवासामुळे ते युवकांसाठी एक आदर्श ठरले आहेत.

अमोल भगत यांनी अल्पवयातच २४ देशांमधील ६४ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हल्समध्ये ज्यूरीची भूमिका पार पाडली आहे. जागतिक कला आणि संस्कृती क्षेत्रावर त्यांनी जो प्रभाव पाडला आहे, तो उल्लेखनीय आहे. त्यांच्या या निवडीमुळे भारतीय युवकांचा आत्मविश्वास उंचावला असून, दक्षिण आशियातील स्वतंत्र आणि सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या चित्रपटांच्या योगदानाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेली आहे.

TGFSF ची स्थापना २०२२ साली ह्यूस्टन शहरात झाली असून, आता हे फेस्टिव्हल ह्यूस्टन आर्ट अँड फॅशन वीक NGO चा भाग आहे. ही संस्था 501(c)(3) अंतर्गत नोंदणीकृत एक नॉन-प्रॉफिट संघटना आहे. हे फेस्टिव्हल अशा चित्रपटांना व्यासपीठ देते जे प्रेरणा देतात, परिवर्तन घडवतात आणि आजच्या जगासमोरील गंभीर समस्या उजेडात आणतात. हे फेस्टिव्हल विविधतेचा, सहनशक्तीचा आणि मानवी शक्तीचा उत्सव साजरा करणाऱ्या कथा सांगणाऱ्या चित्रपट दिग्दर्शकांना प्रोत्साहन देते.
---
2025 फेस्टिव्हल थीम: "Lens on Global Resilience: Documenting Hope in Crisis"

(जागतिक संघर्षातून उभ्या राहिलेल्या आशेचे दस्तावेजीकरण)

2025 च्या आवृत्तीत संपूर्ण जगातील चित्रपट निर्मात्यांना संघर्ष, नवकल्पना आणि संकटातही टिकून राहण्याच्या आशेच्या कथा सादर करण्याचे आव्हान दिले जात आहे. ही थीम केवळ समस्या दाखवण्यासाठी नसून, समाधाने, धैर्य आणि मानवी आत्म्याची ताकद दाखवण्याचे खुले निमंत्रण आहे.
---
चित्रपट दिग्दर्शकांनी का भाग घ्यावा:

🌍 जागतिक ऑनलाइन प्लॅटफॉर्म: TGFSF च्या डिजिटल माध्यमातून तुमचा चित्रपट आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांसमोर सादर करा.
🔍 दडपल्या गेलेल्या कथांना आवाज द्या: दुर्लक्षित प्रश्नांवर प्रकाश टाका आणि मानवी भावना सांगणाऱ्या अनकथित गोष्टी मांडायला मदत करा.
🤝 ऑनलाइन नेटवर्किंग: उद्योगातील तज्ज्ञ, सहकर्मी आणि बदल घडवणाऱ्यांशी संवाद साधा.
🎬 वास्तविक परिणाम: सहकार्याची, वितरणाची आणि निधी मिळवण्याची संधी मिळवा.
✊ बदल घडवा: ज्या सिनेमा चळवळीमुळे जागरूकता, सहानुभूती आणि कृती निर्माण होते, त्या प्रवाहाचा भाग व्हा.
---
अमोल भगत हे केवळ व्यावसायिक अनुभवच घेऊन येत नाहीत, तर एक अनोखी सांस्कृतिक दृष्टिकोन सुद्धा घेऊन येतात, जो TGFSF च्या उद्दिष्टांशी सुसंगत आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे फेस्टिव्हलची आंतरराष्ट्रीय पोहोच वाढेल आणि सांस्कृतिक आदानप्रदान अधिक सशक्त होईल.

> "सिनेमा हा केवळ मनोरंजन नसून तो एक आरसा आहे, एक आवाज आहे आणि एक चळवळ आहे. TGFSF मध्ये सहभागी होणं हे माझ्यासाठी सन्मान आहे, कारण इथल्या कथा बदल घडवण्याची आणि उपचार देण्याची क्षमता ठेवतात," — अमोल भगत, चित्रपट दिग्दर्शक.

