पोहोताना सेल्फीच्या नादात मित्र धरणात बुडाला, मित्रांना कळलेही नाही; 'फ्रेंडशिप डे' दिवशीच घडली घटना.!
भिवंडी, दिं, 2, अरुण पाटील, (कोपर) :
आपल्या मित्रांसोबत धरण परिसरात फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी गेलेल्या एका मुलाचा धरणात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ऐन फ्रेंडशिप दिवशीच जीवलग मित्राचा मृत्यू झाल्यानं मित्र परिवारात हळहळ व्यक्त केली जात आहे. सर्व मित्र पोहोताना सेल्फी घेण्यात गुंग असताना, आपला बरोबर असलेला मित्र धरणात कधी बुडाला हेही कोणाला समजलं नाही. या प्रकरणी साफाळे पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तन्मेष विकास तरे असं मृत्यू झालेल्या 17 वर्षीय तरुणाचे नाव आहे. तो पालघर जिल्ह्यातील एडवन येथील रहिवासी आहे. येथील 16 ते 17 विद्यार्थी फ्रेंडशिप डे साजरा करण्यासाठी रोडखड धरण परिसरात गेले होते. रविवारी दुपारी कडक उन्हात तिकडे गेल्यामुळे अनेकांना धरणात पोहण्याचा मोह आवरला नाही. त्यामुळे काही मुलांसह तन्मेषही धरणात पोहण्यासाठी उतरला. पण पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्यानं तन्मेषचा धरणात बुडून मृत्यू झाला आहे.
विशेष म्हणजे त्याचे सहकारी मित्र यावेळी तिथेच होते. सर्वजण सेल्फी घेण्यात मशगुल असताना, हा धक्कादायक प्रकार घडला. आपला एक मित्र धरणाच्या पाण्यात बुडाला आहे. हे देखील त्यांना कळालं नाही. काही वेळानंतर तन्मेष आपल्यासोबत आला होता. पण तो कुठेच दिसत नसल्याचं या मुलांच्या लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी तन्मेषला सर्व ठिकाणी शोधलं. पण त्याचा काहीही थांगपत्ता लागला नाही.
शेवटी तन्मेष धरणात बुडल्याचा संशय संबंधित मित्रांना आला. त्यामुळे त्यांनी स्थानिकांच्या मदतीनं तन्मेषला धरणाच्या पाण्यात शोधण्याचा प्रयत्न केला. यानंतर स्थानिकांनी तन्मेषचा मृतदेह पाण्यातून काढला. या घटनेची माहिती मिळताच साफाळे पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनेचा पंचनामा करत तन्मेषचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच पोलिसांनी या घटनेची नोंद आकस्मिक मृत्यू अशी केली आहे. पण ऐन फ्रेंडशिप डेच्या दिवशीच मित्राचा अशाप्रकारे मृत्यू झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

No comments:
Post a Comment