कोरोनामुळे जगभरातील परिस्थिती गंभीर !
तरीही जगाचा पोशिंदा बळीराजा आहे खंबीर !!
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगासह भारतात सर्वत्र हाहाकार माजला आहे. कोरोना विषाणूचे समूळ उच्चाटन करण्यासाठी संपूर्ण जगासह भारतातील सर्व प्रकारच्या यंत्रणा कंबर कसून अहोरात्र कामाला लागल्या आहेत. कोरोना मुक्तीच्या वैश्विक लढ्यामुळे भारतासह संपूर्ण जगाची अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. कोरोना मुक्तीच्या वैश्विक लढ्यात रुतलेले अर्थचक्र पुनःश्च पुर्ववत करण्यासाठी देश विदेशातील अर्थ तज्ञ अहोरात्र चिंतन करत आहेत. कोरोना विषाणूच्या महामारीमुळे देश विदेशातील शासन प्रशासन गंभीर झाले आहे. तर दुसरीकडे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या शेतात आणि शेती व्यवसायात पुर्ण पणे खंबीर असल्याचे चित्र दिसून येत आहे.
देशातील कोरोना मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे संपूर्ण देशातील उद्योग धंदे, नोकरी, व्यवसाय आणि सर्व प्रकारचे कामकाज ठप्प झाले आहे. त्यामुळे देशाच्या सर्व क्षेत्रातील अवस्था बिकट झाली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शासनाला वारंवार लाॅकडाऊन संचारबंदी कालावधी वाढवावा लागत आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या सरकारी निमसरकारी यंत्रणेवर ताण निर्माण होतो आहे. त्यामुळे देशातील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर झाली आहे. तर दुसरीकडे या सर्व गंभीर परिस्थितीशी संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या शेतात अहोरात्र प्रचंड मेहनत घेऊन परिस्थितीशी दोन हात करून देशासह जगभरातील बाजारपेठेत कृषी मालाचा निरंतर पुरवठा करत आहे. त्यामुळे सर्व जनतेची क्षुधा शांती होते आहे. त्यामुळे कोरोनामुळे जरी संपूर्ण देश विदेशातील परिस्थिती गंभीर असली तरी संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा अर्थात शेतकरी आपल्या कृषी व्यवसायात खंबीर असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे.
No comments:
Post a Comment