जसजसे TGFSF 2025 "जागतिक सहनशक्ती" या विषयावर लक्ष केंद्रीत करत आहे, तसतसे भगत यांचे दूरदृष्टी आणि समर्पण अशा चित्रपटांना नवा प्रकाश देतील, जे खरोखर महत्त्वाचे आहेत.
---
माध्यम प्रतिनिधींनी, मुलाखतीसाठी किंवा सबमिशनसाठी संपर्क साधावा:
📧 ईमेल: info@tgfsf.org
🌐 वेबसाईट: www.tgfsf.org
📍 ह्यूस्टन, टेक्सास, अमेरिका

शब्दांकन - विलासराव कोळेकर (+91 94224 20611)


Wednesday, 25 June 2025

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !!

राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना; ३१ जुलै पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन !!

पुणे, प्रतिनिधी : शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कला व साहित्य क्षेत्रातील योगदान असलेल्या ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांसाठी ‘राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलाकार मानधन सन्मान योजना’ राबविण्यात येते. या योजनेच्या लाभासाठी ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांनी ३१ जुलै पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत ज्येष्ठ साहित्यिक व कलाकारांना प्रती महिना पाच हजार रुपये मानधन देण्यात येते. योजनेच्या लाभासाठी संबंधित कलाकार, साहित्यिक महाराष्ट्राचा राहिवासी असणे बंधनकारक आहे. वय ५० वर्षांपेक्षा जास्त असावे. दिव्यांग कलाकार, साहित्यिकांचे वय ४० वर्षापेक्षा जास्त असावे. साहित्य व कलाक्षेत्रात सातत्यूपर्ण, दर्जेदार व मोलाची भर, तसेच योगदान कमीत कमी १५ वर्ष असावे.

वयाने ज्येष्ठ असणारे, विधवा, परितक्त्या, दिव्यांग कलाकार यांना प्राधान्य, कलाकाराचे सर्व मार्गांनी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ६० हजार रुपयांपेक्षा जास्त नसावे. ज्या कलाकारांची उपजीविका फक्त कलेवरच अवलंबून आहे असे कलाकार तसेच जे कलाकार फक्त कलेवरच अवलंबून होते, मात्र सध्या त्यांना इतर कोणत्याही मार्गाने उत्पन्न नाही असे कलाकार, केंद्र किंवा राज्य शासनाची महामंडळे, इतर कोणत्याही नियमित मासिक पेन्शन योजनेत अंतर्भूत नसलेले पात्र कलाकार या योजनेअंतर्गत अर्ज करू शकतात.

अर्जासोबत वयाचा दाखला, आधार कार्ड, उत्पन्नाचा दाखला, रहिवासी दाखला, प्रतिज्ञापत्र, बँक पासबूक, लागू असल्यास पती व पत्नीचा एकत्रित फोटो, दिव्यांगत्व असल्यास दिव्यांगत्वाचा दाखला, राज्य, असल्यास केंद्र सरकार पुरस्कार प्रमाणपत्र, नामांकित संस्था, व्यक्ती यांचे शिफारस पत्र असल्यास तसेच अन्य पुरावे जोडावेत.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने राज्य शासनाच्या आपले सरकार पोर्टलवर १ ते ३१ जुलै २०२५ पर्यंत ऑनलाईन अर्ज करावा, असे आवाहन राजर्षी शाहू महाराज ज्येष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन सन्मान योजना समितीचे सदस्य सचिव भूषण जोशी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप !!

आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप !!
 

