नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्या ! भूमिपुत्रांचा सिडकोवर धडक मोर्चा !
`१५ ऑगस्टचा अल्टिमेटम नाहीतर १६ ऑगस्ट पासून कामबंदʼ
नवी मुंबई, २४ जून : नवी मुंबईतील विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीने जोर धरला आहे. आज याच मागणीसाठी नवी मुंबईतील सिडकोवर धडक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात भुमीपूत्र तसंच प्रकल्पग्रस्तांनी गर्दी केली होती. दरम्यान यावेळी सरकारला विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्यासाठी १५ ऑगस्टपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आला आहे. १५ ऑगस्टपर्यंत विमानतळाला दि बा पाटलांचं नाव मिळालं नाही तर १६ ऑगस्टपासून विमानतळाचं काम बंद पाडू असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
यावेळी सिडको अधिकाऱ्यांना, विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यावे, असे निवेदन देण्यात आले. नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणाचा वाद शिगेला पोहोचला आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील (D. B. Patil) यांचे नाव देण्याची मागणी जोर धरत आहे. प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी गुरुवारी सकाळपासून सिडको घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. हातात दि बा पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत.

No comments:
Post a Comment