महापौर किशोरी पेडणेकर यांनी साजरी केली ऑनलाइन भाऊबीज !
मुंबई - भाऊ-बहिणीच्या अतूट प्रेमाचे प्रतीक असलेल्या "भाऊबीज" या सणानिमित्त मुंबईच्या महापौर किशोरी किशोर पेडणेकर यांनी आज सोमवार दि. १६ नोव्हेंबर २०२० रोजी सकाळी भायखळा, येथील महापौर निवासस्थानी कोरोना काळात सदैव साथ देणाऱ्या विविध क्षेत्रातील २१ भावांसोबत दृकश्राव्य प्रणालीद्वारे "भाऊबीज" साजरी केली. तसेच सर्व भावांना दीर्घायुष्य लाभू दे ! अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली .
विविध क्षेत्रात कार्यरत असलेले प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भाऊ ऑनलाईन उपस्थित असताना महापौरांचे पती किशोर पेडणेकर व मुलगा साईप्रसाद पेडणेकर तसेच वांद्रे येथील बीकेसी जम्बो कोविड सेंटरचे प्रमुख डॉ.राजेश ढेरे हे "भाऊबीज" कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित होते.
महापौरांनी सर्वप्रथम लाल पाण्यामध्ये चेहरा बघायला सांगून त्यांची नजर उतरविली. त्यानंतर टिळा लावून औक्षण केले.त्यानंतर लाडू भरविला व आपण जी "भाऊबीज" भेट मला देणार आहात, ती मला न देता महापौर निधीसाठी जमा करण्याचे आवाहन केले.
महापौर किशोरी पेडणेकर प्रसारमाध्यमांशी संवाद साधतांना म्हणाल्या की, यावर्षी पाडवा व भाऊबीज एकत्र आले असून नवरा व भाऊ हे दोघेही स्त्रीचे रक्षणकर्ते आहे. प्रथम नवरा किशोर पेडणेकर यांना ओवाळल्याचे महापौरांनी सांगितले. यावर्षीची "भाऊबीज" ही ऑनलाइन साजरी करावे लागत असल्यामुळे सदैव स्मरणात राहणार आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री.उद्धवजी ठाकरे व पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांच्यामुळे मला मुंबईच्या महापौरपदाची संधी मिळाल्याचे त्यांनी सांगितले.
कोरोना काळात मुंबईकर नागरिकांची सेवा करता येणे हे माझे भाग्य असून याकाळात मुंबईचे रक्षणकर्ते म्हणून डॉक्टर,परिचारका व कक्ष परिचर यांनी आपला जीव धोक्यात घालून कोरोना रुग्णांची सेवा केली आहे. त्यातील प्रातिनिधिक डॉक्टरांना आज मला "देवदूत भाऊ" म्हणून औक्षण करण्याची संधी मिळाली याचा मला सार्थ अभिमान असल्याचे महापौर म्हणाल्या. कोरोनाच्या काळामध्ये माझा एक भाऊ कोरोनामुळे गमावला असून मुंबईतील सर्वच भावांची मला खूप मदत झाली असून त्यातील प्रातिनिधिक स्वरूपातील २१ भावांना मी आज ओवाळले आहे.सर्व मुंबईकर नागरिकांना भाऊबीजेच्या शुभेच्छा देत असून नागरिकांनी कोरोना काळातील सुरक्षिततेचे सर्व नियम पाळून आपला उत्सव घरच्या घरी साजरा करावा,असे आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी यानिमित्ताने केले आहे.
आजच्या ऑनलाईन भाऊबीजेमध्ये सहभागी झालेल्या सर्व भावांचे मी आभार मानते तसेच त्यांना दीर्घायुष्य लाभु दे! अशी ईश्वरचरणी प्रार्थना करीत असल्याचे महापौर म्हणाल्या.याप्रसंगी केदार कावळे या भावाने आपले ऑनलाइन मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले की, कोरोना काळात महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलेली धावपळ व कष्ट आम्ही बघितले असून तुझ्या हातून यापुढेही अशीच मुंबईकर नागरिकांची सेवा घडू दे ! व तूला चांगले आरोग्य लाभू दे ! अशी सदिच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
No comments:
Post a Comment