रायगड, प्रतिनिधी, (पी. डी. पाटील) : श्री. विष्णू चैतन्य गणपत महाराज मंदिर ट्रस्ट, भांडुप, राष्ट्र सेवा दल, मुंबई आणि निर्मिती उद्धर - पाली यांच्या संयुक्त विद्यमाने खवली, उद्धर , उद्धर -कातकरीपाडा, पाली, जिल्हा रायगड येथील तीन आदिवासी पाड्यांवर आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य आणि रेनकोटचे वाटप कार्यक्रम नुकताच (दि. २५ जून, २०२५रोजी) खवली, उद्धर ,पाली येथे आयोजित केला होता. ज्येष्ठ कामगार नेते परशुराम कोपरकर यांच्या सौजन्याने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट उपलब्ध करुन देण्यात आले. यावेळी राष्ट्र सेवा दलाचे विश्वस्त प्रा. जयवंत पाटील यांनी विद्यार्थ्यांना साने गुरुजींच्या गोष्टी सांगितल्या. प्रमुख पाहुणे म्हणून भावेश कोपरकर ह्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोट यांचे वाटप करण्यात आले. 

संस्था प्रत्येक वर्षी आदिवासी विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप करीत असते. यावर्षी ५० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व रेनकोटचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी संस्थेच्या कविता पाटील व सुदाम सुतार तसेच  सेवादलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते सतीश उंडाळकर, प्रशांत गावंड,आदि मान्यवर उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी खवली हायस्कूलचे मुख्याध्यापक एम. व्ही. मोरे, उद्धर कातकरी शाळेचे मुख्याध्यापक दीपक शिंदे , उद्धर शाळेचे मुख्याध्यापक विकास चाटे आणि त्यांच्या शिक्षकवृंदानी सहकार्य केले.

* खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी !!

* खोपोली पोलीसांची अत्यंत अभिमानास्पद व उल्लेखनीय कामगिरी !!

*** सी. ई. आय. आर. तपास कार्यप्रणाली द्वारे गहाळ झालेले एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत 

*** रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. आंचल दलाल यांच्या हस्ते सदर मोबाईल मुळ मालकांना सुपुर्द

      बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड )  खोपोली पोलीस ठाणे हद्यीतील गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 8,96,000/- रुपये किमतीचे एकुण 48 ॲन्ड्रॉईड मोबाईल सी.ई.आय. आर. या कार्यप्रणालीच्या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले आहेत. 
     खोपोली पोलीस ठाणेच्या कार्य क्षेत्रातील सन 2025 सालात नागरीकांच्या गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी सी.ई.आय.आर. या माध्यमातुन जवळपास एकुण 48 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन त्याची एकुण किंमत 8,96,000/- रुपये इतकी आहे. सदरचे मिळुन आलेले एन्ड्रॉईड मोबाईल हे आज दिनांक 25.06.2025 रोजी मा.श्रीमती आँचल दलाल, पोलीस अधीक्षक, सो. रायगड-अलिबाग यांचे हस्ते मुळ मालकांना परत करण्यात आलेले आहेत. गहाळ झालेले मोबाईल परत मिळाल्यामुळे नागरीकांकडुन खोपोली पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
      तसेच यापुर्वी देखील खोपोली पोलीस ठाणेकडे सन 2023 ते 2025 या सालात गहाळ झालेल्या एन्ड्रॉईड मोबाईल पैकी एकुण 110 मोबाईल सी.ई.आय.आर. या माध्यमातुन हस्तगत करण्यात आलेले असुन आजपावेतो एकुण 29,00,000/- रुपये किंमतीचे एकुण 158 एन्ड्रॉईड मोबाईल हस्तगत करण्यात आलेले असुन नागरीकांना परत देण्यात आलेले आहेत.
      सदरची कामगिरी ही रायगड जिल्हयाचे मा. पोलीस अधीक्षक, श्रीमती आँचल दलाल, मा.अपर पोलीस अधीक्षक, श्री. अभिजीत शिवथरे, मा. उपविभागिय पोलीस अधिकारी, श्री. विक्रम कदम यांचे मार्गदर्शनाखाली खोपोली पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरिक्षक श्री. शितल राउत, पोशि/520 अमोल राठोड यांनी केलेली आहे.

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !

केडीएमटीच्या डोंबिवली बाजीप्रभू चौक मुख्य बस स्थानकावर गैरसोयीने आणि अनियमित बस सेवेमुळे प्रवासी त्रस्त !             कल्याण डों...